धारणी (जिल्हा अमरावती) येथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित !

अमरावती – जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील एका शाळेतील १३ वर्षांच्या विद्यार्थिनीसमवेत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध ५ डिसेंबरच्या रात्री विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर नोंद घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या आदेशान्वये धारणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी ६ डिसेंबर या दिवशी शिक्षकाच्या निलंबनाचा आदेश काढला. प्रशांत सोनार (वय ४२ वर्षे) असे निलंबित शिक्षकाचे नाव आहे.

‘आरोपी सोनार यांनी विद्यार्थिनीला टाचणी आणण्यासाठी पाठवले. ‘त्यांनी मागोमाग येऊन आपल्यासमवेत असभ्य वर्तन केले’, अशी तक्रार पीडित विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सोनार यांच्यावर तात्काळ विनयभंग, तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. न्यायालयाने सोनार यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

संपादकीय भूमिका 

असे अनैतिक वर्तन करणारे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ?