पुणे शहरातील ३८ किलोमीटरच्या रस्ते दुरुस्तीसाठी १४२ कोटी रुपयांचा निधी संमत !

पुणे – शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १८० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया चालू असतांनाच आणखी काही रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये ३८ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १४२ कोटी रुपयांचा निधी अंदाज समितीने संमत केला आहे. वर्ष २०२३ मध्ये पुणे येथे ‘जी – २०’ ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याने त्याची सिद्धता पहाण्यासाठी जानेवारीमध्ये काही वरिष्ठ अधिकारी पुणे येथे येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही सिद्धता चालू केली आहे. शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात असलेल्या ५० किलोमीटर लांबीच्या ५७ रस्त्यांसाठी १९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया चालू केली आहे, तर दुसर्‍या टप्प्यातील ९८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी २६० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. आयुक्त विक्रमकुमार यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक असणार्‍या रस्त्यांची सूची आणि खर्च देण्याचे आदेश पथ विभागाला दिले आहेत.

‘५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम ३ ठेकेदार करणार आहेत. त्यामुळे काम चांगल्या दर्जाचे होईल’, असा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

समान पाणीपुरवठा योजना, मलनिःसारण वाहिनी, पावसाळी गटारे, विद्युत् वाहिनी, मोबाईल केबल यांसाठी वारंवार खोदलेले रस्ते अद्यापही ठीक झालेले नाहीत. तात्पुरत्या स्वरूपाचे डांबर टाकल्याने पहिल्या पावसाळ्यातच रस्त्यांची चाळण होऊन जाते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने उशीरा का होईना घेतलेला, हा निर्णय स्तुत्यच म्हणावा लागेल.