कै. (सौ.) सुरेखा केणी (वर्ष २०११ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांनी साधनेत आणल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार्‍या आणि आध्यात्मिक स्तरावर मैत्री जपणार्‍या मुंबई येथील सौ. पद्मजा सालपेकर (वय ६६ वर्षे) !

कै. (सौ.) सुरेखा केणी आणि सौ. पद्मजा सालपेकर या बालमैत्रिणी असून साधनेतही त्या आध्यात्मिक मैत्रिणी ठरल्या. कै. (सौ.) सुरेखा केणी यांनी साधनेत आणल्याबद्दल सौ. पद्मजा सालपेकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि कै. (सौ.) सुरेखा केणी यांची धाकटी बहीण सौ. पौर्णिमा प्रभु यांना सौ. पद्मजा सालपेकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) सुरेखा केणी

१. सौ. पद्मजा सालपेकर यांचा कै. (सौ.) सुरेखा केणी यांच्या माध्यमातून साधनेस झालेला प्रारंभ आणि त्याविषयी त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

१ अ. बालमैत्रिणी असून एकाच कार्यालयात चाकरी लागल्याने मैत्री घट्ट होणे : ‘मी आणि सुरेखा (कै. (सौ.) सुरेखा केणी, वर्ष २०११ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित करण्यात आली होती.) एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होतो. दहावीनंतर सुरेखाने कला शाखा निवडल्यामुळे साधारण ५ – ६ वर्षांसाठी आमचा संपर्क तुटला. त्यानंतर अकस्मात् आमची भेट आय्.डी.बी.आय्. (IDBI) बँकेच्या कार्यालयात झाली. आम्ही एकत्रच कामावर रुजू झालो होतो. सुरेखा मला तिच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेत असल्यामुळे आमची मैत्री आणखीनच घट्ट झाली. आमच्या आवडी-निवडीही एकसारख्याच होत्या. माझे लग्न झाले आणि मी माझ्या नवीन आयुष्यात रमले. पुढे सुरेखाचेही लग्न होऊन ती बेंगळुरूला गेली.

सौ. पद्मजा सालपेकर

१ आ. सौ. सुरेखा सनातन संस्थेच्या संपर्कात येणे आणि तिच्या माध्यमातून साधना समजणे : कालांतराने सौ. सुरेखा सनातन संस्थेच्या संपर्कात आली आणि ती साधना करू लागली. तिने मला साधनेचे आणि कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व सांगितले. कार्यालयीन कामानिमित्त सौ. सुरेखा पुन्हा मुंबईला आली आणि पुन्हा आम्ही एकत्र आलो. ती मला सनातन संस्थेच्या सत्संगांना आणि सनातनच्या नियतकालिकांसाठी विज्ञापने आणण्यासाठी घेऊन जात असे. तिचे संपूर्ण जीवनच सनातनमय झाले होते. आता मला ‘सौ. सुरेखा मुंबईत असतांना मी तिचा साधनेसाठी लाभ करून घेतला नाही’, असे वाटते.

१ इ. भाषांतराच्या सेवेला आरंभ होणे : सौ. सुरेखाला ‘मी केलेल्या लिखाणाचे प्रारूप (मसुदा) चांगले असते’, असे वाटत असल्याने कार्यालयीन कामांतर्गत एखादा अर्ज द्यायचा असल्यास ती मलाच तो सिद्ध करायला सांगत असे. हळूहळू ती सनातनच्या नियतकालिकांतील छोट्या छोट्या चौकटींचे मराठी ते इंग्रजी भाषांतर करण्याची सेवा मला देऊ लागली. त्या माध्यमातून माझ्या सेवेला आरंभ झाला. साधकांना तातडीने एखाद्या लिखाणाचे भाषांतर करून हवे असल्यास सुरेखा त्यांना माझ्याकडे पाठवत असे. त्यानंतर माझी भाषांतराची सेवा अविरतपणे चालू राहिली. पत्रकार परिषदेशी संबंधित लिखाण किंवा मोहिमेअंतर्गत देण्यात येणारी विविध निवेदने आणि संकेतस्थळावरील लिखाण यांचे भाषांतर मी करत असे. त्यानंतर ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’शी मी जोडले गेले. प्रत्यक्षात मी एकाही अधिवेशनाला उपस्थित नसले, तरी त्या कालावधीत मला पुष्कळ सेवा मिळत असे. देवाच्या कृपेने मी कौटुंबिक दायित्व सांभाळून घरून सेवा करू शकत होते. मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ती सेवा मी अधिक कालावधीसाठी करू शकले. हे सर्व सौ. सुरेखामुळेच शक्य झाले. आता माझी शारीरिक स्थिती चांगली नसल्याने मी अधिक सेवा करू शकत नाही. ‘माझी पात्रता नसतांनाही प.पू. गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडून सेवा करून घेत आहेत’, असे मला वाटते. त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

सौ. सुरेखाला कर्करोग झाल्याचे समजल्यावर ते तिने शांतपणे स्वीकारले. हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले. सौ. सुरेखासारखी मैत्रीण मिळाल्यामुळे मी स्वतःला धन्य समजते. प.पू. डॉक्टरांवरील (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील) अतूट श्रद्धेमुळे ती त्याही स्थितीत आनंदी असायची.

‘प.पू. डॉक्टर, तिच्याप्रमाणेच माझ्यामध्येही ती दृढ श्रद्धा निर्माण होऊ दे आणि लवकरात लवकर मलाही तुमच्या चरणकमली विलीन होता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. पद्मजा सालपेकर (वय ६६ वर्षे), मुंबई (६.११.२०२२).

२. सौ. पौर्णिमा प्रभु (कै. (सौ.) सुरेखा केणी यांची धाकटी बहीण) यांना सौ. पद्मजा सालपेकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये 

२ अ. रुग्णाईत असलेल्या मैत्रिणीची सेवा करण्यासाठी सौ. पद्मजा मुंबईहून बेंगळुरूला येणे : ‘सुरेखा आणि पद्मजा यांची पुष्कळ चांगली मैत्री होती. ‘सौ. पद्मजा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करत आहेत’, एवढेच मला ठाऊक होते. वर्ष २००९ मध्ये माझी मोठी बहीण सौ. सुरेखा केणी कर्करोगाने रुग्णाईत होती. तिचा रोग बळावल्याचे कळल्यावर सौ. पद्मजाताई त्यांच्या यजमानांच्या समवेत

सौ. पौर्णिमा प्रभु

सौ. सुरेखाला भेटायला आणि तिची सेवा करायला बेंगळुरूला आल्या. सौ. पद्मजा आल्याचे कळल्यावर सौ. सुरेखालाही पुष्कळ आनंद झाला; कारण त्यांची आध्यात्मिक मैत्री होती. सौ. पद्मजा आणि तिचे यजमान सौ. सुरेखाच्या घराजवळ असलेल्या एका ‘हॉटेल’मध्ये रहात होते. सौ. पद्मजा सकाळी १० वाजता यायच्या आणि रात्री परत जायच्या. त्या सुरेखाला जेवण भरवायच्या आणि तिच्याशी गप्पा मारायच्या. त्यांनी पुष्कळ प्रेमाने ५ – ६ दिवस तिची सेवा केली. सौ. सुरेखाही त्या दिवसांत पुष्कळ आनंदात होती. सौ. पद्मजा यांचे यजमान शांतपणे बाहेरच्या खोलीत दूरदर्शन पहात बसायचे. घरातील इतर मंडळींशी गप्पा मारायचे. त्यांनी कधीही सौ. पद्मजा यांना लवकर परत जाण्याचा आग्रह केला नाही. याचे आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटत होते. सौ. पद्मजाताई आम्हाला म्हणायच्या, ‘‘मी सुरेखा समवेत आहे. तुम्ही तुमच्या काही सेवा किंवा कामे असतील, तर करा.’’ ‘सौ. सुरेखाने त्यांना साधनेत आणल्याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. सौ. सुरेखावरील प्रेम आणि कृतज्ञता यांच्यामुळेच मुंबईहून बेंगळुरूला येऊन सौ. सुरेखा यांच्या शेवटच्या कालावधीत त्यांनी तिची सेवा केली’, हे आता आमच्या लक्षात येते. प्रत्यक्षात एखाद्याच्या घरी जाऊन सेवा करणे कठीण असते.

२ आ. ‘कृतज्ञता वाटणे म्हणजे कसे असते ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सौ. पद्मजा सालपेकर ! : आताही सौ. पद्मजा केवळ कृतज्ञतेपोटी प्रतिवर्षी कै. (सौ.) सुरेखाच्या वाढदिवसाच्या दिवशी मला भ्रमणभाष करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ‘सुरेखामुळे मला गुरुदेव भेटले आणि माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे त्या कृतज्ञतापूर्वक म्हणतात. ‘आतून कृतज्ञता वाटणे म्हणजे कसे असते ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आता सौ. पद्मजा दुर्धर आजाराने रुग्णाईत आहेत; परंतु ‘सौ. सुरेखामुळेच मला सेवा मिळाली आणि ती तिने करवून घेतली, तसेच या आजारपणातही मी सेवा करू शकत आहे. हे केवळ सुरेखासारखी मैत्रीण भेटली म्हणून शक्य झाले’, असा त्यांचा भाव आहे. स्वतःकडे कर्तेपणा न घेणे हा त्यांच्यातील मोठेपणा सगळ्यांना शिकण्यासारखा आहे.

२ इ. ‘सौ. पद्मजा यांची आणि त्यांच्या पतींचीही साधना होत आहे’, असे वाटणे : भाषांतराच्या सेवेच्या समवेत सौ. पद्मजा त्यांच्या यजमानांच्या आस्थापनाचे नियमितपणे विज्ञापन आणि अर्पणही देतात. त्या त्यांच्या शाळेतील मैत्रिणी आणि नातेवाईक यांना सनातनचे पंचांग अन् सनातनची उत्पादने भेट देतात, तसेच त्यांना साधनेचे महत्त्वही सांगतात. सौ. पद्मजा यांचा तन, मन आणि धन यांचा त्याग होत आहे. त्यांचे यजमानही त्यांना सेवा आणि साधना करायला साहाय्य करतात. त्यामुळे ‘त्यांचीही साधना होत आहे’, असे मला वाटते.

सौ. पद्मजा आणि कै. (सौ.) सुरेखा केणी हे आध्यात्मिक मैत्रीचे एक उत्तम उदाहरण आहे.’

– सौ. पौर्णिमा प्रभु (कै. (सौ.) सुरेखा केणी यांची धाकटी बहीण, बेंगळुरू (६.११.२०२२)