ब्राह्मण समाजाची अस्मिता दुखावणारे दृश्य ‘फुले’ चित्रपटातून काढा !

अखिल ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – ११ एप्रिल या दिवशी ‘फुले’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटात ब्राह्मण समाजाची अस्मिता दुखावणारे दृश्य प्रदर्शित करण्यात आले आहे. हे दृश्य चित्रपटातून काढा, अशी मागणी ‘अखिल ब्राह्मण समाजा’च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. याविषयीचे निवेदन ३ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आले.

कराड येथे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

कराड येथेही ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, फुले चित्रपटाच्या माध्यमातून भविष्यात सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जातीच्या नावावर लोकांना आपापसांत लढवले जाईल. फुले चित्रपटाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाच्या अस्मितांवर घाव घालण्यात येऊ नये.

या वेळी अखिल ब्राह्मण समाजाच्या सोनल भोसेकर म्हणाल्या, ‘‘फुले चित्रपटात एक दृश्य दाखवण्यात आले असून त्यामध्ये एक जानवे घातलेला लहान मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण मारतांना दाखवण्यात आले आहे. ही विकृती आहे. वस्तूतः चित्रपटाची दर्शकसंख्या वाढवण्यासाठी हे दृश्य चित्रित करण्यात आले आहे. यामुळे ब्राह्मण समाजाची अस्मिता दुखावली गेली आहे. वास्तविक म. ज्योतिबा फुले यांना मुलींची शाळा काढण्यासाठी ब्राह्मण समाजातील भिडे यांनीच स्वत:चा वाडा दिला होता. ब्राह्मण समाजाचा फुलेंना कधीही विरोध नव्हता. त्यामुळे हे दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात यावे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज संघटना रस्त्यावर उतरतील. यामुळे उद्भवणार्‍या परिणामांचे उत्तरदायित्व सर्वस्वी प्रशासनाचे असेल.’’

संपादकीय भूमिका :

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांनी स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित !