गुजरात : राज्यातून २९० कोटी रुपयांची रोकड, ५०० कोटींचे अमली पदार्थ आणि ४ लाख लिटर दारु जप्त !

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण

कर्णावती (गुजरात) – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर या दिवशी मतदान झाले. या मतदानाच्या आधी राज्यभरात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत २९० कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ, दारूचा साठा आणि भेटवस्तू जप्त करण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०१७ मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जप्त करण्यात आलेली रक्कम ही १० टक्के अधिक आहे.

वेगवेगळ्या यंत्रणांच्या साहाय्याने निवडणूक आयोगाने ही कारवाई केली. आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्याने वडोदरा (ग्रामीण) आणि वडोदरा (शहर) मतदारसंघात घातलेल्या धाडीत ४७८ कोटी रुपयांचे १४३ किलो मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यासह ६१ कोटी ९६ लाख रुपयांचे अन्य अमली पदार्थह, तसेच १४ कोटी ८८ लाख रुपयांची ४ लाख लिटर दारूही जप्त करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

  • ‘निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतली जातात’, असे सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक झाले असल्याने २९० कोटी रुपयांची रोकडे सापडणे, हे आश्‍चर्यकारक म्हणता येणार नाही. उलट जप्त केलेल्या रकमेपेक्षा वाटण्यात आलेली आणि जप्त होऊ न शकलेली रोकड किती असेल, याची कल्पना करता येत नाही !
  • दारुबंदी असणार्‍या राज्यात ४ लाख लिटर दारु जप्त करण्यात येते, यातून राज्यात दारुबंदीचे ढोंग चालू आहे, हे स्पष्ट होते !