शिस्तप्रिय आणि प्रेमळ स्वभावाच्या अन् आईप्रमाणे प्रेम करणार्‍या सासूबाई – कै. (श्रीमती) सुमन गडकरी (वय ८७ वर्षे) !

श्रीमती सुमन गडकरी

‘माझ्या सासूबाईंना (श्रीमती सुमन गडकरी यांना) मी ‘आई’ म्हणायचे. त्यांनी मला आईप्रमाणेच प्रेम दिले. कधीतरी त्या मला रागवायच्या; पण तेवढेच प्रेमही करायच्या. त्या कडक आणि शिस्तप्रिय होत्या. त्या प्रत्येक काम वेळेत पूर्ण करायच्या. वर्ष १९९४ मध्ये त्या मोहोपाडा (रसायनी, रायगड) येथील शाळेतून ‘मुख्याध्यापिका’ या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर त्या तुंग (सांगली) येथे रहायला गेल्या. सासूबाईंमध्ये इतरांना समजून घेणे, त्यांच्याशी जवळीक करणे आणि इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हे गुण होते. निवृत्त होऊन तुंग (सांगली) येथे रहायला गेल्यावर त्या गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवत असत. २१.११.२०२२ या दिवशी त्यांचे निधन झाले. मला त्यांच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. नीला रमेश गडकरी

१. शिस्तप्रिय जीवन : आई सकाळी १० वाजता शाळेत जायच्या. शाळेत जाण्यापूर्वी त्या सगळा स्वयंपाक करून, डबा भरून वेळेत बाहेर पडायच्या. असे कधीही झाले नाही की, घाई गडबड होऊन त्यांच्याकडून काही करायचे राहिले आहे.

२. धार्मिक वृत्ती : आई देवाची पोथी वाचत. त्यांना अनेक स्तोत्रे पाठ होती. संध्याकाळी त्या स्तोत्रे म्हणत आणि माझ्या जुळ्या मुलींकडून (आताच्या सौ. रसिका सुदेश दळवी (गोवा) आणि सौ. राधिका सुधीर तावरे (पुणे) यांच्याकडून) ‘प्रार्थना, रामरक्षा, मारुतिस्तोत्र, शुभं करोति’ इत्यादी म्हणून घेत असत.

३. उत्साहाने स्वयंपाक बनवून सुनेलाही प्रेमळपणाने खाऊ घालणे : आई कितीही दमून आल्या, तरी अतिशय उत्साहाने त्या स्वयंपाक बनवायला सिद्ध असायच्या. ‘स्वयंपाक करणे’, हा त्यांच्या आवडीचा विषय होता. नीटनेटका आणि अल्प वेळेत उत्तम स्वयंपाक बनवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मी हे सर्व अतिशय जवळून पाहिले आहे. मला त्यांच्याकडून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. कधी त्यांनी पुरणाचा स्वयंपाक केला, तर त्या मला आधी जेवायला बसवून गरम पुरणपोळी खाऊ घालायच्या.

४. सनातन संस्थेशी संपर्क : आईंना वाचनाची पुष्कळ आवड होती. आमचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर आम्ही त्यांना सनातन-निर्मित ग्रंथ वाचायला दिले. नंतर आम्ही पती-पत्नी पूर्णवेळ साधना करण्यासाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहायला गेलो.

५. आश्रमातील सेवा आनंदाने करणे आणि ‘आश्रम हेच सर्वस्व आहे’, असे सासूबाईंना वाटू लागणे : वर्ष २०१८ मध्ये आई आश्रमात रहायला आल्या. त्या भाजी निवडणे, नामजपासाठी माळा बनवणे, कापूर डबीत भरणे किंवा अन्य कोणतीही सेवा आनंदाने करायच्या. आरंभी आईंना ‘मला आश्रमात रहायला जमेल का ?’, असे वाटत होते; पण आश्रमात राहिल्यावर त्यांचे विचार पालटले आणि ‘आश्रम हेच माझे सर्वस्व आहे’, असे त्यांना वाटू लागले. आश्रमातील सेवा सातत्याने आणि मनापासून केल्यामुळे त्यांची साधना होऊ लागली. वर्ष २०१९ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.

६. सासूबाईंचे आजारपण : जसजसे आईंचे वय वाढत गेले, तसतसे त्यांना काही गोष्टींचे आकलन होत नव्हते. त्यांच्या काही गोष्टींवर त्यांचे नियंत्रण रहात नव्हते; म्हणून मी त्यांना साहाय्य करू लागले.

६ अ. पलंगावरून पडल्यामुळे पुष्कळ लागूनही सासूबाईंनी शांतपणे सर्व सहन करणे : आईंना वारंवार शौचाला व्हायचे. एकदा रात्री १.४५ वाजता मला जाग आली. तेव्हा आई पलंगावर दिसल्या नाहीत; म्हणून मी पटकन उठले. तेव्हा त्या पलंगावरून खाली पडल्या होत्या. त्यांना बरेच लागले होते. त्यांच्या डोळ्यांच्या वरच्या बाजूला पलंगाची कड लागून त्यांना जखम झाली होती आणि त्यातून बरेच रक्त आले होते. एवढे लागूनही त्यांनी थोडासाही आवाज केला नाही. त्या शांत होत्या.

६ आ. ‘जेवण केले नाही, तर परात्पर गुरु डॉक्टरांना ते आवडत नाही’, असे सांगितल्यावर सासूबाईंनी जेवण करणे : काही दिवसांनी आईंचे जेवण न्यून झाले. त्यांना विस्मरणही होऊ लागले. एकदा त्यांना प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) छायाचित्र दाखवून मी विचारले, ‘‘हे कोण आहेत ?’’ तेव्हा त्यांनी गुरुदेवांना बरोबर ओळखले. मी त्यांना सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांना जेवले नाही, तर आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला जेवावे लागेल !’’ तेव्हा त्या लगेच जेवायला लागल्या.

७. सासूबाईंच्या आजारपणात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे मिळालेले अनमोल साहाय्य !

७ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सासूबाईंसाठी दिलेला नामजप केल्यावर त्यांचा त्रास उणावणे : आईंवर अनिष्ट शक्तींची सातत्याने आक्रमणे होत होती. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना त्यांना अधिक त्रास व्हायचा. तेव्हा मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना त्रासाविषयी सांगून नामजप विचारत असे. हा नामजप केल्यावर त्यांना होणार्‍या त्रासाचे प्रमाण उणावत असे.

७ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या दृष्टीकोनांमुळे सासूबाईंची सेवा करतांना थकवा किंवा नकारात्मक विचार न येणे : आईंची सेवा करतांना येणार्‍या अडचणी, घडलेले प्रसंग अन् ‘त्यावर कसा दृष्टीकोन ठेवायचा ?’, याविषयी मी वेळोवेळी सद्गुरु राजेंद्रदादांना विचारायचे. त्यांनी दिलेल्या दृष्टीकोनांनुसार मी प्रयत्न करायचे. त्यामुळे मला कधी थकवा न येता आनंदाने त्यांची सेवा करता आली. ‘सेवा करायला नको’, असा नकारात्मक विचारही माझ्या मनात कधी आला नाही.

८. निधनानंतर

अ. आईंचा प्राण गेला. तेव्हा त्यांना थोडाही त्रास झाला नाही. त्यांचा प्राण गेलेला आम्हाला कळलेही नाही.

आ. आईंच्या निधनानंतर थोड्या वेळाने मला माझे शरीर पुष्कळ हलके आणि शांत वाटू लागले.

ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. नीला रमेश गडकरी ((कै. (श्रीमती) सुमन गडकरी यांची मोठी सून, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.११.२०२२)

इतरांना प्रेमाने साहाय्य करणार्‍या आणि पू. रमेश गडकरी यांच्याकडे ‘अध्यात्मातील मार्गदर्शक’ या दृष्टीने पाहून त्यांचे आज्ञापालन करणार्‍या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी !

कै. (श्रीमती) सुमन गडकरी यांच्या नातीला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. रसिका दळवी

१. आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती – आजी (श्रीमती सुमन हनुमंत गडकरी)

१ अ. शालेय जीवनात आजीच्या चतुरस्त्र ज्ञानाचा लाभ होणे : ‘माझ्या आजीला वाचनाची पुष्कळ आवड असल्याने तिला प्रत्येक विषयाचे ज्ञान असायचे. मला माझ्या शालेय जीवनात त्याचा पुष्कळ लाभ झाला. माझे बालपण आजीच्या अनेक आठवणींनी समृद्ध झाले आहे.

१ आ. शाळेतील एक बाई आजीला भेटण्यासाठी सांगलीला येणे, आजीला पाहून त्यांना रडू येणे आणि ‘तुझ्या आजीमुळे शाळेतील माझे दिवस अतिशय सुखकर गेले’, असे त्यांनी सांगणे : ‘मुख्याध्यापक’ पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर रसायनी, रायगड येथून तुंग (जि. सांगली) या गावी येऊन राहिली. आजी इतक्या लांब रहात असूनही तिच्या सहकार्‍यांना नेहमीच तिची आठवण यायची आणि ते तिला भेटण्यासाठी सांगलीला येत असत. एकदा आजीच्या शाळेतील एक बाई आजीला भेटण्यासाठी आमच्या घरी आल्या होत्या. आजीला बघताक्षणी त्यांनी तिला आलिंगन दिले आणि पुष्कळ रडू लागल्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुला माहीत नसेल; पण तुझी आजी, म्हणजे माझी आईच आहे. त्यांच्यामुळे माझे शाळेतील दिवस अतिशय सुखकर गेले. त्या मला नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करायच्या आणि माझी मातृवत् काळजी घ्यायच्या.’’ आजीमध्ये संघभाव होता. त्यामुळे तिने अनेक लोकांना जोडून ठेवले होते.

१ इ. संसारातील सर्व नाती टिकवून ठेवण्यासाठी पुष्कळ उपयोगी पडलेली आजीची बहुमूल्य शिकवण ! : माझे लग्न ठरल्यानंतर मी सांगलीला आजीकडे गेले होते. तेव्हा आजीने मला सांगितले, ‘‘तुला जर चांगली सून व्हायचे असेल, तर तू तुझ्या आईचा आदर्श घे. काही गोष्टींमुळे आमच्यात मतभेद व्हायचे; पण तिने कधीच मला प्रत्यूत्तर दिले नाही किंवा तुम्हा मुलींना माझ्यापासून तोडले नाही. भविष्यात तू नोकरीनिमित्त किंवा अन्य काही कारणांनी तुझ्या सासरच्या माणसांपासून विभक्त राहिलीस, तरी त्यांच्यापासून वेगळी होऊ नकोस. थोडे दिवस तुला त्यांचे मन सांभाळावे लागेल; परंतु काही दिवसांनी किंवा वर्षांनी का होईना, असा एक दिवस येईल की, ते सर्व जण तुझे मन सांभाळतील !’’ आजीची ही शिकवण मला संसारात पुष्कळ उपयोगी ठरली.

१ ई. आजीने उतारवयात वनौषधींचा अभ्यास करून औषधे देणे : आजीला नवीन नवीन गोष्टी शिकायला पुष्कळ आवडायचे. तिने तिच्या उतारवयात वनौषधींचा एक कोर्स (अभ्यासक्रम) पूर्ण केला होता. त्यामुळे ती वेगवेगळ्या आजारांवरील औषधे सांगत असे. तिने दिलेल्या औषधांचा लोकांना पुष्कळ लाभ होत असे.

१ ई १. एक व्यक्तीने घरी येऊन आजीकडून औषध मागतांना ‘मंत्र म्हणत औषध द्या’, असे सांगितल्यावर नातीला आश्चर्य वाटणे आणि आजीने ‘मी धन्वंतरीचा एक मंत्र म्हणून धन्वंतरि देवतेला प्रार्थना करते’, असे सांगणे : वर्ष २०११ मध्ये मी बाळंतपणासाठी माहेरी होते. एके दिवशी आमच्या घरी एक व्यक्ती आजीला शोधत आली. आजीने तिला काहीतरी औषध दिले. त्या वेळी ती व्यक्ती म्हणाली, ‘‘गडकरीबाई, तुम्ही औषधे देतांना नेहमी जे मंत्र म्हणता ना, तेही म्हणा, म्हणजे रुग्णाला लवकर बरे वाटेल !’’ तेव्हा मला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण ‘आजीला बर्‍याच वनौषधींची माहिती आहे’, ही गोष्ट मला ठाऊक होती; पण लोक घरी येऊन तिच्याकडून औषधे घेतात’, हे मी प्रथमच पहात होते. ती व्यक्ती गेल्यानंतर मी आजीला विचारले, ‘‘आजी, तू कसला मंत्र म्हणतेस ?’’ त्यावर आजी हसून म्हणाली, ‘‘काही नाही गं, मी केवळ धन्वंतरीचा एक मंत्र म्हणते आणि धन्वंतरि देवतेला प्रार्थना करते की, ‘या व्यक्तीला जी व्याधी झाली आहे, ती व्याधी या औषधाने बरी होऊ दे, या औषधांचा गुण येऊ दे.’

त्या लोकांनीही हा मंत्र म्हटला, तरी चालते; पण इथे गावातील लोक पुष्कळ श्रद्धाळू आहेत आणि ते फारसे शिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना असे वाटते की, मीच हा मंत्र म्हणायला हवा.’’ हे सगळे आजी सेवा म्हणून करत असे.

२. पू. बाबांचे (पू. रमेश गडकरी यांचे) आज्ञापालन करून आश्रमात रहायला आल्यावर आजीने मुलाकडे ‘मुलगा’ म्हणून न पहाता ‘अध्यात्मातील मार्गदर्शक’ या दृष्टीने पहाणे : पू. बाबांनी (पू. रमेश गडकरी यांनी) आजीला आश्रमात रहायला सांगितले. त्या वेळी तिच्या मनाचा संघर्ष झाला, तरी तिने परिस्थिती स्वीकारली आणि आश्रमजीवनाशी जुळवून घेऊन स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घेतली. आश्रमात रहायला आल्यानंतर आरंभी आजीकडून काही चुका झाल्यास पू. बाबा तिला त्यांची जाणीव करून द्यायचे. तेव्हा तिचा संघर्ष व्हायचा; पण नंतर ती पू. बाबांचे मार्गदर्शन घेऊन त्या स्थितीतून बाहेर यायची. ती पू. बाबांकडे ‘मुलगा’ म्हणून नव्हे, तर ‘अध्यात्मातील मार्गदर्शक’ म्हणून पहात होती. ती नेहमी म्हणायची, ‘‘रमेशमुळे मला आश्रमात रहाण्याची संधी मिळाली आणि साधना करता आली.’’

३. साधनेचे महत्त्व जाणून आजीने पंतवंडांना नामजपादी उपाय करायला सांगणे : पूर्वी आजी भ्रमणभाषवरून माझ्याशी बोलतांना माझ्या मुलांच्या अभ्यासाविषयी बोलायची. ती मुलांच्या आरोग्याचीही काळजी करायची. नंतर कोरोना महामारीच्या काळात तिला साधना करण्याची अपरिहार्यता लक्षात आली. त्यामुळे ती मला सांगू लागली, ‘‘तू मुलांकडून नियमित नामजप करून घे. ते फार महत्त्वाचे आहे.’’

४. आजीच्या मृत्यूच्या दिवशी आईचे बोलणे ऐकून सासू-सून यांच्यातील ‘अवघड नात्या’चा प्रवास ‘आध्यात्मिक नात्या’पर्यंत आल्याने कृतज्ञता वाटणे : आजीच्या एक वर्षाच्या आजारपणात माझ्या आईने (सौ. नीला रमेश गडकरी यांनी) आजीची अत्यंत मनोभावे सेवा केली. आजीच्या मृत्यूच्या दिवशी आई मला म्हणाली होती, ‘‘आता मला आईंना (सासूबाईंना) सोडून कुठेच जावेसे वाटत नाही. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करायला मिळाली पाहिजे’, असे मला वाटते.’’ त्या वेळी ‘देवाने आई आणि आजी यांच्यातील (सासू-सून यांच्यातील) ‘अवघड नात्याचा’ प्रवास ‘आध्यात्मिक नात्यापर्यंत’ आणून संपवला’, या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

५. आजीच्या निधनानंतर

अ. ‘आजी’ ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आईइतकीच महत्त्वाची होती. आम्हा तिघी बहिणींवर संस्कार करणे, आम्हाला शिस्त लावणे इत्यादी गोष्टी आईच्या इतक्याच आजीनेही केल्या. त्या सर्व आठवणी आणि संस्कार यांच्या माध्यमातून आजी नित्य आमच्या स्मरणात राहील !

आजीच्या बटव्यामुळे आरोग्य आणि तिच्या गोष्टींमुळे बालपण माझे समृद्ध झाले ।
माझ्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आजी, आज या जगाचा निरोप घेऊन गेली ।।

आ. मी ‘व्हिडिओ कॉल’द्वारे आजीचे अंतिम दर्शन घेतले. तेव्हा माझे मन अतिशय शांत झाले. तिच्या चेहर्‍याकडे पाहून मला फार समाधान वाटले.

समाजात अशा अनेक वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांना उतारवयात घर-संसार सोडून साधना करणे अवघड वाटते. तरुणांना स्वतःतील स्वभावदोष घालवणे आणि स्वतःमध्ये सकारात्मक पालट करणे अवघड वाटते; परंतु आजीला मात्र उतारवयात या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या. त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. रसिका सुदेश दळवी (कै. (श्रीमती) सुमन गडकरी यांची नात), पर्वरी, गोवा. (२१.११.२०२२) ॐ

कलागुणांना प्रोत्साहन देणार्‍या आणि आधुनिकता जपतांना धर्माचरण करण्याचा आदर्श समोर ठेवणार्‍या कै. (श्रीमती) सुमन गडकरी !

सौ. राधिका सुधीर तावरे

१. नातींना कलागुण वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे : ‘माझी आजी शिक्षिका असल्याने ती आमचा अभ्यास घ्यायची. कोणतीही स्पर्धा असू दे, ती प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला उद्युक्त करायची. आजीला सतत व्यस्त रहायला आवडायचे. आजीला विणकाम, भरतकाम आणि शिवणकाम करायला उत्तम प्रकारे येत असे. तिने मला विणकाम करायला शिकवले होते. ती मला नेहमी म्हणायची, ‘‘कोणतीही असू दे; पण अंगी कला असणे पुष्कळ आवश्यक आहे.’’

२. अनेक गोष्टी सांगून आजीने समृद्ध केलेले बालपण ! : आजीकडे गोष्टींचा मोठा खजिनाच होता. परीकथा, बोधकथा, संतमहात्मे आणि राष्ट्रपुरुष यांच्या कथा, अशा अनेक गोष्टी सांगून तिने आमचे बालपण समृद्ध केले. ‘आम्ही पुष्कळ वाचन करावे’, असा तिचा आम्हाला आग्रह असायचा.

३. आजीने देवाधर्माचे संस्कार करणे आणि ‘आधुनिकता जपतांना आपला धर्म सोडायचा नाही’, याचा आदर्श समोर ठेवणे : स्वतः नोकरी करत असूनही आजी घरात बरेच सोवळे पाळत असे. तिच्यामुळे आम्हाला देवाधर्माचे करणे आणि कुलाचार पाळणे, या सगळ्यांची सवय लागली. कोणताही सण असेल, तर ‘त्या सणाचे वैशिष्ट्य काय आहे ?’, हे आम्हाला आजीकडून कळत असे. असे असले, तरी ती तितकीच आधुनिक विचारांचीही होती. ‘आधुनिकता जपतांना आपला धर्म सोडायचा नाही’, याचा आदर्श तिने नेहमीच आमच्या समोर ठेवला.

४. नात आणि जावई यांची काळजी घेणारी प्रेमळ आजी ! : माझ्या लग्नानंतर मी मिरज येथे रहायला होते. तेव्हा माझ्याकडे तिचे नेहमी लक्ष असायचे. ती मला नेहमी सांगायची, ‘‘तुझे आई-बाबा लांब रहातात. ते तिथे साधना करतात. तेव्हा कधीही काही अडचण वाटल्यास तू मला सांग.’’ मी आणि माझे यजमान तुंगला गेलो की, ती ‘जावई’ म्हणून यजमानांचे पुष्कळ आदरातिथ्य आणि कौतुक करायची. आजी असूनसुद्धा तिने आमच्यावर आईसारखी माया केली.

५. नोकरी शोधतांना आणि चित्रकलेचे पदव्युत्तर शिक्षण (‘मास्टर डिग्री’) घेत असतांना आजीने पुष्कळ साहाय्य करणे : लग्नानंतर मी नोकरी शोधत होते. तेव्हा ‘नोकरी नेमकी कशी शोधावी’, हे मला कळत नव्हते. त्या वेळी आजीने मला पुष्कळ साहाय्य केले. ती म्हणायची, ‘‘तुझ्याकडे कला आहे. ज्याच्याकडे कला असते, तो माणूस कधीच उपाशी रहात नाही.’’ आजी स्वतः एक कलाकार होती. मी चित्रकलेच्या क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण (‘मास्टर डिग्री’) घेत असतांना त्याच्या शोधप्रबंधासाठी तिने मला पुष्कळ महत्त्वपूर्ण माहिती दिली.’

– सौ. राधिका सुधीर तावरे (कै. (श्रीमती) सुमन गडकरी यांची नात, मोठ्या मुलाची मुलगी), शिवणे, पुणे. (२७.११.२०२२)

नातींना स्वावलंबी बनवणार्‍या आणि सेवा अन् आश्रमजीवन यांची ओढ असलेल्या कै. (श्रीमती) सुमन गडकरी !

सौ. रमणी कुलकर्णी

१. नातींना सर्व कामे शिकवून त्यांना स्वावलंबी बनवणे : ‘आम्हा तिघी बहिणींना स्वावलंबी बनवण्यात आजीचा वाटा मोठा होता. इयत्ता सहावीत असतांना मी २ वर्षे आजीकडे शिकायला होते. तेव्हा तिने मला ‘घरातील आणि बाहेरची बरीच कामे कशी करायची’, हे शिकवले.

२. आजोबांना अर्धांगवायू झाल्यावर त्यांची शुश्रूषा करतांना आजीने त्यांना स्वतःची कामे करायला शिकवून स्वावलंबी बनवणे : माझ्या आजोबांना (कै. हनुमंत गडकरी यांना) अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे त्यांच्या शरिराच्या डाव्या बाजूत शक्ती नव्हती. आजीने बर्‍याच वैद्यांकडून औषधे आणून आणि आजोबांना मर्दन करून त्यांच्यावर उपचार केले. तिने ‘एका हाताने स्वतःची कामे कशी करायची ?’ हे आजोबांना शिकवले. तिच्या प्रयत्नांमुळे आजोबा एका हाताने घरातील कामे, उदा. पिण्याचे पाणी भरणे, चहा करणे या गोष्टी करायला शिकले.

३. प्रत्येक रविवारी मिरजेच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन आजीने स्वयंपाकघरात मनोभावे सेवा करणे : मी इयत्ता ६ वी – ७ वीत असतांना (वर्ष १९९९-२००० मध्ये) प्रत्येक रविवारी आजी आणि मी मिरज (जि. सांगली) येथे प्रशिक्षण केंद्रात सेवेसाठी जायचो. त्या वेळी ती स्वयंपाकघरात पुष्कळ मनोभावे सेवा करायची. सोमवार ते शनिवार तिचे शिवणकामाचे वर्ग असायचे, तरी एकाही रविवारची ही सेवा तिने कधी चुकवली नाही.

४. आजीला सेवा आणि आश्रमजीवन यांची लागलेली ओढ ! : आजी देवद, पनवेल येथील आश्रमात रहात असतांना मी तिला म्हणायचे, ‘‘आजी, तू माझ्या घरी पुण्याला थोडे दिवस रहायला ये.’’ तेव्हा ती म्हणायची, ‘‘नाही गं. इथे मला पुष्कळ सेवा असते. आता मला दुसरीकडे कुठेच करमत नाही. या आश्रमातच मला बरे वाटते.’’

५. आजीच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे : ‘आजीचे निधन झाले’, हे समजल्यानंतर मी देवद, पनवेल येथील आश्रमात गेले.

अ. आजीच्या खोलीत गेल्यावर तिच्याकडे पाहून मला पुष्कळ शांत वाटत होते. जणू ‘ती शांत झोपली आहे’, असे मला जाणवत होते.

आ. तिच्या चेहर्‍यावर लहान मुलांप्रमाणे भाव होता.

इ. मला त्या खोलीत पुष्कळ चांगले वाटले.

६. मुलगा चि. अभिराम याचा निरागस भाव

अ. माझा मुलगा चि. अभिराम (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४ वर्षे) याला आजी अशी झोपल्याचे पाहून आश्चर्य वाटले. ‘पणजी आता श्रीकृष्णाकडे चालली आहे; म्हणून तिला असे झोपवले आहे’, असे आम्ही त्याला सांगितले. तेव्हा तो आम्हाला आजीजवळ श्रीकृष्णाचे चित्र ठेवायला सांगू लागला. श्रीकृष्णाचे चित्र ठेवल्यानंतर तो शांत बसला.

आ. अग्नीसंस्कार कर्मासाठी आजीला आश्रमातून घेऊन गेल्यावर अर्ध्या घंट्याने अभिराम माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, ‘‘आई, पणजीआजी पालखीत बसून श्रीकृष्ण बाप्पाकडे गेली आहे.’’ नंतर तो सगळ्यांना सांगत होता, ‘‘आता आमची पणजी पालखीत बसून गेली आहे.’’

– सौ. रमणी हृषीकेश कुलकर्णी (कै. (श्रीमती) सुमन गडकरी यांची नात, मोठ्या मुलाची मुलगी) पुणे (२५.११.२०२२)

सेवेची तळमळ असलेल्या आणि आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्‍या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी !

१. अध्यात्माची आवड असल्याने मुलाने पूर्णवेळ साधना करण्याचा घेतलेला निर्णय आईने स्वीकारणे आणि कालांतराने स्वतःही आश्रमात येऊन रहाणे : ‘माझ्या आईला पहिल्यापासूनच अध्यात्माची आवड होती. ती देवपूजा, पोथीवाचन आणि नामजप करत असे. मी वर्ष २०१५ मध्ये पूर्णवेळ साधना करण्यासाठी देवद, पनवेल येथील आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिने मला विरोध केला नाही. कालांतराने वर्ष २०१८ मध्ये माझे भाऊ पू. रमेश गडकरी यांनी आईला ‘‘आश्रमात रहायला येणार का ?’’ असे विचारले. तेव्हा ती आश्रमात रहायला येण्यास सिद्ध झाली आणि तिने आश्रमजीवन सहजतेने स्वीकारले. तिने आश्रमातील साधकांशी सहजतेने बोलणे, त्यांच्याशी मिळून मिसळून रहाणे आणि सेवा करणे चालू केले.

२. सेवेची तळमळ असल्याने अनेक सेवा आत्मसात करणे : आई आश्रमात सांगितलेले सर्व नामजपादी उपाय प्रतिदिन पूर्ण करायची. आश्रमातील अनेक सेवा तिने आत्मसात केल्या. तिचे एक वैशिष्ट्य, म्हणजे ती कुठल्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नसे. मिळालेली प्रत्येक सेवा ती परिपूर्ण रीतीने करत असे. तिला सतत सेवेचा ध्यास असायचा. रुग्णाईत असतांनासुद्धा ती शक्य होईल, तेवढी सेवा करायची.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात असल्याने आईला त्रास सहन करण्याची शक्ती मिळणे : आई रुग्णाईत असतांना तिला रुग्णालयात नेले होते. तेथे तिच्या अनेक चाचण्या कराव्या लागल्या. ‘त्या वेळी होणारे त्रास सहन करण्याची शक्ती तिला परात्पर गुरु डॉक्टरांनीच दिली’, असे मला जाणवले. रुग्णाईत असतांना ‘आई सतत गुरुमाऊलींच्या अनुसंधानात आहे’, असे मला जाणवायचे.

४. निधनानंतर : आईचे निधन झाल्यावर तिचा चेहरा शांत होता. ‘ती झोपली असून तिचा आतून नामजप चालू आहे’, असे मला जाणवत होते.

‘आईला सद्गती मिळो’, हीच प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– श्री. उमेश हनुमंत गडकरी (कै. (श्रीमती) सुमन गडकरी यांचा धाकटा मुलगा), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.११.२०२२)