आजारी पडलेली महिला केवळ शाकाहारी असल्याने तिच्या औषधोपचारांचा व्यय (खर्च) देण्यास विमा आस्थापनाचा नकार !

‘ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समिती’कडून आस्थापनाला व्यय देण्याचा आदेश !

कर्णावती (गुजरात) – ‘तुम्ही शाकाहारी असल्यामुळे आजारी पडला असाल, तर औषधोपचारांसाठीचा खर्च मागण्याचा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही’, असे ‘इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ या आस्थापनाने म्हटले; मात्र ‘ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समिती’ने या विमा आस्थापनाचे म्हणणे फेटाळले, तसेच आजारी व्यक्तीला व्याजासह व्यय देण्याचा आदेश दिला. यासंदर्भात मिताली ठक्कर या महिलेने कर्णावती येथे ‘ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समिती’कडे तक्रार केली होती.

१. मिताली यांच्या वैद्यकीय अहवालानुसार ‘व्हिटामिन बी १२’च्या कमतरतेमुळे त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागले. शाकाहारी असल्यामुळे त्यांच्या शरिरामध्ये ‘बी १२’ची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली होती.

२. ‘ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समिती’ने यावर सुनावणी करतांना म्हटले की, शाकाहारी लोकांमध्ये ‘व्हिटामिन बी १२’ ची कमतरता असू शकते; पण यामुळे मिताली यांना त्रास झाला असेल, तर त्यात त्यांची चूक नाही. विमा आस्थापनाने त्यांना आलेले १ लाख रुपयांचे रुग्णालयाचे देयक व्याजासहत भरावे, असा आदेश दिला. यासह मिताली ठक्कर यांना झालेला मानसिक त्रास आणि न्यायविषयक लागलेल्या व्ययाचीही भरपाई विमा आस्थापनाने व्याज म्हणून दिलेला पैसा असेल, असेही यात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

मांसाहारामुळे कुणी आजारी पडले असते, तर विमा आस्थापनाने असेच केले असते का ?