प्रेमभाव, आज्ञाधारकपणा आणि साधनेचे गांभीर्य असलेला नवी मुंबई येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. प्रथमेश विजय भोर (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. प्रथमेश विजय भोर हा या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. प्रथमेश विजय भोर हा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के आहे.’, असे घोषित करण्यात आले होते. आता त्याचे साधनेचे अपुरे प्रयत्न आणि त्याच्यातील स्वभावदोष यांमुळे त्याची पातळी तेवढीच राहिली आहे. त्याच्यावर नियमितपणे उपाय आणि योग्य संस्कार केल्यास त्याचे स्वभावदोष अन् त्याच्यावर आवरण असल्यास ते न्यून होईल अन् त्याची पातळी पुन्हा वाढेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.१०.२०२२) |
उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (२०.११.२०२२) या दिवशी नवी मुंबई येथील दैवी बालक कु. प्रथमेश विजय भोर (वय १० वर्ष) याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे कुटुंबीय आणि इतर साधक यांना त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. प्रथमेश विजय भोर याला सनातन परिवाराकडून १० व्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. श्री. विजय भोर (कु. प्रथमेशचे वडील), सौ. सुजया भोर (प्रथमेशची आई) आणि कु. प्रचीती भोर (प्रथमेशची मोठी बहीण)
१ अ. व्यवस्थितपणा : ‘कु. प्रथमेशला समजू लागल्यापासून तो स्वतःचे सर्व वैयक्तिक आवरतो. तो स्वतःच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवतो. तो स्वतःचे कपडे आणि पुस्तके यांचा खण (कप्पा) नियमितपणे आवरून ठेवतो. तो स्वतःच्या वस्तू काळजीपूर्वक वापरतो.
१ आ. समंजसपणा : प्रथमेशला बाहेर फिरायला नेल्यावर तो कोणत्याही वस्तूसाठी कधीही हट्ट करत नाही.
१ इ. आज्ञाधारकपणा : प्रथमेशला एखादी कृती करण्यास सांगितल्यास तो कुठलीही सबब न सांगता ती लगेचच करतो, उदा. केर काढणे, अंथरुणे घालणे, जेवायला ताट-वाट्या इत्यादी घेणे, अभ्यास करणे, नामजप करणे इत्यादी.
१ ई. निश्चयीपणा
१. एकदा आम्ही सर्वजण त्याच्या आत्याकडे आईस्क्रीम खात होतो. सर्वजण त्यालाही आईस्क्रीम खाण्याचा आग्रह करत होते; मात्र त्याला सर्दी झाली असल्यामुळे त्याने आईस्क्रीम खाल्ले नाही. इतकेच नव्हे, तर कुणी बळजोरीने त्याच्या तोंडात आईस्क्रीम घालू नये, यासाठी तोंडाला मुखपट्टी (मास्क) लावून तो एका कोपर्यात शांत बसला होता.
२. प्रथमेशला वारंवार सर्दी होत असल्याने त्याला आयुर्वेदिक वैद्यांनी काही पथ्ये सांगितली आहेत. ती पथ्ये तो इतकी काटेकोरपणे पाळतो की, आम्हालाही त्याच्या या बालमनाचा ठाम निश्चय पाहून आश्चर्य वाटते. त्या वेळी ‘आम्ही त्याच्यापेक्षा वयाने मोठे असूनही अल्प पडतो’, याची आम्हाला जाणीव होते.
१ उ. आवड-नावड : तो दूरचित्रवाहिनीवर केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची मालिका आवडीने पहातो. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील खेळ खेळायला आवडतात.
१ ऊ. त्याला हस्तकलेच्या वस्तू कल्पकतेने सिद्ध करण्याची आवड आहे.
१ ए. परिस्थिती स्वीकारणे : प्रथमेशला भात खाण्यास आवडत नाही; पण नातेवाइकांकडे जेवणात केवळ पुलाव असेल, तर तो कोणतीही तक्रार न करता शांतपणे तो खातो.’
२. सौ. विद्यागौरी गुजर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे) नेरूळ केंद्र, नवी मुंबई.
२ अ. नम्रता : ‘प्रथमेशच्या बोलण्यात नम्रता जाणवते.
२ आ. तो आईला घरकामात साहाय्य करतो.
२ इ. विचारून घेण्याची वृत्ती : तो ‘मी नामजप कसा करू ? कोणता करू ?’, असे विचारून घेऊन वहीत नामजप लिहितो.
२ ई. उत्साही : प्रथमेश सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतो. त्या वेळी त्याचे देवतांची पूजा भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न असतात.
२ उ. प्रेमभाव : प्रथमेशमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. तो घरी आलेल्या पाहुण्यांना लगेच पाणी देणे, त्यांना बसायला चटई अंथरणे, अशा कृती करतो.’
३. सौ. ऋतुजा सणस, वडाळा केंद्र
३ अ. शांत : ‘प्रथमेश स्वभावाने पुष्कळ शांत आणि समजूतदार आहे. तो नेहमी शांतपणे बोलतो. त्याच्याशी बोलून माझेही मन शांत झाल्याचे जाणवते.
३ आ. प्रगल्भता : त्याच्यामध्ये वयाच्या तुलनेत अधिक प्रगल्भता जाणवते.
३ इ. साधनेचे गांभीर्य : त्याच्या वागण्यातून साधकत्व जाणवते. त्याला कोणताही शारीरिक त्रास होत असल्यास तो वैद्यकीय उपचारांसह आध्यात्मिक स्तरावरील उपायही करतो. त्याच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी पाठपुरावा करावा लागत नाही. त्याच्या साधनेत सातत्य आहे. तो साधनेला महत्त्व देऊन सर्व गांभीर्याने करतो, असे जाणवते.’
४. स्वभावदोष
‘प्रथमेश सकाळी लवकर उठण्याचा आळस करतो.’ – प्रथमेशची आई.
(वरील सर्व लिखाणाचा दिनांक १.८.२०२२ आहे.)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |