१. मुलीवर धर्माचरण करण्याचा संस्कार करणे
१ अ. भारतीय संस्कृतीनुसार पोशाख करायला सांगणे : ‘मी शाळेत असतांना मला ‘व्हॉलीबॉल’ (एक मैदानी खेळ) खेळण्याची फार आवड होती; म्हणून मी शाळेत ‘व्हॉलीबॉल’ खेळात भाग घेतला होता. त्या खेळासाठी मला ‘पँट’ आणि ‘शर्ट’ घालावा लागणार होता. हे आईला (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) समजल्यावर तिने मला समजावून सांगितले, ‘‘पँट’ आणि ‘शर्ट’ घालण्याची आपली संस्कृतीच नाही. त्यामुळे तू त्या खेळात भाग घेऊ नकोस.’’ आईने लहानपणापासून मला कधीच ‘जीन्स पॅन्ट’ घालू दिली नाही.
१ आ. सात्त्विक केशभूषा करण्याची सवय लावणे : आईने मला कधीही शाळेत केस मोकळे सोडून जाऊ दिले नाही. ती नेहमी माझ्या २ वेण्या घालूनच मला शाळेत पाठवत असे.
१ इ. मोठ्यांचा आदर करायला शिकवणे : आईने मला लहानपणीच ‘मोठ्यांचा आदर कसा करावा ?’, याविषयी सांगितले. आम्ही कोणाच्याही घरी गेल्यावर आईने मला घरातील मोठ्या व्यक्तींना आधी वाकून नमस्कार करायला शिकवले आहे. आईचा आध्यात्मिक अधिकार मोठा असूनही ती अजूनही कोणाकडे गेली, तर आधी घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करते.
२. ‘बाहेरील असात्त्विक वातावरणाचा माझ्यावर परिणाम व्हायला नको’, यासाठी आई माझ्या शाळेच्या गणवेशावर आदल्या दिवशीच नामपट्टी ठेवत असे. त्याचा मला शाळेतही पुष्कळ लाभ झाला.
३. केवळ देवासाठी गायन करायला सांगणे
मला लहानपणापासूनच गाण्याची फार आवड आहे. आईने मला सांगितले, ‘‘तुला केवळ देवासाठीच गायचे आहे, पैसे किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही.’’ आईचे हे बोलणे माझ्या मनावर एवढे बिंबले आहे की, प्रत्येक वेळी गाणे म्हणतांना मला तिच्या या वाक्याची आठवण होते.
४. जन्म देणार्या आईपेक्षा आश्रमातील सहसाधिका श्रेष्ठ असल्याचे सांगणे
एकदा आई सेवेनिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा मी आईला भ्रमणभाष केला. मला तिची आठवण येऊन रडायला येत होते. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘जन्म देणार्या आईपेक्षा तुला आश्रमात लहानाचे मोठे करणार्या तुझ्या सर्व ताई आहेत ना, त्या श्रेष्ठ आहेत.’’
५. ‘आंतरिक साधना वाढवणे, हेच सौंदर्यप्रसाधन आहे’, असा आध्यात्मिक दृष्टीकोन मुलीला देणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
समाजात मुली मेकअप करतांना (सौंदर्यप्रसाधने लावतांना) दिसतात; परंतु आईने मला नेहमी साधे रहाण्याची सवय लावली आहे. आई मला सांगायची, ‘‘आंतरिक साधना वाढवणे’, हेच आपले सौंदर्यप्रसाधन आहे. त्यामुळे तू सतत साधनारत राहिलीस की, तुझा चेहरा सौंदर्यप्रसाधन केल्याप्रमाणे उजळेल.’’
६. भावनिक स्तरावर न रहाता मुलीवर साधनेचे संस्कार करणे
तिने मला लहानपणापासून आतापर्यंत कधीच भावनिक स्तरावर हाताळले नाही. तिने प्रत्येक प्रसंगात माझ्यावर साधनेचे संस्कार केल्यामुळेच मला साधनेतील आनंद अनुभवता येत आहे.
परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपेमुळेच महालक्ष्मीस्वरूप अशा आईच्या पोटी माझा जन्म झाला. हे माझे भाग्यच आहे. त्याबद्दल मी आपल्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सायली सिद्धेश करंदीकर (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची मुलगी), फोंडा, गोवा. (२६.११.२०२२)