पुणे – तारुण्य ही परमेश्वराची देणगी आहे. स्वातंत्र्याकरता रक्त सांडावे लागते, ते केवळ तरुणांकडेच असते. भारत देश हा तरुणांचा आहे. कीर्तन, प्रवचन, व्याख्याने ही तरुणांकरताच असतात. तारुण्य तेच भाग्याचे जे धर्माच्या कार्याकरता वापरले जाते आणि क्रांती ही तरुण वयात करता येते. आजवरचा इतिहास पाहिल्यास सर्वांनी तारुण्यातच क्रांती केली आहे, असे प्रतिपादन युवा कीर्तनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे पाटील यांनी केले. ते ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’च्या वतीने कर्वेनगर येथील महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या अफझलखानरूपी ‘लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या विरोधातील धर्मसभे’त बोलत होते. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे परभणी जिल्हा प्रमुख श्री. शंकर देशमुख यांना ‘शिवप्रताप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ह.भ.प. संग्रामबापू भंडारे पाटील पुढे म्हणाले की, ‘जे तरुण आहेत त्यांनी तारुण्याचे महत्त्व समजावून घेतले पाहिजे. दुर्दैव हे आहे की, आजचा तरुण आपले तारुण्य वाया घालवत आहे. आजचा तरुण लाचार होतोय. त्यांनी ‘शिवराय’ वाचावे म्हणजे तारुण्यात संधीचे सोने करता येईल. छत्रपती शिवाजी महाराज लढले, आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी जीव घेतले, जीव वाचवले आणि स्वराज्य उभे केले. अफझलखानाला मारून छत्रपतींनी दाखवून दिले की, अधर्म कितीही मोठा असू द्या धर्माने त्याला हरवता येते. ही शिकवण छत्रपतींनी दिली. हिंदु धर्मात व्यक्तीद्वेष शिकवत नाही तो तत्त्वाचा (अधर्माचा) विरोध करतो. आज हिंदु धर्म विभागला गेला आहे, खरेतर आज सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. अधर्माविरोधात संघटित होऊन लढा देण्याची वेळ आहे, असेही संग्रामबापू म्हणाले.
काश्मिरमध्ये जे घडले तो भूतकाळ आहे, त्याहीपेक्षा वर्तमानकाळ भयानक आहे – शंकर देशमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे परभणी जिल्हा प्रमुख
या वेळी शंकर देशमुख म्हणाले की, परभणी जिल्ह्यातून आम्ही संघटनेच्या माध्यमातन २५८ मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून बाहेर काढले; परंतु हे सांगतांना अभिमान वाटावा की, दुर्दैव वाटावे, हे समजत नाही. आजही तरुणी लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत. जिहादचे अनेक प्रकार आहेत, त्यातील ‘लव्ह जिहाद’ हा फार मोठा धोका आहे. त्यातून कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. आपण बहुसंख्य आहोत; म्हणून हिंदु झोपेत आहेत. काश्मिरमध्ये जे घडले तो भूतकाळ आहे. वर्तमानकाळ त्याहीपेक्षाही भयानक आहे.