आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (५.४.२०२५)

नागरिकांची जेसीबीवर दगडफेक !

ठाणे- येथील मुल्लाबाग बस डेपोला सकल मराठा समाजाने ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव दिले होते. बसडेपोचे रूपांतर कचराकुंडीत (डंपिंग ग्राऊंडमध्ये) होत असल्याने स्थानिक नागरिकांनी संतप्त होत ठाणे महापालिका अधिकार्‍यांसमोरच जेसीबीवर दगडफेक केली.


ध्यानधारणा शिबिरांना काळी जादू प्रतिबंधक कायदा लागू नाही !

मुंबई – महाराष्ट्र काळी जादू प्रतिबंधक कायदा हा हानीकारक प्रथांना आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे. तो अधिकृत आध्यात्मिक किंवा ध्यानधारणा शिबिरांना लागू होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. गुजरातस्थित आध्यात्मिक गुरु रमेश मधुकर मोडक उपाख्य शिवकृपानंद स्वामी यांची या कायद्याअंतर्गत प्रविष्ट केलेल्या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवतांना न्यायालयाने हे स्पष्ट केले. रोहन कुलकर्णी यांनी मोडक यांच्यावर करिअरमध्ये यश संपादन करण्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली होती.


कचर्‍याच्या दुर्गंधीवर उपाययोजना नाही !

मुंबई – कांजूरमार्ग येथील पालिकेच्या कचराभूमीतील कचर्‍याची दुर्गंधी वाढत आहे. या प्रकरणी अनेकदा तक्रारी करूनही पालिका ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप रहिवासी, तसेच पर्यावरणप्रेमी यांनी केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही या प्रकरणाकडे कानाडोळा करत आहे. मानवी हक्क आयोगाकडेही या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे, असे स्थानिकांनी सांगितले.


ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिलांचा मृत्यू

नांदेड – येथील महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला असून यामध्ये ८ महिलांचा मृत्यू झाला आहे. या वेळी ट्रॅक्टरमध्ये एकूण १२ जण होते. या महिला हळद काढणीसाठी जात होत्या. अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत पडला.


धर्मांध मित्राचे ऐकून हिंदु तरुणीची स्वतःच्याच घरात चोरी !

ठाणे – भिवंडी येथील तनिषा भगत (वय १८ वर्षे) हिने तिचा मित्र महंमद कैफ खान (वय २० वर्षे) याच्याशी संगनमत करून स्वतःच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून मुलीसह तिच्या मित्रावर नारपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झालेले दोन्ही आरोपी पसार आहेत.

संपादकीय भूमिका : धर्मांधांच्या आहारी जाऊन स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेणारे हिंदू !