भाग्यनगर (तेलंगाणा) येथे भाजपच्या खासदाराच्या घराची तोडफोड

  • मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आमदार असणार्‍या मुलीवर आक्रमणाचा आरोप

  • मुलीकडून भाजपच्या खासदाराला भर चौकात चपलेने मारण्याची धमकी

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे एका पत्रकार परिषदेत भाजपचे खासदार अरविंद धर्मापुरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबाविषयी अश्‍लील टिपणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर १८ नोव्हेंबर या दिवशी काही लोकांनी धर्मापुरी यांच्या घरावर आक्रमण करून घराची तोडफोड केली, तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहनही केले. या वेळी खासदार धर्मापुरी घरात उपस्थित नव्हते. या आक्रमणाविषयी धर्मापुरी राव हे के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या तथा आमदार कविता यांना उद्देशून म्हणाले, ‘तो दिवसही येईल, जेव्हा तुमचे अधिकारीही काही करू शकणार नाहीत. आम्ही तुमच्या वडिलांना (मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना) चपलेने मारू आणि त्यांच्या पक्षाच्या महिला शाखा त्यांची काळजी घेतील.’ या वेळी त्यांनी कविता यांना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आमदार कविता

१. खासदार धर्मापुरी यांच्या विधानावर आमदार कविता म्हणाल्या की, अरविंद घाणेरडा आहे. तो एक विचित्र माणूस आहे. अशी व्यक्ती भाजपमध्ये असणे दुर्दैवी आहे. तो अशीच भाषा वापरत राहिल्यास मी निजामाबाद चौकात त्याला चपलने मारीन. आम्ही गप्प बसणार नाही.

२. वर्ष २०१४ मध्ये आमदार कविता यांनी जम्मू-काश्मीर आणि तेलंगाणा हे भारताचे भाग नसल्याचे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते, ‘जम्मू-काश्मीरमधील काही भाग आपल्या मालकीचा नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण बलपूर्वक तो आपल्यात विलीन केला होता. आपण आंतरराष्ट्रीय सीमा पुन्हा आखून पुढे जायला हवे.’ यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

तेलंगाणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती पक्षाची ही हुकूमशाहीच आहे ! या घटनेतील दोषींच्या विरोधात सरकार काही करणार नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे !