वन विभागाकडून सिंहगडावरील १३८ अतिक्रमणे जमीनदोस्त !

पुणे – येथील सिंहगडावर १८ नोव्हेंबर या दिवशी वन खात्याने सर्वांत मोठी कारवाई करत गड, गडावरील वाहनतळ यांसह गडाच्या मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या टपर्‍या, हॉटेल, शेड यांसह १३८ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. त्यासाठी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, पोलीस अधिकारी, सैनिकांची वेगवेगळी १० पथके सिद्ध करण्यात आली होती. सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि गडाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कारवाईचे बारकाईने नियोजन केले होते. गडावर प्लास्टिकबंदी आणि पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी वन विभागाने प्रभावी कार्यवाही चालू केली आहे.

सिंहगड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बाबासाहेब लटके यांनी सांगितले की, गडाचे ऐतिहासिक महत्त्व, तसेच शिवकालीन वारसा अबाधित ठेवण्यासाठी विक्रेते आणि स्थानिक नागरिक यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या वेळी ५०-६० वर्षांपासून गडावर वास्तव्य करणार्‍या भूमीहीन आदिवासी पढेर कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय जोरकर यांच्यासह आदिवासी समाजाने केली आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रशासनाने सर्वत्रच्या गडांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशीच शिवप्रेमींची अपेक्षा आहे !
  • एवढे अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असणार्‍यांवरही कठोर कारवाई करा !