पुणे : ग्रामीण भागातील ११ मार्गांवर पी.एम्.पी.एम्.एल्.ची सेवा बंद, तर एस्.टी.ची सेवा चालू !

पुणे – ग्रामीण भागातील ११ मार्गांवर पी.एम्.पी. प्रशासन बस सेवा बंद करत आहे; मात्र एस्.टी. प्रशासन दोन दिवसानंतर त्या मार्गावर एस्.टी. सेवा चालू करणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. पी.एम्.पी. प्रशासनाने आर्थिक उत्पन्न वाढवण्यासमवेत तोटा अल्प करण्यासाठी अल्प प्रतिसाद असलेल्या ग्रामीण भागातील ४० मार्र्गांवरील १ सहस्र २०० फेर्‍या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ४० पैकी ११ मार्गांवर एस्.टी. सेवा चालू रहाणार आहे; मात्र उर्वरित २९ मार्ग शहरातून जात असल्याने त्या मार्गांवर सेवा चालू रहाणार नाही, असे पुणे विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी स्पष्ट केले. कोरोना संसर्गाच्या काळात शहरातील वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे पी.एम्.पी. प्रशासनाने घटणारे प्रवासी उत्पन्न लक्षात घेऊन ग्रामीण भागात पी.एम्.पी.ची सेवा चालू केली होती; मात्र उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने पी.एम्.पी. प्रशासनाने ग्रामीण भागातील फेर्‍या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

प्रवाशांना वेळेवर आणि तात्काळ सेवा मिळाल्यास उत्पन्न वाढायला साहाय्य होईल; मात्र प्रशासन प्रत्येक वेळी सेवा पुरवण्यास उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळेच प्रवाशांना वैयक्तिक किंवा खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागते.