गुजरातमध्ये हिंदुत्वाची सुनामी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गुजरात राज्यातून त्यांची राजकीय कारकीर्द चालू केली, त्याच राज्यात भाजपने विजयाचा चौकार मारला आहे. १५७ जागा मिळवत गुजरात राज्यात भाजपने इतिहास रचला आहे. गुजरातचे विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा असा कोणताही प्रमुख चेहरा नसतांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समोर ठेवून केलेला प्रचार यशस्वी ठरला आहे. गेल्या २७ वर्षांपासून गुजरात राज्यात केवळ भाजपच आहे. तेथे विकासाच्या प्रमुख सूत्रांसह गेल्या काही वर्षांत भाजपने श्रीराममंदिर पूर्ण करण्यासाठी घेतलेला पुढाकार, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित करणे यांसह हिंदुत्वाच्या सूत्रावर घेतलेली आश्वासक भूमिका हेच विजयाचे मुख्य कारण आहे. गुजरात राज्यात भाजपने एकही मुसलमान उमेदवार दिला नाही, हे विशेष होते. अपेक्षेप्रमाणे हिंदुद्रोही काँग्रेसची दयनीय अवस्था झाली असून हिंदुत्वाच्या सुनामीत काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

हिंदुत्व आणि विकास हेच यशाचे गमक !

गुजरात राज्यात निवडणुकीच्या पूर्वीच समान नागरी कायदा कार्यवाहीत आणण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती आणि निवडणुकीनंतर त्याची प्रत्यक्ष कार्यवाही चालू होईल, असे सांगितले होते. गुजरात राज्यात समान नागरी कायदा आणण्याचे दिलेले आश्वासन निश्चित हिंदूंसाठी आशादायी आहे. एकेकाळी दुष्काळी असलेल्या सौराष्ट्र-कच्छमध्ये आज नंदनवन आहे. राज्यात रस्ते, वीज, पिण्याचे पाणी यांची बहुतांश भागात चांगली सोय असून देशातील अनेक मोठे उद्योगही गुजरात राज्यात चांगल्या प्रकारे काम करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने तब्बल ४२ विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली नव्हती. यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश होता. असे असतांना ‘नागरिकांनी भाजपला मतदान केले म्हणजे नागरिकांनी ‘हिंदुत्वा’च्या विचारधारेलाच मतदान केले आहे’, हेच पुन्हा सिद्ध होते.

‘आम आदमी पक्षा’ने निवडणुकीसाठी पुष्कळ मोठ्या घोषणा केल्या होत्या; मात्र त्यांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही. काँग्रेस कमकुवत झाली आहे आणि त्यातही राहुल गांधी यांचा प्रभाव दिसत नाही. राहुल यांनी कितीही यात्रा केल्या, तरी त्यांच्याकडे नीतीमत्ता आणि राज्याच्या विकासासाठीची दूरदृष्टी नाही. गुजरातमध्ये पराभव होईल, हे राहुल यांना ठाऊक होते. त्यामुळेच त्यांनी गुजरातमध्ये प्रचार केला नाही, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

‘आप’चे पाय पसरणे चिंताजनक !

‘आप’ने गोवा राज्यानंतर गुजरात राज्यातही ५ आमदारांसह चंचूप्रवेश करण्यात यश मिळवले आहे. देश तोडण्याची भाषा करणार्‍या खलिस्तानवाद्यांचे समर्थन करणार्‍या, नागरिकांना सर्व सुविधा फुकट घेण्याची घातक सवय लावणार्‍या आणि धर्मांधांचे लांगूलचालन करणार्‍या आपने प्रत्येक राज्यात हळूहळू हात-पाय पसरणे, देशाच्या सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. ‘आप’ची आता राष्ट्रीय पक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा असून अरविंद केजरीवाल हे भाजपला सक्षम पर्याय म्हणून आप आणि स्वत:ला वर्ष २०२४ साठी पंतप्रधानपदाचे उमेदवार भासवण्यात यशस्वी होत आहेत.

हिमाचलमध्ये भाजपला अपयश !

हिमाचल प्रदेशात लोकांनी कोणत्याच पक्षाचे सरकार सलग २ वेळा निवडून न देण्याची परंपरा कायम ठेवत यंदा सत्तेच्या किल्ल्या काँग्रेसकडे दिल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसला असून तिकीट न मिळाल्याने पक्षांतर्गत अप्रसन्नता हेही एक प्रमुख कारण आहे. भाजपच्या २१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात मते गेली. बेरोजगारी आणि महागाई या प्रमुख सूत्रांभोवती असलेल्या हिमाचलच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘१ लाख बेरोजगारांना नोकरी देणे, जुन्या निवृत्तीवेतन योजनेची कार्यवाही करू’, अशी आश्वासने दिली. त्यालाच पुढे करत नागरिकांनी यंदा राज्य काँग्रेसच्या झोळीत टाकले.

आत्मचिंतन आवश्यक !

गेल्या १५ वर्षांपासून कह्यात असलेली देहली महापालिका यंदा स्वत:कडे ठेवण्यास भाजप यशस्वी होऊ शकली नाही. सध्या ‘आप’वर देहलीत मद्य अनुज्ञप्ती (परवाना) घोटाळा, मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांसह अनेकांवर ‘ईडी’च्या धाडी यांसह भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत आहेत. असे असतांनाही वाढत्या महागाईच्या काळात केजरीवाल यांनी केलेल्या विनामूल्य वीज, पाणी, शिक्षण या घोषणांनाच लोकांनी अधिक प्राधान्य दिले, असेच म्हणावे लागेल. गेल्या १५ वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात देहलीतील कचर्‍याचे ढीग, अस्वच्छता, कारभारातील बेफिकिरी या सूत्रांवर ‘आप’ने बोट ठेवले आणि यात तो यशस्वी होऊ शकला. देहलीत मोठ्या प्रमाणात घुसखोर, तसेच अनेक भागात मुसलमान मते निर्णायक ठरत असून मृतवत होत चाललेल्या काँग्रेसपेक्षा भाजपला पर्याय म्हणून नागरिक ‘आप’ला मतदान करत आहेत. त्यामुळे देहलीसारख्या भागात भ्रष्टाचारविरहीत सुशासन देण्यासाठी जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते ते सर्व भाजपला या पुढील काळात करावे लागतील.

गुजरातच्या निवडणुकीमुळे प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेत हिंदुत्वाच्या सूत्रावर तितकेच आग्रही रहाणे, विकासाच्या सूत्रावर तडजोड न करणे, निवडणुकीत लोकांना दिलेली आश्वासने पाळणे या गोष्टींवर जर भर दिला, तर नागरिक भरभरून मते देतात, हेच परत एकदा या निमित्ताने सिद्ध झाले आहे. त्याचसमवेत ‘देशाचा कर बुडवत विनामूल्य वीज, पाणी फुकट देणार्‍यांना आम्ही निवडून देऊ’, असा घातक पायंडाही देशातील काही भागांत रूजत आहे, जो देशहितासाठी निश्चित त्रासदायक आहे !