नागपूर येथे ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !

मेट्रो टप्पा-दोनसह वन्देे मातरम् रेल्वेला दाखवणार हिरवा झेंडा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागपूर – मुंबई-नागपूरला जोडणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वायफळ पथकर नाका येथे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होईल. त्यानंतर मोदी ‘झिरो माइल्स’ ते वायफळ पथकर नाका असा प्रवास करतील. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी उपस्थित रहाणार आहेत.

नागपूर येथील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही मोदी करणार आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्थेचे उद्घाटन करतील. त्याचसमवेत हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र, चंद्रपूरचे लोकार्पण करणार आहेत.

यासह खापरी मेट्रो स्थानक येथे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर वन्दे मातरम् रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात येईल आणि त्यानंतर ‘मिहान एम्स्’चे लोकार्पण करण्यात येेईल.