पेशवाई पुन्हा यावी !

“ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि…” अथर्वशिर्षावर पुणे विद्यापीठात प्रमाणपत्र अभ्यासक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने ‘अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ चालू केला असून विद्यापिठाने त्याला मान्यता दिली आहे. यामुळे पुरोगाम्यांमध्ये अस्वस्थता आहे. ‘थोर’ पुरोगामी, शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील आघाडीचे नेते, इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती यांना आरक्षण मिळण्यासाठी लढा देणारे प्रा. हरि नरके यांनी ‘हा अभ्यासक्रम अंतर्भूत करून पुन्हा पेशवाई आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे’, असे म्हटले आहे. मुळात अथर्वशीर्ष आणि पेशवाई यांचा संबंध न समजण्यासारखा आहे. श्री गणेश हे समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहे. श्री गणेश काय ब्राह्मण समाजापुरता मर्यादित आहे का ? सामान्य हिंदूंच्या घरांत आजही मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांना रामरक्षा, अथर्वशीर्ष, मारुतिस्तोत्र शिकवले जाते. ‘केवळ ब्राह्मण मुलेच अथर्वशीर्ष म्हणतात ?’, असे कुठे आहे ? त्यातही पेशवाई चालू झाली वर्ष १७१३ मध्ये. अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. उपनिषदांची निर्मिती लाखो वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे ‘अथर्वशीर्षाचा अभ्यासक्रम विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करून पेशवाई आणण्याचा घाट कसा घातला जाईल ?’, याविषयी प्रा. नरके यांनी सविस्तरपणे समाजाला सांगितले असते, तर बरे झाले असते. हा केवळ अथर्वशीर्षाला विरोध नसून तो ब्राह्मण आणि संस्कृत भाषेला विरोध आहे. एकीकडे ‘संस्कृत भाषा केवळ ब्राह्मणांपुरती मर्यादित होती’, असा कांगावा संस्कृत विरोधकांकडून केला जातो. असे आहे, तर आता सर्वसामान्यांना संस्कृत भाषा आणि त्यातील श्लोक शिकवले जात असतांना पोटशूळ उठण्याचे कारण काय ? समाजातील सर्व वर्गांतील मुले जर संस्कृत शिकली, तर हिंदूंचे सर्व धर्मग्रंथ सर्वांनाच मुक्तपणे वाचता येतील. असे झाल्यास ‘हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये खरोखरच भेदभाव किंवा जातीव्यवस्था अंतर्भूत होती का ?’, हे समाजाच्या समोर येईल. प्रा. नरके यांना हे नकोसे वाटते का ? आणि त्याही पुढे जाऊन पेशवाई येणार असली, तर प्रा. नरके यांना वाईट वाटण्याचे कारण काय ? पेशवाईमुळे महाराष्ट्रातील सामान्य जनता भयमुक्त झाली. या काळात सुबत्ता आली आणि मुख्य म्हणजे महिलांच्या साक्षरतेसाठीही प्रयत्न झाले. सद्यःस्थितीत भारतात धर्मांधांनी जो हैदोस घातला आहे, तो पहाता पेशवाई परत येण्याचे स्वप्न सामान्य हिंदूंना पडू लागल्यास त्यात वावगे काय आहे ?

श्रद्धा वालकरविषयी बोला !

प्रा. नरके हे तसे स्त्रीमुक्तवादी. स्त्रीशिक्षण आणि समता यांसाठी आयुष्यभर झटणार्‍या सावित्रीबाई फुले या प्रा. नरके यांच्या दैवत आहेत. वर्ष १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या साहित्य संमेलनात प्रा. नरके कार्याध्यक्ष होते. आळंदीतील मुख्य मंदिरात असलेल्या अजान वृक्षाच्या परिसरात महिलांना म्हणे प्रवेश नव्हता. तो मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, असे ते सांगतात. याविषयी त्यांनी त्यांच्या ‘ब्लॉग’वर सविस्तरपणे लिहिले आहे. त्यांचा स्त्रीवाद सोयीचा आहे, हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते. श्रद्धा वालकर ही बहुजन समाजातील युवती होती. आळंदीतील अजान वृक्षाच्या परिसरात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी आघाडी उघडणारे प्रा. नरके यांना श्रद्धा वालकर आणि बहुजन समाजातील तिच्यासारख्या अनेक युवती ज्या धर्मांध मुसलमानांकडून लक्ष्य केल्या जात आहेत, त्यांच्याविषयी बोलावेसे वाटत नाही का ? अशा वेळी स्त्री समता कुठे जाते ? ‘हिंदु परंपरांना छेद देऊन काहीतरी कृती करणे आणि बहुजन समाजातील मुलींच्या मुळावर उठलेल्या धर्मांधांच्या विरोधात अवाक्षरही न काढणे हेच स्त्रीमुक्तीसाठीचे कार्य’, असे आहे का ? असे असेल, तर अशा कथित समाजसुधारकांनी पांघरलेला हा स्त्रीवादाचा बुरखा फाडणे आवश्यक आहे.

स्त्रीशिक्षणाविषयी पोटतिडकीने बोलणार्‍यांनी पेशव्यांना विसरू नये. थोर गांधीवादी लेखक धर्मपाल यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाविषयी लिहितांना ‘पेशवाईच्या काळात मुलींसाठी स्वतंत्र शाळा होत्या’, असा उल्लेख केला आहे. ‘धर्मपाल हे हिंदुत्वनिष्ठ नव्हे, तर गांधीवादी होते’, याचा येथे विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. अन्यथा हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या पुराव्यांना ‘खोटे’ सांगून हात झटकण्याची पुरोगामी टोळीला सवय आहे. भारतातील स्त्री शिक्षणाचा इतिहास सांगतांना पेशव्यांनी स्त्री शिक्षणाचे केलेले कार्य सांगण्याचे धारिष्ट्य प्रा. नरके यांनी दाखवावे. मुसलमान आक्रमकांच्या मनात पेशव्यांच्या पराक्रमाविषयी एवढा जरब होता की, बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री तीर्थक्षेत्री निघाल्यावर त्यांनी पेशव्यांच्या मातोश्रींचे सर्वच ठिकाणी पायघड्या घालून स्वागत केले. ज्या मराठा शासकाच्या राज्यातील स्त्री शत्रूच्या राज्यात मुक्त संचार करू शकते, हे त्या शासकाचे कर्तृत्व नव्हे का ? निवळ ब्राह्मण असल्यामुळे पेशव्यांच्या पराक्रमाचा, तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरव करण्याचे टाळणे, हा वैचारिक कोतेपणा आहेच; मात्र त्याही पुढे जाऊन हे समाजस्वास्थ्यासाठी घातक आहे.

पुरोगामित्वाचा फोलपणा !

एखाद्या चळवळीशी किंवा विचारांशी प्रामाणिक असणे, याचा अर्थ समाजातील अन्य विचारांना किंवा प्रवाहांना हीन लेखणे, असे नसते. आंबेडकरवादी, स्त्रीमुक्तीवाले किंवा पुरोगामी यांची हीच अडचण आहे. ‘आमचे विचार, आमचे तत्त्वज्ञान यांच्या पलीकडे जगात दुसरे काहीच चांगले नाही’, या भ्रमात ते वावरत आहेत. त्यामुळे समाजाला समृद्ध करणार्‍या हिंदुत्वासारख्या प्रवाहांचा ते अभ्यास करत नाहीत किंवा तो करतांना एकांगाने करतात. प्रा. नरके यांनी केलेल्या टीकेमागे हेच प्रमुख कारण आहे. ‘पुरोगामी’, ‘सुधारणावादी’, ‘आंबेडकरवादी’ ही त्यांची समाजात असलेली प्रतिमा त्यांना उंचावत न्यायची आहे. पुरोगामित्व, सुधारणावाद, निधर्मीवाद यांतील फोलपणा आता जनतेच्या लक्षात आला आहे. ‘हे ‘वाद’ समाजाला समृद्धीकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे आहेत’, हे जनतेने आता जाणले आहे. त्यामुळे प्रा. नरके करत असलेल्या दिशाहीन टीकेला जनता भीक घालणार नाही. भविष्यात जनतेने अशांचा वैचारिक प्रतिवाद करून त्यांना वठणीवर आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !

हिंदु राजांनी स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी शासनकर्त्यांनी पावले उचलावीत !