म्हैसुरू येथील भाजपच्या खासदाराच्या चेतावणीनंतर बसस्थानकावरील घुमट हटवले

बसस्थानकाची मशीदसदृश उभारणी केल्याने वाद

म्हैसुरू (कर्नाटक) – भाजपचे खसदार प्रताप सिंह यांनी दिलेल्या चेतावणीनंतर येथे म्हैसुरू-ऊटी रस्त्यावरील मशीदसदृश्य बसस्थानकावरील वादग्रस्त घुमट अंततः २७ नोव्हेंबर या दिवशी हटवण्यात आले. या बसस्थानकाच्या वर मध्यभागी एक मोठा आणि त्याच्या दोन्ही बाजूला एक-एक लहान, असे एकूण ३ घुमट बसवण्यात आले होते. त्यामुळे ‘हे बसस्थानक मशिदीप्रमाणे भासत असून ते घुमट न हटवल्यास मी बुलडोझर आणून ते पाडीन’, अशी चेतावणी सिंह यांनी १४ नोव्हेंबरला दिली होती.

हे घुमट हटवल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सिंह म्हणाले, ‘‘आजुबाजूला लहान आणि मध्यभागी मोठा घुमट असेल, तर त्या वास्तूला मशीद मानले जाते. त्यामुळे हे लहान घुमट काढून टाकण्याचे आदेश देणार्‍या जिल्हाधिकार्‍यांचे मी आभार मानतो.’’