तळमळीने सेवा करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील श्रीमती माधवी गोरे (वय ७० वर्षे) !

सातारा रस्ता, पुणे येथील साधिका श्रीमती माधवी गोरे मागील २१ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांच्यात सेवेची तीव्र तळमळ आहे. उतारवयातही त्या तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने अनेक प्रकारच्या सेवा करतात. पुणे येथील साधिकांना जाणवलेली श्रीमती माधवी गोरे यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती माधवी गोरे

१. सौ. अनुराधा तागडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि सौ. प्रतिभा फलफले

१ अ. आनंदी आणि उत्साही : ‘शारीरिक त्रास असूनही श्रीमती गोरेकाकू सतत आनंदी आणि उत्साही असतात.

१ आ. अनुसंधानात असणे : काकू सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असतात. ‘त्या गुरुदेवांना आळवून आणि त्यांना विचारून सेवा करतात’, असे आम्हाला जाणवते.

१ इ. सेवेची तळमळ

१ इ १. शारीरिक त्रासांवर मात करून सेवा करणे : काकूंना कंबरदुखीचा तीव्र त्रास असल्याने त्यांना १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ बसता येत नाही आणि अधिक वेळ एका जागेवर उभेही रहाता येत नाही. या त्रासांवर मात करून काही वेळ बसून, काही वेळ उभे राहून किंवा चालत-फिरत काकू सेवा करतात.

१ इ २. वाचक आणि जिज्ञासू यांनी साधना करावी, यासाठी प्रयत्न करणे : दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि जिज्ञासू यांच्याशी काकूंनी जवळीक निर्माण केली असल्याने ते सर्व जण सनातन संस्थेच्या कार्यात जोडले गेले आहेत. ‘वाचक आणि जिज्ञासू यांच्याकडून साधनेचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी काकू तळमळीने प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील काही वाचक नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करणे, यांसाठी प्रयत्न करू लागले आहेत.

१ इ ३. ‘ऑनलाईन’ सत्संगात सद्गुरु स्वाती खाडये यांचे साधना आणि सेवा यांविषयी मार्गदर्शन ऐकल्यावर गोरेकाकूंनी सेवेचे नियोजन करून तळमळीने सेवा करणे : सद्गुरु स्वाती खाडये साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. सत्संगात त्या साधना आणि सेवा यांविषयी मार्गदर्शन करतात. हे मार्गदर्शन ऐकल्यावर गोरेकाकूंना एखादी सेवा सांगितल्यास त्या त्यावर अभ्यासपूर्ण चिंतन करतात. त्या ध्येय ठरवून अन्य साधकांसह तळमळीने सेवा करतात, उदा. मंदिरांमध्ये आकाशकंदील लावणे, फलकप्रसिद्धी करणे, वाचक आणि साधक यांच्या साहाय्याने प्रवचनांचे नियोजन करणे, प्रवचने घेणे, सनातन वही आणि पंचाग यांचे वितरण करणे इत्यादी.

१ इ ३ अ. आश्रमासाठी धान्य मिळवणे : अर्पण म्हणून धान्य मिळवण्यासाठी काकूंनी एका साधिकेसह पुण्यातील ‘मार्केटयार्ड’ परिसरातील घाऊक (‘होलसेल’) धान्य दुकानदारांना संपर्क केला आणि धान्य अर्पण मिळवण्याची सेवा केली.

१ इ ३ आ. ध्येय घेऊन ग्रंथ वितरण करणे : ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करतांना काकू ग्रंथांचे वितरण होण्यासाठी विशिष्ट ध्येय घेऊन प्रयत्न करतात. मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविक आणि जिज्ञासू यांचा कल लक्षात घेऊन त्या ग्रंथ दाखवून त्यांना ग्रंथांचे महत्त्व सांगतात. त्यामुळे थोड्या कालावधीत अधिक ग्रंथांचे वितरण होते.

१ इ ३ इ. महाशिवरात्रीनिमित्त नियोजित केलेल्या विविध सेवांमध्ये काकूंनी वाचकांनाही सहभागी करून घेणे, त्यामुळे त्यांना समष्टी सेवेतील आनंद अनुभवता येणे : सत्संगात महाशिवरात्रीनिमित्त असणार्‍या विविध सेवांत ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि जिज्ञासू यांना सहभागी करून घेण्याविषयी सांगण्यात आले होते. त्या वेळी गोरेकाकूंनी ‘११ वाचकांना सेवेत सहभागी करून घ्यायचे’, ध्येय ठरवले. त्यानुसार त्यांनी फलकप्रसिद्धी, हस्तपत्रकांचे वितरण, ‘ऑनलाईन’ प्रवचन, प्रदर्शन आणि वितरण कक्ष अशा विविध सेवांमध्ये १२ वाचकांना सहभागी करून घेतले. यांपैकी काही वाचक सेवेत प्रथमच सहभागी झाले होते. वाचकांसह काकू स्वतःही या सेवांत सहभागी झाल्या. त्यामुळे वाचकांमध्ये समष्टी सेवेचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांना आनंद अनुभवता आला.

काकूंना कोणतीही सेवा मिळाल्यावर त्या कृतज्ञता व्यक्त करतात. ‘सेवेच्या माध्यमातून गुरुदेव माझ्यावर कृपा करत आहेत आणि माझ्याकडून सेवा करवून घेत आहेत’, यांसाठी त्या सतत कृतज्ञता व्यक्त करतात.’ (४.३.२०२२)

२. सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)

२ अ. सेवेच्या तळमळीमुळे रिक्शांवर एका घंट्यात वीस भित्तीपत्रके लावणे : ‘श्रीमती गोरेकाकू ग्रंथ प्रदर्शन, हस्तपत्रकांचे वितरण, भित्तीपत्रके लावणे, अशा सर्व सेवांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होतात. ‘३१ डिसेंबरच्या ऐवजी गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे करावे’, या मोहिमेत त्यांनी रिक्शांवर १ घंट्यात प्रबोधनात्मक २० भित्तीपत्रके लावली.’ (८.३.२०२२)

३. सौ. नेहा मेहता

३ अ. साधकांची प्रकृती आणि स्थिती यांचा अभ्यास करून गोरेकाकूंनी त्यांना साधनेची दिशा देणे : ‘श्रीमती गोरेकाकू माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. आढावा देणार्‍या प्रत्येक साधकाची प्रकृती आणि स्थिती यांचा अभ्यास करून त्या साधनेच्या प्रयत्नांना दिशा देतात. असे प्रयत्न केल्यावर साधकांना आनंद मिळतो. काकू साधकांना नेहमी आध्यात्मिक स्तरावर हाताळतात. गोरेकाकूंमुळे ‘परम पूज्य गुरुदेव आमच्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणार आहेत’, ही श्रद्धा आम्हा साधकांमध्ये निर्माण व्हायला साहाय्य होते.’ (८.३.२०२२)