‘सुरेशने विमान उडवले’ आणि ‘अब्दुलने विमान उडवले’ यांचा पालटत असलेला सांगितला अर्थ !

पाटलीपुत्र (बिहार) येथील खान सर यांचा जुना व्हिडिओ प्रसारित !

काँग्रेसकडून खान सरांवर कारवाई करण्याची मागणी

शिक्षक खान सर

पाटलीपुत्र (बिहार) – येथील शिकवणीवर्ग चालवणारे प्रख्यात शिक्षक खान सर यांचा एक जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. यात ते विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतांना द्वंद समास (दोन्ही पदे समान महत्त्वाची असतात, त्याला द्वंद समास म्हणतात.) याची माहिती देत आहेत. त्यात त्यांनी उदाहरण देतांना ‘सुरेश’ आणि ‘अब्दुल’ या नावांचा एका वाक्यात उपयोग केल्यावर त्याचा अर्थ कसा पालटतो हे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र याला काँग्रेसने आक्षेप घेत खान सर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

१. खान सरांनी उदाहरण देतांना ‘सुरेशने विमान उडवले’ हे वाक्य सांगितले आणि नंतर याच वाक्यात नावाचा पालट करून ‘अब्दुलने विमान उडवले’ असे सांगितले. यात ‘अब्दुलने विमान उडवले म्हणजे उद्ध्वस्त केले’, असे त्यांनी सांगितले.

२. काँग्रेसने नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी या वाक्याला आक्षेप घेत खान सर यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच ‘या व्हिडिओमध्ये जे लोक हसत आहेत, त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे’, असेही त्या म्हणाल्या.

३. दुसरीकडे सामाजिक माध्यमांतून अनेकांनी खान सर यांचे समर्थनही केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, खान सरांचे विधान व्यंगात्मक असून या व्हिडिओचा केवळ काही भाग प्रसारित केला जात आहे.

संपादकीय भूमिका

खान सरांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याविषयी काँग्रेस कधीच बोलणार नाही; मात्र हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणण्यात मात्र काँग्रेस सर्वांत पुढे असणार !