पिंगुळी ग्रामपंचायतीचा ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ अभिनव उपक्रम 

  • ७ एप्रिलला प्रारंभ

  • १ वर्ष विविध कार्यक्रम राबवणार !

कुडाळ – तालुक्यातील पिंगुळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत वििवध उपक्रमांनी राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ सोमवार, ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी पिंगुळी ग्रामपंचायत पहिलीच असल्याचे सरपंच अजय आकेरकर यांनी सांगितले.

पिंगुळी ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या या उपक्रमाची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच आकेरकर बोलत होते. या वेळी सागर रणसिंग, मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, अन्वी बांदेकर, केशव पिंगुळकर, शशांक पिंगुळकर, ग्रामसेवक राजेश निवतकर आदी उपस्थित होते.

या वेळी सरपंच आकेरकर म्हणाले, ‘‘७ एप्रिल या दिवशी सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडी सोहळ्यानंतर परमपूज्य समर्थ राऊळ महाराज सभागृह येथे शालेय मुले आणि पालक यांच्यासाठी ‘मोबाईल, आजची मुले आणि पुस्तक, मुलांचे हरवलेले बालपण’ या विषयावर मार्गदर्शन आणि परिसंवाद होणार आहे. मे आणि जून महिन्यांत शेतकर्‍यांना कृषीविषयी मार्गदर्शन, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत स्वच्छता अन् श्रमदान शिबिर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत महिलांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन अन् महिला बचत गटासाठी अभ्यासदौरे आयोजित करणे, असे कार्यक्रम होणार आहेत. वर्ष २०२६ मध्ये पिंगुळी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, अपंग कल्याण, आर्थिक आणि सामाजिक मागास उन्नती अभियान आदी विविध कार्यक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहेत.’’