जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीतही मुलाला पूर्णवेळ साधना करण्याची प्रेरणा देणारे नांदगाव (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. सुरेश लाड !

श्री. सुरेश लाड

१. एका व्यक्तीने वडिलांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे ते कर्जबाजारी बनणे

‘माझे वडील श्री. सुरेश नारायण लाड (वय ५९ वर्षे) हे जिल्ह्याचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे सभापती म्हणून कार्यरत असतांना त्यांनी एका व्यक्तीला साहाय्य केले होते. त्यामुळे त्या व्यक्तीने बाबांना आर्थिक लाभ करवून देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बाबांकडे ५ लाख रुपये मागितले. त्या बदल्यात ती व्यक्ती म्हणाली, ‘‘मी तुम्हाला १ कोटी रुपयांचे काम करून देतो.’’ बाबांनीही ‘मुलांचे भविष्य चांगले घडावे आणि मुलांना केवळ साधना करता यावी’, या विचाराने पैसे गुंतवले; परंतु ‘७ दिवसांत काम करून देतो’, असे म्हणालेली ती व्यक्ती आज ७ वर्षे होऊनही काम करून देत नाही. त्या व्यक्तीने आमचे पैसे लुबाडून स्वतःचे कर्ज फेडून आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला.

२. नवीन व्यवसायात कर्ज काढून पैसे गुंतवणे; पण त्यातही हानी झाल्याने कर्जाचा डोंगर आणखीन मोठा होणे

श्री. महेश लाड

त्यानंतर अन्य एका व्यक्तीने बाबांना सांगितले, ‘‘कांद्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही भागीदारी (पार्टनरशिप) करावी आणि थोडे पैसे गुंतवून कर्जातून बाहेर पडावे.’’ बाबा परिस्थिती समोर हतबल झाले होते. जे पैसे बुडले होते, ते मिळवण्याच्या हेतूने त्यांनी नवीन व्यवसायासाठी इतरांकडून कर्ज काढून ८ लाख रुपये गुंतवले. बाबांनी त्यांच्या भागीदारांसह कांद्याच्या ७ गाड्या बिहार येथे पाठवल्या; परंतु त्याही वेळी अघटित घडले. बिहारमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे सर्व गाड्या अडकल्या अन् सर्व कांदा खराब झाला. अशा प्रकारे त्यांना जे ३० लाखाचे उत्पन्न मिळणार होते, ते न मिळता कर्जाचा आणखी मोठा डोंगर झाला.

३. वडिलांनी पूर्वजन्मीचे प्रारब्ध आणि देवाण-घेवाण हिशोब फेडत असल्याचे सांगून कुटुंबियांना आधार देणे

कठीण परिस्थितीतही बाबा मनाने खचले नाहीत आणि त्यांनी आम्हा कुटुंबियांनाही खचू दिले नाही. ते स्वतः एकटे असतांना ढसाढसा रडायचे; परंतु आम्हा कुटुंबियांना त्यांनी रडू दिले नाही. ते सतत म्हणायचे, ‘‘हे माझे पूर्वजन्मीचे प्रारब्ध असेल. त्यामुळेच हे सर्व जण माझ्याशी जोडले गेले आहेत. माझा राहिलेला देवाण-घेवाण हिशोब देव फेडत आहे.’’ ते असे बोलल्यावर मला आश्चर्य वाटायचे. मी बाबांना म्हणायचो, ‘‘हे असे कसे असू शकते ? आपण एवढे काय पाप केले आहे की, देव आपली इतकी परीक्षा पहातोय.’’ तेव्हा बाबा लगेच म्हणायचे, ‘‘जे होते ते चांगल्यासाठीच !’’ बाबांच्या अशा बोलण्याने घरच्यांना पुष्कळ आधार वाटायचा.

४. वडील व्यवहारात पूर्णपणे फसल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांना सहन करण्याची शक्ती मिळणे आणि कठीण परिस्थितीतही कुटुंबियांना स्थिर राहून साधना करता येणे

माझे वडील एका बाजूला व्यवहारात फसत राहिले; परंतु दुसर्‍या बाजूला त्याही स्थितीत त्यांनी कुटुंबाला काही उणे पडू दिले नाही. या सर्व व्यवहारात त्यांनी जे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते, ते अस्तित्वच हरवून बसले. त्यांच्याकडे होती नव्हती, ती सर्व पुंजी त्यांनी व्यवहारात गुंतवली. स्वतःचे आणि आईचे सर्व दागिने गेले. स्वतःच्या कमाईने घेतलेली चारचाकी गाडी कर्ज फेडण्यासाठी विकली. काही दिवसांतच होत्याचे नव्हते झाले; परंतु हे सर्व सहन करण्याची शक्ती त्यांना केवळ गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अपार कृपेमुळेच मिळत होती; कारण आम्ही त्याही परिस्थितीत नित्यनेमाने साधनेचे प्रयत्न चालू ठेवले होते. बघता बघता कर्जाचा (५० ते ६० लाख रुपयांचा) डोंगर उभा राहिला असला, तरी ‘हा डोंगर गुरूंच्याच कृपेने अल्प होणार आहे’, या दृढ श्रद्धेमुळेच गेली ७ वर्षे इतकी कठीण परिस्थिती असतांनाही आई, बाबा, बहीण, मी आणि आजी सर्वजण स्थिर राहून साधनारत आहोत. ही केवळ आणि केवळ गुरुमाऊलीचीच कृपा आहे.

५. कुटुंबियांसाठी कठीण काळ चालू असूनही साधनेसाठी केवळ कृतज्ञताकाळ वाटणे

मागील काही वर्षांपासून माझ्या कुटुंबियांसाठी कठीण काळ चालू आहे; पण खरे पहायचे झाले, तर माझ्यासाठी हा केवळ कृतज्ञताकाळच आहे; कारण मागील साडेतीन वर्षे मी समष्टी सेवेत कार्यरत आहे. या कालावधीत जणू काही गुरुदेवांनीच जगण्याची नवी उमेद आणि दिशा दिली. सेवेच्या माध्यमातून गुरुमाऊलींनी मला पुष्कळ काही शिकवले आणि पुढेही नेले.

६. कोरोना महामारीतील दळणवळण बंदीमुळे सेवेमध्ये अडचणी येऊन निरुत्साह येणे

मागील २ वर्षांपासून चालू झालेल्या कोरोना महामारीमुळे माझ्या सेवेचा वेग पूर्णतः मंदावला. दळणवळण बंदी झाल्यानंतर मी घरीच होतो. माझे घर खेडेगावात असल्यामुळे मला पुष्कळ अडचणी आल्या. माझी सेवा बंद झाली. दळणवळण बंदी आणि इतर अडचणींमुळे मला ‘ऑनलाईन’ सेवा करण्याची संधी मिळाली नाही. सेवेचे सर्व कौशल्य गुरुमाऊलीने दिले आहे, तरी ते त्यांच्या चरणी अर्पण करता येत नव्हते. या गोष्टीची मला सतत खंत वाटत होती. त्यामुळे मला पुष्कळ निरुत्साह आला. त्यामुळे कोणत्याही सेवा माझ्याकडून तळमळीने होत नव्हत्या.

७. सेवा होत नसल्याने मनाचा संघर्ष होणे, तळमळ वाढल्यामुळे ‘हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत पुन्हा घरी परतायचे नाही’, असा दृढ निश्चय करणे अन् त्यासाठी वडिलांनी प्रोत्साहन देणे

‘गुरुदेवा, कधी या सर्व संकटांचे निवारण होणार ? आणि कधी मला पुन्हा एकदा तुमच्या चरणकमलांच्या सेवेसाठी रुजू होता येणार ?’, असे मी प.पू. गुरुदेवांना विचारायचो. घरी बसून काहीच होत नसल्यामुळे माझी अवस्था ‘जशी पाण्याविना मासोळी, तसा सेवेविना मी’, अशी झाली होती. मनामध्ये चालू असलेल्या संघर्षातूनच एक दृढ निश्चय झाला, ‘बस आता पुष्कळ वेळ घालवला. आता एकदा घरातून बाहेर पडलो, तर हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत पुन्हा घरी परतायचे नाही.’ हा माझ्या मनात आलेला विचार मी आई-बाबांना सांगितला. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. बाबा मला नेहमीच सांगायचे, ‘‘तुला धर्मवीर बनायचे आहे.’’ बाबांच्या या प्रेरणादायी बोलण्याने माझ्यातील क्षात्रतेज अखंड वाढतच रहाते. माझ्या या दृढ निश्चयामुळे मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्धार केला आणि काही दिवसांसाठी आश्रमात आलो.

८. ‘मुलाने धर्मवीर बनावे’ हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न सातत्याने अन् चिकाटीने करण्याचा मुलाने निश्चय करणे

माझे वडील मला जेव्हा संपर्क करतात, तेव्हा ते मला माझ्या ध्येयाची सातत्याने आठवण करून देतात. त्यामुळे मनामध्ये निर्माण झालेली ‘हिंदु राष्ट्रा’ची धगधगती ज्वाळा अजूनच प्रज्वलित होत रहाते. इतक्या संघर्षमय परिस्थितीतही बाबा माझ्या साधनेच्या दृष्टीने आणि मला पुढील धैर्यपूर्तीसाठी काहीच अल्प पडून देत नाहीत. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. माझ्या बाबांचे ‘मी धर्मवीर बनावे’, हे एकच स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी आणि गुरुदेवांचे आनंदी फूल बनण्यासाठी मी यापुढील व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न सातत्याने अन् चिकाटीने करण्याचा दृढ निश्चय गुरुदेवांच्या कृपेने करत आहे. ‘तरी तो त्यांनी माझ्याकडून पूर्ण करून घ्यावा’, अशी प्रार्थना मी श्रीगुरुचरणी, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कोमल चरणी कोटीशः शरणागतभावाने करतो.

गुरुदेवांच्याच कृपेने आश्रमात मला मोठ्या आणि प्रेमळ कुटुंबाचा सहवास मिळाला. तसेच सर्व साधकांकडून मातृवत् आणि पितृवत् प्रेम मिळाले. याविषयी मी गुरुचरणी शतशः ऋणी आहे.’

– श्री. महेश लाड (वय २५ वर्षे), (श्री. सुरेश नारायण लाड यांचा मुलगा) नांदगाव, सावर्डे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (२४.१२.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक