५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सातारा येथील चि. यदुवीर दीपक डाफळे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. यदुवीर डाफळे हा या पिढीतील  एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

सातारा येथील चि. यदुवीर डाफळे (वय २ वर्षे) याच्या आईला गर्भारपणात आलेल्या अनुभूती आणि त्याच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. यदुवीर डाफळे

सौ. भक्ती डाफळे

१. जन्मापूर्वी

१ अ. गरोदर असतांना दळणवळण बंदीमुळे माहेरी रहावे लागणे; परंतु गुरुकृपेने ‘ऑनलाईन’ सेवा करता येऊन व्यष्टी साधनाही होणे, तेव्हा ‘जणू साधनेचेच डोहाळे लागले आहेत’, असे वाटणे : ‘मी गरोदर असतांना विश्रांतीसाठी माहेरी गेले होते. तेव्हा कोरोना महामारीमुळे झालेल्या दळणवळण बंदीमुळे मी तिथेच अडकले; परंतु त्या संपूर्ण ९ मासांच्या कालावधीत मला श्री गुरुकृपेने अखंड सत्मध्ये रहायला मिळाले. गुरुकृपेने मला विविध प्रकारच्या ‘ऑनलाईन’ सेवा करायला मिळाल्या आणि माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्नही वाढले. त्या वेळी मला ‘सतत सेवा आणि साधना करावी’, असे वाटत होते. जणू मला साधनेचेच डोहाळे लागले होते. त्या कालावधीत मला सेवेचा ध्यास इतका होता की, कधी कधी झोपेतही मी सेवेचे नियोजन करायचे.

१ आ. गरोदर असल्याची जाणीव नसणे आणि गरोदरपणात कसलाही त्रास न होणे : घरातील सर्व जण मला म्हणायचे, ‘‘तू गरोदर आहेस. विश्रांती घे’’; पण मला ‘सेवा करणे’ हीच विश्रांती वाटायची. ‘मी गरोदर आहे’, याची बर्‍याचदा मला जाणीवच नसायची. माझ्या पोटालाही हलकेपणा जाणवायचा. देवाच्या कृपेने ९ मास सत्मध्येच राहिल्याने मला कुठलाही त्रास झाला नाही.

१ इ. पोटातील गर्भ सात्त्विक असल्यामुळे ‘मला त्याच्या सहवासामुळेच चैतन्य मिळत आहे’, असे वाटणे : प्रसुतीला जाईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी भावसत्संग ऐकला. तेव्हा ‘बाळंतपण ही माझी साधनाच आहे आणि हे सर्व गुरुमाऊलींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) केवळ माझ्या साधनेसाठी घडवले असून पोटातील गर्भ सात्त्विक असल्यामुळे मला त्याच्या सहवासामुळेच चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटत होते.

२. प्रसुती

२ अ. प्रथम ‘बाळाचा जन्म पितृपक्षात होऊ नये’, असे वाटणे, भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘पितृपक्ष हा ‘दत्ततत्त्व’ अनुभवण्याचा काळ असतो’, असे सांगणे : मला ‘बाळाचा जन्म पितृपक्षात होऊ नये’, असे वाटत होते. माझी प्रसुती शस्त्रकर्म करून होणार असल्यामुळे आम्ही गुरुजींना विचारून शस्त्रकर्मासाठी चांगला दिवस निश्चित केला होता. भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘पितृपक्ष म्हणजे ‘दत्ततत्त्व’ अनुभवण्याचा काळ असतो. या काळात अधिकाधिक ‘दत्ततत्त्व’ अनुभवूया.’’

२ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भाववृद्धी सत्संगात सांगितल्यानुसार पितृपक्षात झालेला बाळाचा जन्म आनंदाने स्वीकारता येणे : काही कारणाने माझे शस्त्रकर्म पितृपक्षातच करावे लागले; पण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भाववृद्धी सत्संगात सांगितल्याप्रमाणे मला ते आनंदाने स्वीकारता आले. गेल्या ३ वर्षांपासून माझे यजमान गुरुचरित्राचे पारायण करत असल्याने ‘पितृपक्षात दत्तगुरूंनी बाळाच्या (मुलाच्या) रूपात प्रसाद दिला’, असे त्यांना वाटले.

२ ई. रुग्णालयात असतांना ‘कोरोनाचा त्रास होऊ नये’, यासाठी सद्गुरु स्वाती खाडये यांनी अधिकाधिक कोरोना प्रतिबंधक नामजप करण्यास सांगणे, त्यामुळे साधिका आणि बाळ सुरक्षित असणे : ईश्वरच सर्वकाही करवून घेत होता. माझी प्रसुती झाल्यानंतर मी ४ दिवस रुग्णालयात होते. सद्गुरु स्वातीताईंनी (सद्गुरु स्वाती खाडये यांनी) मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी कोरोना प्रतिबंधनासाठी सांगितलेला ‘दुर्गा-दत्त-शिव’ हा नामजप अधिकाधिक करायला सांगितला होता. देवानेच माझ्याकडून तो जप करवून घेतला. त्यामुळे बाळाचे आणि माझे कोरोनापासून रक्षण झाले.

श्री. दीपक डाफळे

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ६ मास

३ अ १. शांत : बाळाच्या जन्मानंतर ‘आता मला बाळामुळे सेवा आणि साधना करता येणार नाही. मला सेवेसाठी वेळ मिळणार नाही’, असे वाटले; परंतु बाळाच्या जन्मानंतर पंधराच दिवसांनी माझी सेवा आणि साधना चालू झाली. बाळामुळे मला साधनेत अडचणी आल्या नाहीत. माझा ‘ऑनलाईन’ सत्संग चालू असतांना बाळ शांतपणे ऐकत रहायचा किंवा खेळायचा.’

– सौ. भक्ती डाफळे (आई), सातारा

३ अ २. ‘बाळ ध्यानात आहे’, असे जाणवणे : ‘बाळाचे पहिल्या मासात छायाचित्र काढल्यावर ‘ते ध्यानात आहे आणि त्याच्या तोंडवळ्यावर दत्तात्रेयांच्या ३ मुखांची भावमुद्रा आहे’, असे मला जाणवत होते.’ – श्री. दीपक डाफळे (वडील), सातारा

३ अ ३. सात्त्विकतेची ओढ : मी प्रार्थना, श्लोक आणि मंत्रजप म्हणत असतांना बाळ हुंकार द्यायचे. ‘मी धर्मशिक्षणवर्गात विषय मांडत असतांनाही ते बर्‍याचदा शांतपणे ऐकत असते. त्या वेळी ‘त्याला विषय समजत आहे’, असे मला वाटते. ते खेळकर आहे; पण मी सेवा करत असतांना ते शांत रहाते.’ – सौ. भक्ती डाफळे

३ अ ४. देवदर्शनासाठी गेल्यावर मंदिरात गर्दी असूनही देवदर्शन व्यवस्थित होणे आणि बाळानेही त्रास न देणे : ‘बाळ ४ मासांचे असतांना आम्ही कुलदेवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे गेलो होतो. आम्ही घरून पहाटे निघतांना ते झोपले होते. त्याने नमस्काराची मुद्रा केली होती. त्या संपूर्ण प्रवासात त्याने काही त्रास दिला नाही. तुळजापूर येथील मंदिरात पुष्कळ गर्दी असूनही तेथील पुजार्‍यांनी बाळाला श्री भवानीदेवीच्या चरणांचा स्पर्श करवून दिला. तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या सर्व ठिकाणी गर्दी असूनही आम्हाला देवदर्शन व्यवस्थित झाले. आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेत जेवढ्या वेळ थांबायचो, तेवढा वेळ बाळ शांत झोपायचे आणि गाभार्‍यात पोचल्यावर उठायचे.

३ अ ५. संतांप्रती असलेली ओढ : देवदर्शनावरून परत येतांना आम्ही सोलापूर सेवाकेंद्रात सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु स्वाती खाडये) यांना भेटायला गेलो. तेव्हा बाळाने मोठ्याने हसून आनंद व्यक्त केला. जणू ‘त्यांची पूर्वीपासूनच ओळखत आहे’, अशा भावाने बाळाने सद्गुरु स्वातीताईंना प्रतिसाद दिला. तेव्हा ‘बाळाला चैतन्याची ओढ आहे’, असे मला वाटले.

३ अ ६. सद्गुरु स्वातीताईंनी सुचवल्यानुसार आम्ही बाळाचे नाव ‘यदुवीर’ ठेवले.

‘सद्गुरु स्वातीताईंनी बाळाचे नाव सुचवले’, यासाठी आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– सौ. भक्ती डाफळे (आई) आणि श्री. दीपक डाफळे (वडील)

३ आ. वय ७ मास ते १ वर्ष

३ आ १. हसतमुख : ‘यदुवीर नेहमी हसतमुख असतो. तो सर्वांना हसून प्रतिसाद देतो. त्याच्याकडे पाहिल्यावर पुष्कळ आनंद जाणवतो.

३ आ २. चांगली आकलनक्षमता : त्याने एखादी कृती पाहिली की, तो ती कृती लक्षात ठेवतो. त्याला पुन्हा शिकवावे लागत नाही. आम्ही आरती करतांना तो स्वतःहून टाळ्या वाजवतो. आम्ही जयघोष करतांना ‘जय, जय’, असे बोबडे बोल बोलतो. आम्ही ‘विठ्ठल-विठ्ठल’ म्हटल्यावर तो स्वतःहून टाळ्या वाजवतो.

३ आ ३. तो झोपेत असतांना हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करतो.

३ आ ४. त्याच्या शरिरावर वेगवेगळ्या रंगांचे दैवी कण आढळतात.

३ आ  ५. अनुभूती – यदुवीरच्या सहवासात सुगंध येणे आणि नामजप चालू होणे : मी त्याच्या समवेत असतांना मला वेगवेगळे सुगंध येतात. त्याच्या सहवासात माझा नामजप आपोआप चालू होतो.’

– सौ. भक्ती डाफळे (आई)

३ आ ६. देवाची ओढ

 

१. ‘मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत असतांना यदुवीर आनंदाने उड्या मारतो. तो आपण करत असलेल्या नामजपाला प्रतिसाद देतो.

श्रीमती रेणुका डाफळे

२. तो कृष्णाच्या चित्राकडे आणि गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राकडे पाहून आनंदाने हसतो. तो गुरुदेवांच्या छायाचित्रातील डोळ्यांकडे एकटक पहात असतो.’

– कु. दीपाली डाफळे (यदुवीरची आत्या) आणि श्रीमती रेणुका डाफळे (यदुवीरची आजी (वडिलांची आई)), सातारा

४. स्वभावदोष :

‘हट्टीपणा आणि चिडचिडेपणा

५. कृतज्ञता आणि प्रार्थना :

प.पू. गुरुमाऊली आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या कृपेने मला बाळंतपणाचा काळ साधना म्हणून जगता आला. ‘गुरुमाऊली, आपणच आम्हाला प्रत्येक कृती ही ईश्वरसेवा म्हणून करण्याची शिकवण दिलीत आणि तशी कृतीही आपणच माझ्याकडून करवून घेत आहात. आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुमाऊली, ‘तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न करता यावे’, यासाठी आपणच माझ्यावर कृपा करावी’, ही प्रार्थना आहे.’

– सौ. भक्ती डाफळे (३०.८.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक