अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
माघ पौर्णिमा, रथसप्तमी (१२.२.२०१९) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा झाला. त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. अंगणातील वृक्ष-वेली आनंदात असून त्या स्वतःला गुरुचरणी अर्पण करण्यास आतुर असल्याचे जाणवणे
‘आज सकाळी अंगणातील केर काढण्यासाठी मी बाहेर गेले. तेव्हा सर्व झाडे आनंदाने वाट पहातांना दिसली. त्यांना ‘आज प्रत्यक्ष गुरुदेवांचे दर्शन होणार आहे’, हे ठाऊक असावे. त्यामुळे त्यांना गुरुदेवांच्या चरणी स्वतःला अर्पण करायचे होते. त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी श्रीकृष्णानेच पुढील शब्द सुचवले.
अर्पण करण्या सारा देह मन माझे आतुरले ।
अंगण झाडिले अन् रेखिले रांगोळीने स्वस्तिक ।
वाट पहात कौतुके उभी राहिली वास्तुदेवता ।। १ ।।
आतुरला जीव देवा तुझ्या भेटीसाठी ।
ऋतुराज वसंत उभा अंगणी तुझ्या स्वागतासाठी ।। २ ।।
आम्रवृक्ष आनंदला, मोहरे बहरला ।
गुरुदेवा, तुम्हाला सुगंध देण्या तोही आतुरला ।। ३ ।।
गुलाब बहरला, चरणी येण्या आतुरला ।
प.पू. बाबा (टीप १), तुमच्या अनुसंधानात तो राहिला ।। ४ ।।
तन-मन-धन माझे देवा तुझ्या चरणी वाहिले ।
अर्पण करण्या सारा देह मन माझे आतुरले ।। ५ ।।
टीप १ : प.पू. भक्तराज महाराज
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून त्या निर्गुण स्थितीत असल्याचे जाणवणे आणि त्यांना पाहून प.पू. कलावतीआईंची आठवण येणे
सोहळ्याच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहिल्यावर ‘त्या निर्गुण अवस्थेत आहेत’, असे मला सतत जाणवत होते. त्यांना पहातांना मला प.पू. कलावतीआईंची आठवण येत होती. त्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांची पूजा करत असतांना ‘त्यांच्या हातून काहीतरी मिळत आहे’, या विचाराने ते स्वीकारण्यासाठी माझ्याकडून सारखा पदर पसरला जात होता.’
– श्रीमती जयश्री म्हैसकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), रसायनी, पनवेल. (२९.६.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |