धाराशिव येथे मनसेच्या चेतावणीनंतर रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीला प्रारंभ !

धाराशिव, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – सार्वजनिक बांधकाम विभागाने शहर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम चालू केले आहे. वाहनधारक आणि नागरिक यांच्या तक्रारीवरून मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ‘खड्डे न बुजवल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासू’, अशी चेतावणी दिली होती. या चेतावणीची नोंद घेत संबंधित अधिकार्‍यांनी खड्डे बुजवण्याचे काम चालू केले आहे. (पाटीभर खडी आणि त्यावर वाटीभर काळे तेल घालून खड्डे बुजवण्याचे वरवरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते. त्यामुळे पुन्हापुन्हा रस्ते नादुरुस्त होतात. बांधकाम विभागाची ही पद्धत भ्रष्ट ठेकेदारीला खतपाणी घालत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भ्रष्ट ठेकेदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

प्रत्येक वेळी राजकीय पक्षांना चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:ची कामे का करत नाही ?