तृणमूल काँग्रेसचे नेते अबुल हुसैन याच्या घरातील बाँबस्फोटात लहान मुलगी ठार  

चेंडू समजून बाँबशी खेळत होती !

निवडणुकीत दबदबा निर्माण करण्यासाठी अबुल हुसैन याने गोळा केले होते बाँब !

उत्तर २४ परगना (बंगाल) – येथील चपाली गावामध्ये तृणमूल काँग्रेसचा नेता अबुल हुसैन गायेन याच्या घरात चेंडू समजून बाँबशी खेळणार्‍या एका लहान मुलीचा या बाँबच्या स्फोट झाल्याने मृत्यू झाला. तसेच या अपघातामध्ये काही मुले घायाळ झाली. पोलिसांनी अबुल हुसैन याला अटक केली आहे. ही घटना चपाली गावामध्ये घडली. ‘गायेन याने पंचायत निवडणुकीमध्ये त्याचा दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने घरात बाँब जमा केले होते’, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. गावातील तणावपूर्ण परिस्थिती पहाता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अबुल हुसैन गायेन याच्या घरी काही नातेवाईक आले होते. यामध्ये त्यांच्या ८ वर्षांच्या झूमा खातून या भाचीचाही सामवेश होता. ही मुलगी गायेन याच्या पाळीव गाढवाच्या डोक्याजवळ बांधलेल्या बाँबशी चेंडू समजून खेळत होती. त्याच वेळी या बाँबचा स्फोट झाला आणि झूमाचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीही तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरात झाला होता बाँबस्फोट !

६ नोव्हेंबर या दिवशी बंगालमधील डेगंगामध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरीच बाँबस्फोट झाला होता. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात माहिती देतांना काही कामगार तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याच्या मालकीच्या बांधकाम चालू असलेल्या इमारतीचे काम करत असतांना स्फोट झाल्याचे सांगितले. यानंतरच्या पोलिसांनी ३ जिवंत बाँब घटनास्थळावरून जप्त केले होते.

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल गावठी बाँबचा कारखाना झाला आहे आणि त्यामागे स्वतः तृणमूल काँग्रेसच आहे, हेच अबुल हुसैन याच्या घटनेतून स्पष्ट होते ! केंद्र सरकारने आता वाट न पहाता या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !