कर्नाटक राज्याच्या गृहमंत्र्यांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्वासन
बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु तरुणी आणि महिला यांच्या बेपत्ता होण्याच्या घटना गांभीर्याने घेत या प्रकरणांच्या अन्वेषणाला गती देण्याविषयी सुचवले आहे. यासह ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी विशेष पोलीस दलाची निर्मिती करण्याविषयी सरकारी पातळीवरील चर्चेत मी लक्ष घालीन, असे आश्वासन कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिले.
हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी त्यांनी शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले. ‘कायदा आणि सुव्यवस्था राखून समाजविघातक शक्तींचा नायनाट करण्यासाठी सरकार कटीबद्धतेने काम करील’, असेही गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी स्पष्ट केले. या शिष्टमंडळात हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, रणरागिणी शाखेच्या सौ. भव्या गौडा, दुर्गा सेनेच्या नंदिनी नागराज, श्रीराम सेनेचे श्री. सुंदरेश आणि श्री. अमरनाथ यांचा समावेश होता.
शिष्टमंडळातील संघटनांनी निवेदनात म्हटले की, राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू होऊनही ‘लव्ह जिहाद’ला आळा बसलेला नाही. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर ‘विशेष लव्ह जिहादविरोधी दल’ सिद्ध करण्यात यावे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अहवालातील ‘शाहीन टोळी’ राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये सक्रीय असून काही मौलवी आणि मदरसे लव्ह जिहादचे समर्थन करत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.