वाढत्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या विरोधात दर्यापूर (अमरावती) येथे भव्य मोर्चा !

मोर्च्याला १ सहस्र ६०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती !

दर्यापूर, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील अल्पवयीन मुलीवर शब्बीर पठाण आणि महंमद साहील या धर्मांधांनी बलात्कार केला. ती गर्भवती झाल्यावर त्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वीही काही मासांंपासून दर्यापूर येथे हिंदु युवतींना त्रास देणे, धक्का देणे, धमकी देणे, चाकूचा धाक दाखवणे, त्या जात असतांना रस्ता अडवणे इत्यादी प्रकार केले जात आहेत आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. लव्ह जिहादच्या वाढत्या घटना बघता तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करण्यात यावा, तसेच श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशा मागण्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दर्यापूर येथे मोर्चा आणि आंदोलन करून एकमुखाने केल्या. या वेळी १ सहस्र ६०० हून अधिक हिंदू एकत्र आले होते. वरील सर्वच घटनांचा निषेध करत दर्यापूर येथील हिंदु व्यावसायिकांनी आंदोलनाच्या वेळापर्यंत त्यांची दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवला.

आंदोलन झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. लांबे यांना, तसेच तहसीलदार श्री. योगेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. ‘दर्यापूर येथील शाळा, महाविद्यालये, शिकवणीवर्ग, सौंदर्यप्रसाधनालय (ब्युटीपार्लर), ‘मोबाईल रिचार्ज सेंटर’ आदी ठिकाणी निर्भया पथकाची गस्त घालण्यात यावी’, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

मान्यवरांचे विचार !

हिंदूंनी धर्माचरण करून धर्मावर आलेले संकट दूर करावे ! – ह.भ.प. सागर महाराज परिहर

‘लव्ह जिहाद’सारख्या घटना थांबण्यासाठी तात्काळ कायद्याची आवश्यकता आहे. धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट हीच काळाची आवश्यकता आहे. सर्वांनी असेच एकत्र येऊन धर्माचरण करून आलेले संकट दूर करावे.

दर्यापूर येथील हिंदूंची एकजूट ‘लव्ह जिहाद’चा प्रतिकार करणारी ! – रविभाऊ गणोरकर (हिंदुत्वनिष्ठ)

हिंदु धर्मावर वेळोवेळी अनेक आघात केले जातात; परंतु दर्यापूर येथील हिंदूंची एकजूट बघून यापुढे धर्मांध ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना करू शकणार नाही, याची निश्‍चिती वाटते.

हिंदूंनी तात्काळ एकत्र यायला हवे ! – मनोज गव्हाणे, धर्माभिमानी

वेळोवेळी अशा हिंदूसंघटनाची आवश्यकता आहे. यापुढे कुठलीही घटना घडली, तरी तात्काळ हिंदूंनी असेच एकत्र यायला हवे.

हिंदु संघटित झाला, तर हिंदु राष्ट्राची पहाट लवकर येईल ! – नीलेश टवलारे, जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु संघटित झाला, तर हिंदु राष्ट्राची पहाट लवकर येईल आणि आपल्या माता-भगिनी सुरक्षित रहातील.

हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकावे ! – सौ. अनुभूती टवलारे, रणरागिणी शाखा

हिंदु युवतींनी धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून स्वतःचे ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रापासून रक्षण करावे.

क्षणचित्रे

१. ‘हिंदु जनजागृती समितीकडून गेल्या काही वर्षांपासून दर्यापूर येथे घेण्यात येणार्‍या बैठकांमुळे हिंदू संघटित होत आहेत’, असे मत अनेक उद्योजक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केले.

२. दुपारी १२ वाजताही सहस्रो लोक आंदोलनात सहभागी झाले होते.

३. सर्व प्रतिष्ठान मालकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवल्याने ‘दर्यापूर बंद’चे वातावरण निर्माण झाले होते.

४. उपस्थिती अधिख असूनही शांततेने मोर्चा काढल्याविषयी पोलीस कर्मचार्‍यांनी आंदोलकांचे आभार मानले.