बळजोरी किंवा फसवून केलेले धर्मांतर हे गंभीर सूत्र ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, बळजोरीने किंवा फसवून केलेले धर्मांतर, हे  गंभीर सूत्र आहे. बळजोरीने होत असलेल्या धर्मांतराच्या संदर्भात भाजप नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ डिसेंबरपासून चालू होणार आहे.

न्यायमूर्ती एम.आर्. शाह आणि न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार यांच्या खंडपिठाने धर्मांतराच्या प्रकरणावर सुनावणी करतांना सांगितले की, दान आणि समाजसेवा ही चांगली गोष्ट आहे; पण धर्मांतरामागे कोणताही गुप्त हेतू नसावा. ‘देशात बळजोरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलणार’, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.