चिंचवड येथील महात्मा फुले उद्यानातील २२ झाडे ठेकेदाराने विनाअनुमती तोडली !

केवळ १ सुबाभळीचे झाड तोडण्याची अनुमती असतांना ठेकेदाराने विनाअनुमती तब्बल २२ झाडे तोडली

पिंपरी – चिंचवड शहरातील मोहननगर येथील महात्मा फुले उद्यानातील केवळ १ सुबाभळीचे झाड तोडण्याची अनुमती असतांना ठेकेदाराने विनाअनुमती तब्बल २२ झाडे तोडली. असे असतांनाही महापालिकेतील उद्यान विभागाने ठेकेदार भरत पारखी यांच्यावर केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद (एन्.सी.) केला आहे. त्यामुळे अधिकारी कुणाला पाठीशी घालत आहेत ? असा प्रश्न उपस्थित झाला, तसेच अधिकारी आणि ठेकेदार यांचे आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा पालिकेमध्ये चालू आहे.

केवळ १ सुबाभूळ तोडण्याची अनुमती असतांना ठेकेदाराने १४ फायकस, ६ पेल्टाफोरम, १ चिंच, १ सुबाभूळ आणि १ वड अशी एकूण २३ झाडे तोडली. त्यामुळे वृक्षप्रेमींकडून पालिकेच्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या भूमिकेच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी ‘वृक्षतोडीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे, तो दखलपात्र करण्याविषयी उद्यान विभागाला सूचना दिल्या आहेत. वृक्षतोडीविषयी सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल’, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.


विनाअनुमती झाडे तोडल्याप्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागातील ३ अधिकारी निलंबित !

विनाअनुमती झाडे तोडल्याप्रकरणी महापालिकेतील उद्यान विभागातील संजीव राक्षे, मच्छिंद्र कडाळे आणि भरत पारखी या ३ अधिकार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश दिले आहेत. त्यांनी हे कृत्य आर्थिक लाभासाठी केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले आहे.

संपादकीय भूमिका

तोडलेली झाडे पुन्हा जोडता येत नाहीत, त्यामुळे ठेकेदाराच्या या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक !