Police Officer Ashwini Bidre Murder Case : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी !  

९ वर्षांनंतर लागला निकाल

आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व हत्या झालेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे

पनवेल – कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (तालुका हातकणंगले) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यासह त्यांचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी राजेश पाटील याची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली आहे. पनवेल येथील सत्र न्यायालयाने ५ एप्रिलला हा निकाल दिला. ११ एप्रिलला या सर्वांना शिक्षा सुनावली जाणार आहे.

अश्विनी बिद्रे-गोरे यांची ११ एप्रिल २०१६ या दिवशी हत्या करून त्यांचा मृतदेह तुकडे करून तो वसईच्या खाडीत फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी ७ डिसेंबर २०१७ या दिवशी ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली होती. ९ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

संपादकीय भूमिका

उशिराने मिळणारा न्याय हा अन्यायच, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?