तमिळनाडूतील ऐतिहासिक अरुणाचलेश्‍वर मंदिरातील देवतेच्या मूर्तीच्या चेहर्‍यावरच लावला सीसीटीव्ही कॅमेरा !

भाविकांच्या विरोधानंतर हटवण्यात आला कॅमेरा !  

देवतेच्या मूर्तीच्या चेहर्‍यावर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा (डावीकडे) कॅमेरा हटवल्यावर मूर्तीची झालेली हानी (उजवीकडे)

तिरुवन्नामलाई (तमिळनाडू) – येथील अरुणाचलेश्‍वर मंदिरामध्ये एका मूर्तीच्या चेहर्‍यावरच थेट सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला. भाजपने यावरून राज्यातील द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् -द्रविड प्रगती संघ) सरकारवर टीका केली आहे. भाविकांच्या विरोधानंतर कॅमेरा हटवण्यात आला.

या मंदिरात ५ आणि ६ डिसेंबर या दिवशी दीपम् उत्सव असणार आहे. या वेळी ३० लाख भाविक येण्याची शक्यता आहे. ६ डिसेंबर १९९२ या दिवश बाबरी ढाचा पाडण्यात आला होता. त्यामुळे देशातील बहुतांश मुसलमान आणि निधर्मीवादी हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सुरक्षेनिमित्त मंदिरामध्ये ५५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यात एक सीसीटीव्ही कॅमेरा मंदिराच्या आतमधील ७० फूट उंच कट्टई गोपूरम्वरील द्वारपालाच्या मूर्तीच्या चेहर्‍यावर लावण्यात आला. जेव्हा भाविकांनी हे पाहिले, तेव्हा त्यांनी विरोध करत गोंधळ घातला. त्यानंतर कॅमेरा हटवण्यात आला; मात्र त्यात मूर्तीचा चेहरात विद्रूप झाला. त्यानंतर अधिकार्‍यांनी मूर्तीचा चेहर्‍यावर प्रक्रिया करून तो नीट करून घेतला.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

द्रमुक सरकारला मूर्तीचा सन्मान नाही ! – भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी म्हटले की, राज्यातील द्रमुक सरकार हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचा सन्मान नाही. देवतेच्या मूर्तीच्या चेहर्‍यावर खिळा ठोकून तेथे सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे; कारण याचे व्यवस्थापन नास्तिक ‘हिंदु धार्मिक आणि धर्मार्थ बंदोबस्त विभाग’ करत आहे. ज्या व्यक्तीला डोके आहे, तो कदापी असे करणार नाही. द्रमुक सरकारने ही जाणीवपूर्वक केलेली कृती आहे; कारण अल्पसंख्यांकांना खुश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. ‘आता मूर्तीच्या हानीचे दायित्व कोण घेणार ?’, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

अण्णामलाई यांनी आरोप केला की, देवतांचे सोन्याचे प्राचीन दागिने वितळवून त्याच्या विटा केल्या जात आहेत. यातून भ्रष्टाचाराचा मार्ग प्रशस्त केला जात आहे. द्रमुक सरकार हिंदूंच्या आध्यात्मिक परंपरांचा सतत अवमान करत आहे. जनता आणि देवता त्याला क्षमा करणार नाही. सरकारने मंदिराच्या पुजार्‍यांचा प्रशिक्षणाचा कालावधीही ५ वर्षांवरून १ वर्षावर आणला आहे. द्रमुक सरकार त्याची विचारसरणी मठांवर थोपवू पहात आहे. सरकार नास्तिक असले, तरी त्याने राज्यातील लोकांची संस्कृती, परंपरा आदींचे संरक्षण करणे अपेक्षित आहे.

संपादकीय भूमिका

असे कृत्य चर्च किंवा मशिदी येथे करण्याचे धाडस द्रमुक सरकारने केले असते का ? प्राचीन स्मारकांची हानी केल्यावरून सरकारच्या विरोधात गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !