श्रद्धा वालकर हिच्या वडिलांनी घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप !

श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

मुंबई – श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी ९ डिसेंबर या दिवशी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ‘या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी सहकार्य केले नाही’, असा गंभीर आरोप विकास वालकर यांनी पोलिसांवर केला. याविषयी अन्वेषण व्हावे आणि मुलीला मरणोत्तर तरी न्याय मिळावा, अशी भावना वालकर यांनी गृहमंत्र्यांकडे व्यक्त केली.

पोलिसांनी सहकार्य केले असते, तर माझी मुलगी जिवंत असती ! – विकास वालकर (श्रद्धा वालकर हिचे वडील)

प्रारंभीपासून वसईतील तुळींज पोलीस ठाणे आणि माणिकपूर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या असहकार्यामुळे मला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. याविषयी अन्वेषण व्हावे. पोलिसांनी सहकार्य केले असते, तर माझी मुलगी जिवंत असती. श्रद्धा हिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मला आणि माझे कुटुंबीय यांना अत्यंत दु:ख झाले आहे. हे दु:ख आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आफताब पूनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेने हत्या केली. त्याला कठोर शिक्षा व्हावी, तसेच त्याचे आई-वडील आणि भाऊ यांचेही सखोल अन्वेषण व्हावे, अशी भावना विकास वालकर यांनी ९ डिसेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.