‘देवश्री आणि चिन्मयी या माझ्या जुळ्या मुली आहेत. वर्ष २०२० मध्ये दोघीही १० वीत होत्या. इतर मुले शिकवणीला जातात; पण देवश्री आणि चिन्मयी यांनी ‘स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा’, असे ठरवले होते. त्या केवळ शाळेचा अध्यापकवर्ग आणि त्यांचे बाबा यांचे साहाय्य घेत हात्या. देवश्री संगणकावर अभ्यासक्रमातील विषयांच्या ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) बघायची. दहावीचा अभ्यास करतांना ‘देवाने कसे साहाय्य केले ?’ याविषयी देवश्री आणि चिन्मयी यांना जाणवलेली सूत्रे, तसेच नामजप करतांना त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्याच शब्दांत पुढे दिल्या आहेत.’ – सौ. दीपाली मनोज ओंकार (देवश्रीची आई), अंधेरी, मुंबई. |
(‘वर्ष २०१५ मध्ये कु. चिन्मयी ओंकार हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती.’ – संकलक)
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
१. कु. चिन्मयी ओंकार हिला आलेल्या अनुभूती
१ अ. श्रीकृष्णाने पूर्ण एक घंटा नामजप करून घेणे
१ अ १. रात्री ८ ते ९ या वेळेत नामजप करतांना श्रीकृष्ण विराट रूपात दिसणे, त्याला लहान होण्याची प्रार्थना केल्यावर तो लहान होणे : ‘मी रात्री ८ ते ९ या वेळेत नामजप करतांना श्रीकृष्ण माझ्यासमवेत बसला असल्याचे मला दिसले. तो मला त्याच्या समोर बसवून माझ्याकडून नामजप करवून घेत होता. नामजप चालू असतांना श्रीकृष्णाचा आकार हळूहळू मोठा होत गेला. तो इतका मोठा झाला की, मी त्याच्या पायाशी एका कणाएवढीही दिसत नव्हते. मी त्याला ‘कृष्णा, तू लहान हो’, अशी प्रार्थना केली. मग तो पुन्हा लहान झाला.
१ अ २. श्रीकृष्णाने न थांबता सतत मोठ्याने नामजप करून घेणे आणि साधिकेवर होत असलेली आक्रमणे सुदर्शनचक्राच्या माध्यमातून नष्ट करणे : श्रीकृष्ण माझ्याकडून मोठ्याने आणि न थांबता नामजप करून घेत होता. तो मला नामजप करतांना थांबायची एकही संधी देत नव्हता. त्याने मला ध्यानमुद्रेत बसवले. नामजपामुळे ‘माझ्यावरील आवरण अल्प होत आहे’, असे मला जाणवले. मला माझ्यावर होत असलेली अनिष्ट शक्तींची आक्रमणे दिसत आणि जाणवतही होती. तेव्हा माझ्या अवतीभोवती फिरत असलेले श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र माझ्यावर होणारे प्रत्येक आक्रमण चिरडून नष्ट करून टाकत असल्याचे मला जाणवायचे.
१ अ ३. नामजप करतांना आवाज हळू होऊ लागल्यावर श्रीकृष्णाने साहाय्य करणे; परंतु नामजप थांबू न देणे : मी मोठ्या आवाजात नामजप करत असल्यामुळे माझा घसा दुखायला लागला. तेव्हा माझ्या भोवती फिरत असलेले श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र माझ्या घशाजवळ यायचे आणि त्यामुळे माझा घसा दुखायचा थांबायचा. असे अनेक वेळा झाले. हळूहळू माझा आवाज हळू यायला लागला, तरीही श्रीकृष्ण माझा नामजप थांबू देत नव्हता. नामजप करतांना माझ्या आवाजात पालट जाणवल्यावर श्रीकृष्ण मला साहाय्य करायचा आणि माझ्याकडून नामजप करून घ्यायचा. (नामजप करतांना माझी एकाग्रता टिकून रहावी; म्हणून श्रीकृष्णाने माझ्या खोलीत एकही घड्याळ ठेवले नव्हते.)
१ अ ४. नामजप थांबवून खोलीतून बाहेर जायची २ – ३ वेळा इच्छा होणे, तेव्हा प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने साधिकेला थांबवणे आणि एक घंटा पूर्ण होईपर्यंत तिच्याकडून नामजप करवून घेणे : नंतर मला खोलीतून बाहेर जायची इच्छा झाली; पण श्रीकृष्णाने मला सांगितले, ‘अर्धा घंटाच नामजप झाला आहे’ आणि त्याने पुन्हा मला ध्यानमुद्रेत बसवले आणि तो माझ्याकडून नामजप करवून घेऊ लागला. मी थोड्या वेळाने पुन्हा त्याला विचारले, ‘मला खोलीच्या बाहेर जायचे आहे. जाऊ का ?’ तेव्हा त्याने सांगितले, ‘अजून १५ मिनिटे बाकी आहेत.’ त्याने पुन्हा मला नामजप करायला बसवले. त्या वेळी मला सतत माझ्यावर होणारी आक्रमणे जाणवत होती आणि भोवती सुदर्शनचक्र फिरतांना दिसत होते. श्रीकृष्ण माझे रक्षण करत होता. शेवटी मी श्रीकृष्णाला म्हणाले, ‘आता मी थकले आहे. मला बाहेर जाऊ दे.’ तेव्हा कृष्ण म्हणाला, ‘जा.’ मला वाटले, ‘मी हट्ट केला; म्हणून त्याने मला बाहेर जायची अनुमती दिली; परंतु मी बाहेर येऊन पाहिले, तेव्हा घड्याळात नुकतेच ९ वाजले होते. श्रीकृष्णाने माझ्याकडून पूर्ण १ घंटा नामजप आणि उपाय करवून घेतले होते.
१ अ ५. अशा प्रकारे नामजप करतांना श्रीकृष्णाने मला अनिष्ट शक्ती दाखवल्या, तसेच चैतन्याची वलये दाखवली आणि माझे रक्षणही केले.
२. नामजप करतांना झालेले त्रास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले रक्षण
२ अ. नामजप करतांना ‘अनिष्ट शक्तींचे चेहरे दिसून ते आक्रमण करत आहेत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्यापासून रक्षण करत आहेत’, असे साधिकेला दिसणे : एकदा माझी प्राणीशास्त्राची (‘बायोलॉजीची’) परीक्षा होती. आईने मला रात्री एक घंटा बसून नामजप करायला सांगितला; म्हणून मी नामजपाला बसले. थोड्या वेळाने मला काळ्या रंगाचे पुष्कळ वेगवेगळे चेहरे दिसायला लागले. ते माझ्यावर सतत आक्रमण करत होते. त्या वेळी मी जोरात नामजप करत परम पूज्यांना प्रार्थना केली. तेव्हा ‘परम पूज्य माझ्यासमवेत आहेत’, असे मला दिसले. त्यांच्या हातात काठी होती आणि ते सूक्ष्मातून युद्ध करत माझे रक्षण करत होते. तरीही आक्रमण अल्प होत नव्हते. मला पुष्कळ दूरपर्यंत हे काळे तोंडवळे दिसत होते. ‘ते तोंडवळे माझ्या अवतीभवती माणसाचे रूप घेऊन माझ्यावर आवरण आणून आक्रमण करत आहेत’, असे मला वाटत होते. मी पुष्कळ घाबरले होते आणि सारखी प्रार्थना करत होते. मी १ घंटा नामजप केला, तरीही युद्ध चालूच होते.
२ आ. दुसर्या दिवशीही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले रक्षण करत आहेत’, याची जाणीव होणे आणि त्यामुळे त्यांच्यावर असलेली श्रद्धा वाढणे : दुसर्या दिवशीही मी डोळे बंद केल्यावर मला युद्धच दिसत होते. या प्रसंगावरून ‘माझ्या अवतीभवती किती आवरण आहे !’ हे माझ्या लक्षात आले आणि ‘माझ्यासाठी परम पूज्यांना लढावे लागत आहे’, याचे मला वाईट वाटले. ‘देवाने मला शिकवण्यासाठी हा प्रसंग घडवला आहे’, याची मला जाणीव झाली आणि माझी परम पूज्यांवरची श्रद्धा वाढली.
३. श्रीकृष्णाने सर्व देवता आजोबांचे रक्षण करत असल्याविषयी दाखवलेले दृश्य !
३ अ. आजोबांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना केल्यावर ‘सर्व देवता आजोबांवर उपाय करत आहेत’, असे श्रीकृष्णाने दाखवणे : ५.६.२०२० या दिवशी सकाळी माझ्या आजोबांना बरे नव्हते; म्हणून मी त्यांच्यासाठी सांगितलेला नामजप करत होते. तेव्हा मला सनातनचे पंचांग मिळाले. त्यात सर्व देवतांची चित्रे होती; म्हणून मी सर्व देवता आणि प.पू. भक्तराज महाराज यांना ‘माझ्या आजोबांचे रक्षण करा’, अशी प्रार्थना केली. तेव्हा श्रीकृष्णाने ‘सर्व देवता आजोबांच्या खोलीत त्यांच्याजवळ आहेत आणि त्यांच्यावर उपाय करत आहेत’, याची मला जाणीव करून दिली.
३ आ. देवता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांची शक्ती घालून आजोबांवरील आवरण काढतांना दिसणे : त्यानंतर मला पुढील दृश्य दिसले. ‘प्रत्येक देवतेच्या हातात दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक असून देवता त्यात स्वतःची शक्ती घालून आजोबांचे आवरण काढत आहेत. त्या शक्तीमुळे आजोबांच्या भोवती चैतन्याचे वलय निर्माण झाले. सर्व देवता त्यांच्या शस्त्रांनी आजोबांवरील आवरण खेचून काढून आजोबांना चैतन्य देत होत्या. त्या चैतन्याने आजोबांमधील सर्व अनिष्ट शक्तींना मारून त्यांचे रक्षण केले.
३ इ. देवतांच्या चैतन्याचा प्रकाश घरात दिसणे, परात्पर गुरु पांडे महाराज यांनीही काठीने आजोबांवरील त्रासदायक आवरण काढणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणपादुका आजोबांच्या डोक्यावर असल्याचे दिसणे आणि त्यानंतर आजोबांना बरे वाटणे : वातावरणात मंत्रजप, स्तोत्रे आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने चालू होती. परम पूज्य आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळही तिथेच होत्या. सर्व देवतांच्या चैतन्यामुळे घरात चैतन्याचा प्रकाश दिसत होता. तिथे एक त्रिशूळ होते. ते सर्व अनिष्ट शक्तींना खेचून घेत होते. परात्पर गुरु पांडे महाराजही तिथे होते. ते आपल्या काठीने आजोबांवरील त्रासदायक आवरण काढत होते.
त्या वेळी मला ‘परम पूज्यांच्या चरणपादुका आजोबांच्या डोक्यावर आहेत’, असे दिसले. त्यानंतर थोड्या वेळाने आजोबांना बरे वाटू लागले.’
४. कृतज्ञता : ‘श्रीकृष्णाच्या कृपेनेच हे सर्व मला अनुभवता आले, यासाठी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. चिन्मयी मनोज ओंकार (वय १५ वर्षे), अंधेरी, मुंबई. (४.६.२०२०)
५. चिन्मयीचे स्वभावदोष : ‘आत्मविश्वास नसणे, प्रतिमा जपणे, चूक न स्वीकारणे, न ऐकणे.’
– सौ. दीपाली मनोज ओंकार (चिन्मयीची आई), अंधेरी, मुंबई. (४.६.२०२०)
५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अंधेरी, मुंबई येथील कु. देवश्री मनोज ओंकार (वय १७ वर्षे) !
(वर्ष २०१५ मध्ये कु. देवश्री मनोज ओंकार हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती. – संकलक)
१. कु. देवश्रीला अभ्यास करण्यासाठी देवाकडून मिळालेले साहाय्य !
१ अ. शाळा पुष्कळ दूर असल्यामुळे अभ्यासातील अडचणी विचारण्यासाठी शाळेत जाणे शक्य नसणे, त्या वेळी आत्याने आईला दूरभाष करून ‘मुली (मी आणि माझी बहीण चिन्मयी) मला अडचणी विचारू शकतात’, असे सांगणे : ‘मी १० वीचे पेपर लिहिण्याच्या सरावाची सिद्धता करत होते. तेव्हा मला पुष्कळ शंका असायच्या. माझी शाळा घरापासून दूर असल्यामुळे शिक्षकांना अडचणी विचारायला जाणे शक्य नव्हते आणि त्यात माझा पुष्कळ वेळही गेला असता. एकदा देवाच्या कृपेने माझ्या एका आत्याने आईला सहज दूरभाष केला आणि म्हणाली, ‘‘तुझ्या मुलींना काही अडचणी असतील, तर त्या मला विचारू शकतात.’’ मग दुसर्या दिवसापासून मी तिला अडचणी विचारू लागले. त्या वेळी ‘देवाला तुमची किती काळजी आहे !’, असे बाबांनी माझ्या लक्षात आणून दिले.
१ आ. देवाने एक ध्वनीचित्रफीत पहायला सुचवल्यामुळे विज्ञान, भूगोल आणि इंग्रजी या विषयांच्या अडचणी सोडवण्यास साहाय्य होणे : मी एकदा गुगलवर इंग्रजी विषयावरील ध्वनीचित्रफीत शोधली. तेव्हा देवाने मला रंजना चटर्जी यांची ध्वनीचित्रफीत बघायला सुचवले. मी ती ध्वनीचित्रफीत आणि अन्य विषयांवरील ध्वनीचित्रफिती पाहिल्या. तेव्हा मला ‘देवाच्या कृपेने विज्ञान, भूगोल आणि इंग्रजी या विषयांच्या अडचणी सोडवायला एक शिक्षक मिळाला’, असे वाटून माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. दहावीच्या परीक्षेचे गांभीर्य नसणे, ‘परीक्षेसाठी पुष्कळ अवकाश आहे’, असे वाटून आरंभीपासून अभ्यास न करणे; पण गुरुमाऊलीच्या कृपेमुळे परीक्षेच्या वेळी अभ्यासासाठी एक मास वेळ मिळणे : माझी ‘बोर्डा’ची परीक्षा १ मास चालणार होती. त्यामुळे मला प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्यासाठी १ दिवस मिळणार होता. खरेतर मी वर्षभर अभ्यास केला नव्हता; कारण मला १० वीचे गांभीर्य वाटत नव्हते. देवाने मला पहिल्या आणि दुसर्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासासाठी दिवाळी अन् नाताळ या सुट्यांच्या माध्यमातून वेळ दिला होता; परंतु मी पूर्वपरीक्षेला महत्त्व दिले नाही. ‘मी नंतर अभ्यास करीन. मी आता काहीच केले नाही, तरी चालेल; कारण नंतर माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे’, असे मी म्हणायचे; पण माझी काळजी परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) होती. त्यांना माझे सर्व विचार ठाऊक होते; म्हणून ‘त्यांनी मला ‘बोर्डा’च्या परीक्षेच्या अभ्यासासाठी १ मास दिला’, असे माझ्या लक्षात आले. त्यासाठी मी कृपाळू गुरुमाऊलीच्या चरणी कृज्ञता व्यक्त करते.
३. अनुभूती
३ अ. रात्री नामजप करतांना श्रीकृष्णाने ‘परीक्षेची काळजी करून नकोस, अभ्यास कर. परात्पर गुरु डॉ. आठवले तुमची काळजी घेतील’, असे सांगून आश्वस्त करणे : आमच्या घरात श्रीकृष्णाचे मोठे चित्र आहे. मी त्या चित्राकडे पाहून नामजप करतांना त्याच्या ओठांकडे बघते. तेव्हा मला त्याचे ओठ हलतांना दिसतात. त्या वेळी मी त्याला विचारते, ‘तू जे सांगत आहेस, ते मला समजत नाही.’ तेव्हा त्याने मला नादभाषेत सांगितले, ‘तू अभ्यास कर आणि प्रयत्न करत रहा. तू काळजी करू नकोस. देव तुझ्या पाठीशी आहे. तू शांत आणि स्थिर राहून नामजप कर. तुमची काळजी परम पूज्य घेतील.’ तेव्हा मला श्रीकृष्णाचे चित्र जागृत झाल्यासारखे वाटले.
३ आ. रसायनशास्त्राच्या मौखिक (तोंडी) परीक्षेच्या वेळी श्रीगुरूंच्या कृपेमुळे अभ्यास केलेलेच प्रश्न विचारले जाणे : मी परीक्षेची सिद्धता करतांना काही गोष्टींचा अभ्यास केला नव्हता; म्हणून मला पुष्कळ भीती वाटत होती. चिन्मयी (माझी बहीण) मला म्हणाली, ‘‘आपली परीक्षा छान जाईल; कारण आपण जो अभ्यास केला आहे, त्यातलेच प्रश्न कृष्ण आपल्या अध्यापकांना विचारायला सुचवतो.’’ श्रीगुरूंच्या कृपेने मी अभ्यास केलेले प्रश्नच मला विचारण्यात आले होते. मला आनंद झाला आणि मी कृतज्ञता व्यक्त केली. मी इतर सर्व मुलांकडे पाहिले. तेव्हा मला त्यांच्या तोंडवळ्यावर ताण दिसत होता. तेव्हा ‘मी आणि चिन्मयी आमच्यावर असलेल्या श्रीगुरूंच्या कृपेमुळे आनंदी आहोत’, याची मला जाणीव झाली.
३ इ. नामजपाच्या वेळी श्रीकृष्णाने सागितल्याप्रमाणे कृती करतांना त्रास होऊ लागल्यावर त्याचे सुदर्शनचक्र वेगाने सभोवती फिरतांना दिसणे : मी नामजप करतांना माझा श्रीकृष्णाशी पुढीलप्रमाणे संवाद झाला.
श्रीकृष्ण : तू माझ्या चेहर्याकडे बघ.
मी (देवश्री) : तुझ्या डोळ्यांकडे बघितल्यावर माझे डोळे दुखतात.
श्रीकृष्ण : तू डोळे बंद करू नकोस.
मी त्याला प्रार्थना केली, ‘तूच माझ्याकडून हे करवून घे.’
श्रीकृष्ण : तुला त्रास देणार्या वाईट शक्तीला हा त्रास होत आहे. तू घाबरू नकोस. तू लढत रहा.
तेव्हा मला २ वेळा श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र सभोवती पुष्कळ वेगाने फिरतांना दिसले.
३ ई. मी परम पूज्यांच्या चरणांवर डोके ठेवून नामजप करतांना माझ्या मनात एकही विचार आला नाही आणि सतत नामजप होऊन माझे ध्यान लागले होते.
३ उ. रात्री झोपेत वाईट स्वप्न पडल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले साहाय्य
३ उ १. रात्री स्वप्नात गुंड मारण्यासाठी मागे लागल्याचे दिसणे आणि नंतर जाग येणे : एकदा मला रात्री पुढील स्वप्न पडले. ‘माझा शालांत परीक्षेत शाळेत ५वा क्रमांक आला असून मला बक्षीस मिळाले आहे. मी एका बागेसमोर उभी होते. तिथे एक काका होते. ‘ते तुला रिक्षेतून घरी सोडतील आणि तुझी काळजी घेतील’, असे बाबा मला म्हणाले. तेव्हा मी एका चारचाकी गाडीच्या पाठीमागे तीन व्यक्ती पाहिल्या. ‘ते गुंड असावेत’, असे मला वाटले आणि माझा संदेह योग्यच होता. थोड्या वेळाने त्या लोकांनी माझ्याकडे पाहून चाकू बाहेर काढले आणि ते मला मारण्यासाठी आले. ते माझ्या पाठीमागे धावत होते. ते गुंड मला रिक्शातून घरी सोडणार्या काकांच्याही मागे लागले होते; म्हणून ते काका मला न वाचवता तिकडून निघून गेले. मी बागेच्या टोकापर्यंत पोचले.’ तेवढ्यात मला जाग आली आणि ते स्वप्न असल्याचे समजले.
३ उ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून ‘उपायांसाठी लावलेली देवतांची चित्रे पालटलीस का ?’, असे विचारणे आणि ती पालटली नसल्याने त्यांनी ती पालटायला लावून नंतर झोपण्यास सांगणे : त्यानंतर सूक्ष्मातून परम पूज्य मला म्हणाले, ‘तू उपायांसाठी लावलेली देवतांची चित्रे पालटलीस का ?’ मी ‘नाही’ म्हणाले. तेव्हा त्यांनी मला ‘ती लगेचच पालट’, असे सांगितले. चित्रे पालटांना ते माझ्या समवेत होते. मी चित्रे पालटण्याचा आळस केला होता. त्यांनी माझ्याकडून चित्रे पालटून घेतली आणि पहिली चित्रे विसर्जित करून घेतली. नंतर त्यांनी मला झोपण्यास सांगितले. त्यानंतर मी गादीवर डोळे बंद करून झोपले, तेव्हा मला शक्ती आल्यासारखे वाटले.
३ उ ३. झोपतांना खिडकी हलतांना पाहून पुष्कळ भीती वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु आणि संत साधिकेजवळ बसल्यानंतर साधिकेची भीती जाऊन तिला गाढ झोप लागणे : काही वेळाने खोलीतील खिडकी हलू लागली. ते पाहून मला भीती वाटली. तेव्हा परम पूज्य म्हणाले, ‘तू संपूर्ण अंगावर चादर पांघरून घे.’ मी तसे केले, तरीही मला भीती वाटत होती. तेव्हा ते सूक्ष्मातून माझ्याजवळ येऊन बसले, तरीही मला भीती वाटतच होती; म्हणून मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु अनुराधा वाडेकर, सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांना माझ्या अवतीभवती बसायला सांगितले. एक जागा रिकामी होती; म्हणून मला भीती वाटत होती. मी तसे परम पूज्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांना माझ्या बाजूला बसायला सांगितले. त्यांनतर मला छान झोप लागली.
३ ऊ. पूर्वी नेहमी सकाळी उठल्यावर एका मुलाचा चेहरा दिसून मन अस्थिर होणे आणि आता त्याला क्षात्रवृत्तीने ‘माझे गुरुदेव श्रीमन्नारायण असून ते तुला साधनेला लावतील’, असे म्हटल्यावर तो चेहरा नाहीसा होणे : मला नेहमी सकाळी उठल्यावर एका मुलाचा चेहरा दिसायचा. हा त्रास सतत २ वर्षे होऊन मनात त्याविषयी विचार यायचे आणि ‘मन पुष्कळ अस्थिर व्हायचे’, असे मला जाणवले. त्यांनतर एकदा ‘माझे गुरु श्रीमन्नारायण आहेत. ते तुला मारून टाकतील. ते तुला साधनेला लावतील’, असे मी म्हटल्यावर तो चेहरा २ सेकंदात नाहीसा झाला. परम पूज्यांनी एकदा त्यांच्याशी झालेल्या भेटीत मला सांगितले होते, ‘‘आपल्याला रडायचे नाही, तर लढायचे आहे.’’ मी आधी तसे केले नाही; म्हणून मी त्यांची क्षमायाचना केली. आता त्यांच्याच कृपेने मी तसे करू शकत होते. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृज्ञता व्यक्त करते.’
– कु. देवश्री मनोज ओंकार, अंधेरी, मुंबई (४.६.२०२०)
४. देवश्रीचे जाणवलेले स्वभावदोष : ‘धांदरटपणा, स्वतःला श्रेष्ठ समजणे, भावनाशीलता, दिखाऊपणा.
|