सतत उत्साही, आनंदी आणि सेवेची तीव्र तळमळ असणारे चि. अतुल बधाले आणि हसतमुख अन् शिकण्याची वृत्ती असणार्या चि.सौ.कां. पूजा नलावडे !
चि. अतुल बधाले यांची गुणवैशिष्ट्ये !
१. श्रीमती संध्या तबाजी बधाले (श्री. अतुल यांची आई)
१ अ. ‘शाळेत असतांना अतुलने छायाचित्रक (कॅमेरा) हवा’, असा हट्ट करणे, ‘तू पूर्णवेळ साधना करू लागल्यावर तुला देवाचे छायाचित्रक मिळतील’, असे आईने सांगणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे त्याची इच्छा पूर्ण होणे : ‘अतुल शाळेत इयत्ता ८ वीत असतांना छायाचित्रे काढण्यासाठी माझ्याकडे छायाचित्रक (कॅमेरा) मागत होता. त्या वेळी मी त्याला म्हणाले, ‘‘तू पूर्णवेळ साधना करू लागल्यावर तुला देवाचे छायाचित्रक (कॅमेरे) वापरण्यासाठी मिळतील !’’ पुन्हा काही दिवसांनी तो परत छायाचित्रक मागायचा, इतकी त्याला छायाचित्रे काढण्याची आवड होती. आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे त्याला चांगल्या प्रतीचा छायाचित्रक वापरून छायाचित्रे काढण्याची सेवा मिळाली आहे. ‘गुरुमाऊलींनीच छायाचित्रकाची त्याची इच्छा पूर्ण केली’, असे मला वाटते.
१ आ. साधकांशी मोकळेपणाने बोलणे : मागील ६ वर्षांपासून अतुल रामनाथी आश्रमात रहात आहे. तो आश्रमात सर्वांशी मोकळेपणाने बोलतो. त्याची सर्वांशी चांगली जवळीक आहे.
१ इ. सेवेची तळमळ असल्याने रात्री उशिरा झोपूनही पहाटे लवकर उठून सेवा करणे : अतुलला सेवेची पुष्कळ तळमळ आहे. एक दिवस आम्ही आश्रमातून बाहेर गेलो होतो आणि आश्रमात पोचायला आम्हाला रात्रीचे ११ वाजले. अतुलला दुसर्या दिवशी सकाळी साधकांसाठी अल्पाहार बनवण्याची सेवा होती. रात्री उशिरा येऊनसुद्धा तो पहाटे अल्पाहार बनवण्याच्या सेवेला गेला. मी सकाळी त्याला पाहिले. तेव्हा त्याच्या चेहर्यावर मरगळ नव्हती, तर तो आनंदी दिसत होता.
१ ई. तत्त्वनिष्ठता : ‘माझी साधना चांगली व्हावी’, या विचाराने तो माझ्याकडून झालेल्या चुका तत्त्वनिष्ठतेने मला सांगतो. मी त्यावर ‘कसे प्रयत्न करायला हवेत’, हेही तो सांगतो आणि ‘प्रयत्न होतात ना ?’, याचा पाठपुरावाही घेतो.
१ उ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा : एकदा मला एका प्रसंगाचा ताण आला होता. मी तो प्रसंग अतुलला सांगितला. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘प.पू. गुरुमाऊली सर्व करतील. तू कोणतीच काळजी करू नकोस.’’ यातून ‘त्याची परात्पर गुरु डॉक्टरांवर किती दृढ श्रद्धा आहे’, हे माझ्या लक्षात आले.’
२. सोनाली बधाले (मोठी बहीण) आणि श्री. अमोल बधाले (मोठा भाऊ)
२ अ. अडचण आणि प्रसंग यांत योग्य दृष्टीकोन देणे : ‘अतुलला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा एखादा प्रसंग सांगितल्यावर तो ‘आध्यात्मिकदृष्ट्या आपले विचार कसे असायला हवेत ? आणि आपण कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हे आम्हाला सांगतो.
२ आ. सोन्याचे अलंकार खरेदी करतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या शिकवणीनुसार त्यांच्या स्पंदनांचा अभ्यास करणे : अतुलच्या विवाहानिमित्त आम्ही सोन्याचे अलंकार खरेदी करण्यासाठी सराफी दुकानात गेलो होतो. त्या वेळी अलंकार हातात घेऊन ‘काय जाणवते ?’, हे तो पहात होता. नंतर त्याने ते अलंकार माझ्याकडे (सोनालीकडे) दिले आणि ‘तुला हे हातात घेतल्यावर काय जाणवते ?’, असे विचारले. त्या वेळी अतुल ‘अलंकारांच्या सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास करत आहे’, हे माझ्या लक्षात आले. तो मला म्हणाला, ‘‘धर्मशास्त्रानुसार अलंकार घडवल्यास त्यात चांगली स्पंदने येतात’, हे आपल्याला प.पू. गुरुमाऊलींनी शिकवले आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात येते.’’
२ इ. आज्ञापालन : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अतुलला विवाह आणि साधना यांसंदर्भात काही सूत्रे सांगितली होती. त्याप्रमाणे तो कृती करत होता. त्याने ती सूत्रे आम्हालाही सांगितली. ‘त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती केली, तर देवाला अपेक्षित अशी कृती होईल आणि सर्व कुटुंबियांची साधना होईल’, अशी त्याची तळमळ होती.
२ ई. सनातनचे तीन गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती भाव
२ ई १. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अव्यक्त भाव असणे : अतुलचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अव्यक्त भाव आहे. श्री गुरूंविषयी बोलतांना त्याच्याकडून केवळ कृतज्ञताच व्यक्त होते. त्यांच्या प्रती असलेल्या भावामुळे तो सतत उत्साही, आनंदी आणि सेवारत असतो.
२ ई २. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीस्वरूप आहेत’, असा भाव असणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी बोलतांना अतुल म्हणतो, ‘‘महर्षींनी बिंदाताईंचे देवीस्वरूपात जसे वर्णन केले आहे, अगदी तशाच त्या आहेत. त्यांच्या समवेत असतांना मला नेहमी याची प्रचीती येते. ‘त्या देवीस्वरूप आहेत’, असा अतुलचा भाव असतो.
२ ई ३. ‘कुलदेवीची ओटी’ म्हणून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची ओटी भरतांना ‘साक्षात् देवीचीच ओटी भरत आहे’, असा भाव ठेवण्यास अतुलने सांगणे : काही कारणास्तव आम्हाला आमच्या कुलदेवीच्या (श्री यमाईदेवीच्या) दर्शनाला पुण्याला जाता आले नाही. तेव्हा ‘कुलदेवीची ओटी म्हणून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची ओटी भरावी’, असा विचार आम्हा सर्वांच्या मनात आला. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची ओटी भरतांना ‘साक्षात् देवीची ओटी भरत आहे’, असा भाव ठेवण्यास अतुलने आम्हाला सांगितले. त्या वेळी ‘त्यांच्या शक्तीतत्त्वाचा लाभ सर्व कुटुंबियांना व्हावा’, असे अतुलला वाटत होते.
२ ई ४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी राखी बांधल्यावर अतुलची भावजागृती होणे : अतुल श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत सेवेनिमित्त केरळ येथे गेला होता. त्याच कालावधीत ‘रक्षाबंधन’ होते. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्याला राखी बांधली. तेव्हा ‘देवीने आपल्याला राखी बांधली’, असे वाटून त्याची पुष्कळ भावजागृती झाली. त्यांनी बांधलेली राखी अतुलने स्वतःजवळ जपून ठेवली आहे.
‘हे गुरुदेवा, आपणच आम्हा बधाले कुटुंबाला सांभाळत आहात. आपल्या कृपेमुळेच आम्ही सर्व जण आपल्या छत्रछायेखाली साधना करत आहोत. याबद्दल कोटीशः कृतज्ञता ! अतुल, पूजा आणि आम्हा सर्वांची सेवा अन् साधना शीघ्र गतीने करून घ्यावी’, अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !’
३. श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि सौ. श्रावणी परब
३ अ. प्रेमभाव : ‘अतुल येता-जाता सहजतेने आश्रमातील साधकांची विचारपूस करतो. त्याला संतांकडून कधी प्रसाद मिळाला की, तो सर्वांना देतो आणि नंतर स्वतः खातो.
३आ. समजूतदार : पूर्वी अतुलला साधक किंवा कुटुंबीय यांना समजून घेता यायचे नाही. आता ‘इतरांना काहीतरी अडचणी असतील’, असा विचार करून शांत राहून तो सर्वांना समजून घेतो.
३ इ. ‘छायाचित्रे काढण्याची सेवा संतांना अपेक्षित अशी व्हावी’, यासाठी प्रयत्न करणे : पुष्कळ वेळा अतुलकडे संतांच्या खोलीतील छायाचित्रे काढण्याची सेवा असते. त्या वेळी संत त्याला चुका किंवा काही पालट सांगतात, तसेच ‘छायाचित्रे आणखी चांगली कशी काढता येतील’, याविषयीही सांगतात. त्या वेळी अतुल ‘संतांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी आणखी काय करू ?’, असा विचार करतो आणि सहसाधकांचे साहाय्य घेऊन चिंतन करतो.
३ ई. सेवेची तळमळ : काही वेळा अतुल रात्री सहसाधकांना सांगतो, ‘‘आज मी पुष्कळ दमलो आहे; म्हणून आता जाऊन झोपतो.’’ त्याच रात्री अकस्मात् त्याच्याकडे नवीन काही सेवा येते. त्या वेळी कोणतेही गार्हाणे न करता ‘ही गुरुसेवा आहे’, या भावाने तो आनंदाने सेवा करतो.
३ उ. अतुलने अगदी अल्प कालावधीत संत आणि साधक यांचे मन जिंकले आहे.
३ ऊ. ईश्वर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
३ ऊ १. नामजपादी उपाय करतांना अतुल देवाला प्रार्थना करतो. तेव्हा त्याला भावाश्रू येतात.
३ ऊ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आतापर्यंत माझ्यासाठी किती केले आहे’, असा विचार करून अतुलची भावजागृती होते. तेव्हा पुष्कळ वेळ तो भावस्थितीत असतो.’
४. कु. पूनम साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
४ अ. अबोल स्वभावाच्या आणि सेवेतील चुकांची भीती वाटणार्या अतुलने चांगले प्रयत्न करून उत्तरदायी साधकांशी मोकळेपणाने बोलणे अन् दायित्व घेऊन सेवा करणे : ‘अतुल पहिल्यांदा छायाचित्रे काढण्याच्या सेवेसाठी आला. तेव्हा तो अबोल होता. त्याला सेवेतील चुकांची भीती वाटायची. सेवेत थोडा जरी पालट झाला, तरी तो अस्वस्थ व्हायचा. सेवेत एखादी चूक झाली की, तो ‘सेवा नको’, म्हणायचा. त्याला सेवेचे दायित्व घेण्याचीही भीती वाटायची; पण हळूहळू त्याने या सगळ्यांवर मात करून स्वतःमध्ये चांगले पालट केले. आरंभी तो सेवेतील आणि मनाच्या स्तरावरील अडचणी मला सांगू लागला. नंतर तो उत्तरदायी साधकांशीही मोकळेपणाने बोलू लागला.
आता अतुलला कुणी बघितले, तर त्यांचा विश्वास बसणार नाही की, हा मुलगा इतका अबोल होता म्हणून ! त्याने स्वतःमध्ये इतका पालट केला आहे की, छायाचित्रे काढण्याच्या समन्वयाची सेवा तो दायित्व घेऊन करतो.
४ आ. प्रांजळपणाने बोलणे आणि सांगितल्यानुसार प्रयत्न करणे : अतुलचे मन लहान मुलासारखे आहे. तो मनाने प्रांजळ असल्यामुळे सेवा आणि सहसाधक यांच्याविषयी त्याला काही वाटले, तर मोकळेपणाने मला सांगतो. त्यामुळे त्याला त्याच्या सेवेशी संबंधित गोष्टी मला सांगता येतात आणि सांगितल्यानुसार तो प्रयत्नही करतो.
४ इ. साधिकेच्या चेहर्यावरून तिला आध्यात्मिक त्रास होत असल्याचे कुणाला न समजणे; मात्र नवीनच आलेल्या अतुलला त्या त्रासाची जाणीव होणे : अतुल पुष्कळ प्रेमळ आहे. एकदा आम्ही जेवत असतांना तो मला सेवेतील काही शंका विचारत होता. मी त्याला त्यांची उत्तरे देत होते. मध्येच त्याने मला विचारले, ‘‘ताई, तुला काही त्रास होत आहे का ?’’ त्या वेळी खरेच मला आध्यात्मिक त्रास होत होता. माझ्या चेहर्यावर माझा त्रास कधी दिसत नाही किंवा अन्य प्रकारेही तो जाणवत नाही. अतुल नवीन असूनही ‘मला त्रास होत आहे’, हे त्याला जाणवले, याचे मला विशेष वाटले.
४ ई. इतरांना साहाय्य करणे : एरव्ही मला बरे नसेल किंवा मला काही साहाय्य हवे असेल, तर न सांगताही अतुल स्वतःहून सर्व साहाय्य करतो. ‘त्याने साहाय्य केले’, असे तो दर्शवतही नाही. त्यामुळे मला कधी काही साहाय्य हवे असते, तेव्हा त्याला हक्काने सांगता येते.’
५. सर्वश्री स्नेहल राऊत (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), विनीत देसाई, राजू सुतार आणि केदार नाईक
५ अ. भीतीवर मात करून पुढाकार घेऊन सेवा करणे
५ अ १. छायाचित्रीकरणातील सर्व बारकावे लवकर आत्मसात करणे : ‘अतुल चित्रीकरणाच्या सेवेसाठी आल्यावर त्याने छायाचित्रीकरण करणे आणि धारिकेत लिखाण लिहिणे, या नवीन सेवा शिकून घेतल्या. काही दिवसांनी त्याला एकट्याला आम्ही काही सोपी छायाचित्रे काढायला सांगितली. तेव्हा प्रारंभी त्याला भीती वाटायची; पण मागील दोन वर्षांमध्ये अतुलने भीतीवर मात केली आहे. आता तो संतांची, तसेच संशोधन किंवा महत्त्वाचे सर्व सोहळे यांची छायाचित्रे दायित्व घेऊन काढतो. त्याने छायाचित्रीकरणातील सर्व बारकावे लवकर आत्मसात केले आहेत.
५ अ २. संतांच्या खोलीतील पालटांविषयीची छायाचित्रे पुढाकार घेऊन काढणे : पूर्वी अतुलला संतांच्या खोलीतील किंवा निसर्गातील पालटांविषयी छायाचित्रे काढतांना आत्मविश्वास नसायचा. त्या वेळी छायाचित्रे काढतांना त्याला समवेत कुणीतरी साधक लागायचा. संतांनी काही प्रश्न विचारल्यास त्याला बोलतांना भीती वाटायची; परंतु आता या सेवा तो पुढाकार घेऊन करतो.’
६. श्री. मेहूल राऊत
६ अ. स्वतःहून सेवेचे दायित्व घेऊन प्रत्येक कृतीचे बारकावे काढणे : ‘जुलै २०२२ मध्ये झालेल्या गुरुपौर्णिमेनंतर पुढचे दोन दिवस रामनाथी आश्रमात मोठे विधी करायचे होते. विधींच्या आदल्या रात्री माझी प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे मला या सेवेत सहभागी होता येणार नव्हते. तेव्हा अतुलने ‘आता कोण दायित्व घेणार ? पुढील विधींचे नियोजन कोण करणार ?’, असा विचार न करता स्वतःहून सेवेचे दायित्व घेतले. प्रत्येक कृतीचे बारकावे काढून त्यानुसार त्याने नियोजन केले. त्याने वेळोवेळी उत्तरदायी साधकांना त्या सेवांचा आढावाही दिला.’
७. श्री. केदार नाईक
७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन करून चित्रीकरणाशी संबंधित सेवा तत्परतेने शिकणे : ‘एकदा परात्पर गुरु डॉक्टर एका साधकाला भेटायला त्याच्या खोलीत गेले होते. त्या वेळी मी गुरुदेवांची छायाचित्रे काढत होतो आणि साहाय्यासाठी अतुलला घेऊन गेलो होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘हा तुझा साहाय्यक आहे का ? त्याला तुझ्या सेवा शिकवतोस ना ? तुला ज्या सेवा येतात, त्या यालाही शिकव.’’
छायाचित्रे काढून झाल्यानंतर मी आणि अतुल आमच्या सेवेच्या ठिकाणी गेलो. तेव्हा लगेच अतुलने मला विचारून सर्व सेवांची सूची सिद्ध केली आणि त्यानुसार सेवा शिकून घेण्यास प्रारंभ केला. यातून अतुलची ‘शिकण्याची तळमळ’ आणि ‘गुरूंचे आज्ञापालन करणे’, हे दोन्ही गुण मला प्रकर्षाने जाणवले. तो आता नवीन काही सेवाही इतक्या चांगल्या प्रकारे करतो की, कधी कधी परात्पर गुरु डॉक्टर मला विचारतात, ‘‘या सेवा तू अतुलकडून शिकून घेतल्यास ना ?’
८. चित्रीकरण सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
८ अ. समन्वय सेवेतील बारकावे शिकून आत्मसात करणे : ‘जेव्हा अधिक वेळेसाठी चित्रीकरण करायचे असते, तेव्हा एक साधक पूर्णवेळ समन्वयाची सेवा करण्यासाठी लागतो. अतुलने समन्वय करण्याच्या या सेवेचे निरीक्षण करून त्यातील बारकावे लवकर समजून घेतले आणि ते आत्मसात केले.
८ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी अतुलचे कौतुक करणे : मागील २ वर्षांपासून संतांची छायाचित्रे काढायची असोत, त्यांच्या चित्रीकरणाशी संबंधित समन्वय करायचा असो किंवा त्यांना सेवेच्या संदर्भात प्रश्न विचारायचे असोत, अतुल या सर्व सेवा दायित्व घेऊन करत आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर कौतुकाने विचारतात, ‘‘अतुल सर्व सेवा लवकर शिकला आणि आता छान सेवा करत आहे. तुम्हीही याच्याकडून शिकता ना ?’’
८ इ. भाव
अ. रामनाथी आश्रमात होणार्या सोहळ्याच्या वेळी चित्रीकरण चालू असतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्मरणाने अतुलची भावजागृती होते.
आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्याला कसे घडवले’, हे सांगतांनासुद्धा त्याची भावजागृती होते.’
– सर्व सूत्रांचा दिनांक (१५.११.२०२२)
चि.सौ.कां. पूजा नलावडे यांची गुणवैशिष्ट्ये !
१. श्री. दिलीप नलावडे आणि सौ. विद्या नलावडे (चि.सौ.कां. पूजाचे वडील आणि आई) फोंडा, गोवा.
१ अ. प्रथमपासून सर्व कुटुंब साधनेत असल्यामुळे दोन्ही मुलींवर चांगले संस्कार होणे : ‘आम्ही उभयता सनातनने सांगितलेली साधना पूर्वीपासून करत असल्यामुळे श्री गुरूंच्या कृपेने आमच्या दोन्ही मुलींवर, सौ. वेदश्री खानविलकर (पूर्वाश्रमीची कु. प्रणिता) आणि कु. पूजा यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार झाले. दोघीही सनातनच्या बालसंस्कारवर्गात जायच्या. त्यामुळे त्यांच्या मनावर राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे चांगले विचार रुजले गेले.
१ आ. पूजाला रस्त्यावर कचरा टाकायला न आवडणे : लहानपणापासून पूजाला लोकांनी रस्त्यावर कचरा टाकलेला आवडत नसे. शाळेतून येतांना तिला चॉकलेट घेऊन दिले, तर ती चॉकलेटवर गुंडाळलेला कागद (वेष्टन) रस्त्यात न टाकता शाळेच्या गणवेशाच्या खिशात ठेवत असे.
१ इ. रस्त्यावर पडलेले झेंडे गोळा करून घरी आणणारी पूजा ! : स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी पूजा शाळेतून घरी येत असतांना रस्त्यावर पडलेले झेंडे गोळा करून घरी घेऊन येत असे. नंतर ती सन्मानपूर्वक त्यांचे विसर्जन करत असे.
१ ई. तत्त्वनिष्ठ : पूजा लहानपणापासूनच तत्त्वनिष्ठ असून तिला खोटे बोललेले आवडत नाही. काही प्रसंगांत ती आमच्याकडून झालेली चूकही निक्षून सांगत असे.
१ उ. नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड : पूजा उत्तम स्वयंपाक करते. तिला नवीन नवीन पदार्थ करायला आणि ते इतरांना खायला घालायला पुष्कळ आवडते.
१ ऊ. तहान-भूक विसरून सेवा करणे : पूजा दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करते. ती सेवेचे दायित्व घेऊन, तहान-भूक विसरून आणि मनापासून सेवा करते. ती चुकांविषयी सतर्क असते आणि स्वतःकडून सेवेत चुका झाल्यास प्रायश्चित्त घेते. ती संतसेवाही मनापासून आणि चांगल्या प्रकारे करते.
१ ए. मायेची ओढ न्यून असणे : पूजाची मायेच्या प्रती ओढ न्यून आहे. आम्ही गोव्यात आल्यानंतर येथे नवीन घर घेतले. हे घर सर्व सोयींनी युक्त आहे; परंतु घर घेतल्यापासून पूजा अधिक वेळ आश्रमातच निवासाला असते. ‘गुरुसेवेत अधिकाधिक वेळ कसा येईल’, याकडे तिचे लक्ष असते.
१ ऐ. वयस्कर साधकांशी आपुलकीने वागणे : पूजा साधकांना साधनेत साहाय्य करते. वयस्कर साधकांनाही ती चांगल्या प्रकारे साहाय्य करते. ती त्यांच्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागून जवळीक निर्माण करते.
१ ओ. पूजा माझी (वडिलांची) पुष्कळ काळजी घेते. मी आजारी पडलो, तर ती माझी सर्व सेवा करते.
१ औ. खरेदी करतांना नामजप आणि प्रार्थना करणे : पूजाने स्वतःच्या विवाहासाठी लागणार्या वस्तूंची खरेदी करतांना आमच्याकडे कोणताच हट्ट केला नाही. खरेदी करतांना ती नामजप आणि प्रार्थना करायची. त्यामुळे आम्हाला योग्य भावात वस्तू मिळाल्या. ‘अनावश्यक गोष्टींत पैसा व्यय व्हायला नको’, असा तिचा विचार असायचा.
१ अं. सनातनच्या तिन्ही गुरूंप्रती भाव ! : पूजाचा परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.
परमेश्वराने आम्हाला कु. पूजासारखे गुणवान कन्यारत्न दिले. याबद्दल आम्ही देवाच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
२. सौ. वेदश्री खानविलकर (मोठी बहीण), फोंडा, गोवा.
२ अ. गुणी आणि प्रेमळ : ‘पूजा खूप गुणी आणि प्रेमळ आहे. ती नेहमी आनंदी आणि सकारात्मक असते. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला नको’, असे तिला वाटते.
२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांना आवडेल, अशी सेवा करण्याची तळमळ : तिला गुरुकार्याची पुष्कळ तळमळ असून ती प्रत्येक सेवा सकारात्मक राहून स्वीकारते. अधिकाधिक झोकून देऊन आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांना आवडेल’, अशी सेवा करण्याचा तिचा प्रयत्न असतो. सेवेतून श्री गुरूंचे मन जिंकण्याची तिला तळमळ असते.
२ इ. सहसाधकांना समजून घेऊन त्यांच्याकडून सेवा करून घेणे : पूजाकडे काही सेवांचे दायित्व असल्याने वेळप्रसंगी ती रात्री जागरण करून सेवा करते. सेवेविषयी तिला सतत साधकांचे भ्रमणभाष येत असतात. कधी रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर भ्रमणभाष येतात, तरी पूजाची चिडचिड होत नाही. ती सर्व आनंदाने स्वीकारते. ‘सहसाधकांना समजून घेणे आणि त्यांच्याकडून सेवा करून घेणे’, हे तिचे एक कौशल्य आहे.
२ ई. साधकांना साहाय्य करतांना त्यांना भावनिक स्तरावर न हाताळता साधनेविषयी योग्य दृष्टीकोन देणे आणि यातून पूजाची परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धा दिसून येणे : पूजाची आश्रमात पुष्कळ जणांशी जवळीक आहे. तिच्याकडे बरेच साधक येऊन मन मोकळे करतात. तिला या गोष्टीचा अहं नाही किंवा तिला त्याचा कंटाळाही येत नाही. सेवेत कुणाला काही अडचणी आल्या किंवा कुणाला साहाय्य हवे असल्यास सगळे तिच्याकडे हक्काने आणि विश्वासाने येतात. ‘तिच्याकडून साहाय्य मिळेलच’, अशी त्यांना निश्चिती असते. तिला कुणीही गंभीर किंवा त्रासदायक प्रसंग सांगितले, तरी तिला त्याची चिंता वाटत नाही. ती त्यांना भावनिक स्तरावर न हाताळता साधनेविषयी योग्य दृष्टीकोन देते. यातून तिची परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धा दिसून येते.
२ उ. मायेची आसक्ती न्यून करणारे विचार : विवाह ठरल्यावर मुली पुढील जीवनाचा मायेच्या दृष्टीने विचार करतात; पण पूजाचे विचार मायेची आसक्ती न्यून करणारे आहेत. विवाह झाल्यावर ‘मायेत खूप वेळ न घालवता लगेचच सेवेला यायचे’, असा तिचा विचार आहे.’
३. देवद येथील सनातनच्या आश्रमातील दैनिक ‘सनातन प्रभात’ कार्यालयातील साधक
३ अ. श्री. संदेश नाणोसकर (वय २४ वर्षे)
३ अ १. वेळेचे गांभीर्य आणि इतरांचा विचार करणे
३ अ १ अ . सहसाधकांना अडचण येऊ नये, यासाठी प्रयत्न करणे : ‘कुठलीही सेवा वेळेत चालू होण्यासाठी आणि ती समयमर्यादेत पूर्ण होण्यासाठी पूजा प्रयत्न करते. सेवेला उशीर झाला, तर त्यानंतरची सेवा करणार्या साधकांना अडचणी येऊ नयेत, याची ती पुरेपूर काळजी घेते. काही कारणास्तव तिला सेवा पूर्ण करायला उशीर होणार असेल, तर ती त्याविषयी कळवते. ‘सेवेत काही साहाय्य लागेल का ?’, याविषयी ती आपुलकीने विचारते.
३ अ १ आ. सेवेची पूर्वसिद्धता करून ठेवणे : पूजाकडे ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानांची संरचना करणे’, ही सेवा असते. ज्या पानाची संरचना करण्याची सेवा तिच्याकडे असते, त्याची पूर्वसिद्धता, उदा. लिखाण पानावर घेणे, त्यासंबंधी निरोप समजून घेणे, विषयांनुसार कोणती चित्रे घेणार ? याविषयी ठरवणे. या कृती ती आधीच करून ठेवते. त्या वेळी ‘तिच्यासमवेत सेवा करणार्या संपादकांना कोणतीही अडचण येऊ नये’, असा तिचा प्रयत्न असतो.
३ अ १ इ. नवीन सेवा शिकण्याची आवड : पूजाला नवीन सेवा शिकण्याची आवड आहे. रामनाथी आश्रमात येणार्या पाहुण्यांची छायाचित्रे काढणे, शिबिरासारख्या कार्यक्रमांच्या वेळी तेथील छायाचित्रे काढणे, छायाचित्रांमधील सुधारणा आणि बारकावे समजून घेणे, सामाजिक घडामोडी समजून घेऊन त्यावर लिखाण करणे इत्यादी सेवा शिकण्याचा तिचा प्रयत्न असतो. तिच्यातील शिकण्याच्या वृत्तीमुळे तिला या सेवांतील बारकावेही लगेच लक्षात येतात.
३ आ. कु. पल्लवी हेम्बाडे
३ आ १. भावनाशीलतेवर मात करून तत्त्वनिष्ठ रहाण्याचा प्रयत्न करणे : साधकांच्या सेवांचे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे, त्यांना नामजप अन् व्यष्टी साधना यांसाठी वेळ देणे, या सर्वांची सांगड कशी घालायची ?’, असा विचार करून काही वेळा पूजा भावनाशील व्हायची. एखाद्या साधकाकडून वारंवार त्याच त्याच चुका होत असल्यास तिला त्याविषयी सांगता यायचे नाही; परंतु आता ती तत्त्वनिष्ठ राहून इतरांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देते. त्यामागे ‘चुकांमुळे साधकांची साधना व्यय होऊ नये’, हा तिचा विचार असतो.
३ आ २. परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा होण्याची तळमळ : पूजाला कोणतीही सेवा सांगितली, तर ती अल्प कालावधीत सेवा शिकते. शिकण्याच्या तळमळीमुळे ती संरचनाकारांच्या सर्व सेवा शिकली आहे.
३ इ . श्री. सागर गरुड
३ इ १. इतरांशी जवळीक साधणे : ‘नवीन आलेल्या साधकांशी अथवा कुणाशीही पूजा सहजतेने बोलते. त्यामुळे तिची सर्वांशी लवकर ओळख आणि जवळीक होते.
३ इ २. गुरुसेवेच्या तळमळीमुळे शारीरिक त्रासांवर मात करून झोकून देऊन सेवा करणे : मध्यंतरी शारीरिक त्रासांमुळे पूजाला काही घंटे सलग सेवा करणे शक्य व्हायचे नाही, तरीही गुरुसेवेत अडचणी येऊ नयेत, या तळमळीमुळे ती त्रासावर मात करून सेवारत रहायची. त्या वेळी ‘सध्या दैनिकाशी संबंधित पुष्कळ सेवा आहेत आणि त्या लवकर पूर्ण व्हायला हव्यात’, असे ती सांगायची.
३ इ ३. सहसाधकांना पूजाचा आधार वाटणे : सर्व साधकांना पूजाचा आधार वाटतो आणि ते मोकळेपणाने तिला अडचणी सांगू शकतात. हे सर्व तिने अल्प कालावधीत साध्य केले आहे. साधकांच्या अडचणींचा विचार करून त्यांना उपाययोजना काढण्यासाठी ती प्रयत्नरत असते.’
४. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील दैनिक ’सनातन प्रभात’कार्यालयातील साधक
४ अ. हसतमुख : ‘कु. पूजा सतत हसतमुख असते. तिच्या सहवासात साधकांना आनंद मिळतो आणि ती सर्वांना हवीहवीशी वाटते.
४ आ. कर्तेपणा अल्प असणे : पूजा नेहमी इतरांना साहाय्य करते. त्या वेळी ‘मी खूप काही केले आहे’, असे तिच्या वागण्यातून जराही जाणवत नाही. यातून तिचे साधकांप्रती असलेले प्रेम सर्वांना जाणवते.
४ इ. सेवेतील पालट स्वीकारणे : सेवेत काही पालट करायचा असल्यास त्याविषयी पूजाला काही सांगायचा ताण येत नाही. ‘ती काहीतरी मार्ग काढून १०० टक्के अडचण सोडवणार’, याची साधकांना निश्चिती असते.
४ ई. सेवेची तळमळ : ३ वर्षांपूर्वी पूजाचे कुटुंब डोंबिवली, ठाणे येथून गोव्यात रहाण्यास आले. एखादा सण असल्यास आश्रमातील साधक त्यांच्या गावी जातात; परंतु मागील ३ वर्षांत पूजा बाहेरगावी गेली नाही. तिचे आई-वडील बाहेरगावी जातांना तिला येण्याविषयी विचारतात; पण सहसाधकांना गावाला जाता यावे आणि सेवेत अडचण येऊ नये; म्हणून ती जात नाही.
४ उ. शिकण्याची वृत्ती
४ उ १. पूजाने ‘दैनिकाच्या पानांची संरचना करणे’, ही सेवा अल्पावधीत शिकून घेणे : दैनिक कार्यालयात संरचनेची मुख्य सेवा करणारे एक साधक काही कारणास्तव घरी गेल्यानंतर दैनिकाच्या पानांच्या संरचनेची सेवा पूजाने अल्प कालावधीत शिकून घेतली. आता ती दायित्व घेऊन संरचनेच्या सेवेचे नियोजन करते. या सेवेतील अनेक बारकावेही तिने आत्मसात केले आहेत.
४ उ २. सेवेशी समरस होणे : संरचनेची सेवा असो किंवा अन्य कोणतीही सेवा असो, पूजा त्या सेवेशी समरस होऊन सेवा करते. त्यामुळे विशेषांकांचे ‘हेडर’ किंवा पानांची संरचना आदी करतांना अधिकाधिक चांगली सेवा करण्याचा तिचा प्रयत्न असतो. यामुळे संबंधित संपादकांनाही साहाय्य होते.
४ उ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पूजाच्या लेखाचे कौतुक करणे : पूजामध्ये शिकण्याची वृत्ती आहे. वर्ष २०१८ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. त्यात पूजाने लिहिलेली ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे’ लेख स्वरूपात प्रसिद्ध केली होती. हा लेख वाचून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी तिचे कौतुक केले होते. ते म्हणाले, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करतांना पुष्कळ शिकायला मिळते’, याची मला कल्पना नव्हती. कु. पूजा नलावडे हिच्या लेखामुळे मला पुष्कळ शिकायला मिळाले. या लेखाबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे थोडे !’’
४ उ ४. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील संपादकीय संस्करणाचे कौशल्य आत्मसात करणे : पूजा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठसंरचनेची सेवा करते आणि पृष्ठ संपादक करत असलेल्या सुधारणांतून ती संपादकीय संस्करण करायलाही शिकली आहे. एखादी बातमी पानावर मोठी होत असेल, तर त्यातील ‘वाक्यरचना लहान करणे किंवा बातमीचा मथळा लहान करणे’, असे संस्करण करावे लागते. हे संस्करणाचे कौशल्य तिने आत्मसात केले आहे. ती स्वतःहून हे संस्करण करते आणि नंतर पृष्ठ संपादकांकडून ते ‘योग्य आहे का ?’, हे पडताळून घेते.’
५. श्री. भूषण केरकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) सनातन आश्रम , रामनाथी, गोवा
५ अ. आज्ञापालन करून परिपूर्ण सेवेने संतांचे मन जिंकणार्या चि.सौ.कां. पूजा नलावडे ! : ‘पूजा करत असलेल्या सेवांचे दायित्व माझ्याकडे असल्यामुळे सेवेनिमित्त पूजाशी माझा सातत्याने संपर्क होतो. ती तिच्या सेवांचे नियोजन करून वेळोवेळी मला दाखवते आणि त्यात काही पालट सुचवल्यास लगेच स्वीकारते. सेवेत तिच्या काही चुका लक्षात आल्यास मी तिच्या लक्षात आणून देतो. पूजा त्या चुका स्वीकारते आणि त्यात पालट करण्याचा प्रयत्न करते. कधी तिच्या मनाचा संघर्ष झाल्यास ती माझ्याशी बोलते आणि पुढील सेवा आनंदाने करते. विशेषांकांच्या रचनेची सेवा कौशल्यपूर्ण रीतीने केल्यामुळे अनेकदा मुख्य संपादक आणि आश्रमातील संत यांनी तिचे कौतुक केले आहे.’
(सर्व सूत्राचा दिनांक : १२.११.२०२२)