रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे आणि साधकांचे त्रास दूर होऊन त्यांची साधना चांगली व्हावी’, यासाठी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्यानुसार प्रतिदिन ‘नवग्रह-मंत्र’ पठण करतात आणि श्रीरामरक्षास्तोत्रही म्हणतात. हे म्हणतांना साधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६१ वर्षे)
‘२२.५.२०२२ या दिवशी मंत्रपठण करत असतांना मला परात्पर गुरुदेव विराट रूपामध्ये दिसले आणि ‘नवग्रह त्यांच्या समोर हात जोडून उभे आहेत’, असे दिसले. तेव्हा माझी भावजागृती होऊन माझे मंत्रपठण अधिक भावपूर्ण झाले.’
२. सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४८ वर्षे)
२ अ. श्रीरामरक्षास्तोत्र म्हणण्यास आरंभ केल्यावर सूक्ष्मातून ‘वानर येऊन बसले आहेत’, असे दिसणे : ‘३.६.२०२१ या दिवशी आम्ही सर्व साधिका रामनाथी आश्रमातील सभागृहात मंत्रपठण करत होतो. त्या वेळी ‘नवग्रहमंत्र’ म्हणून झाल्यानंतर आम्ही ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ म्हणण्यास आरंभ केला. तेव्हा मला सूक्ष्मातून ‘आमच्यासमोर वानर येऊन बसले आहेत’, असे दिसले. ते पाहून माझी भावजागृती झाली आणि श्रीराम अन् परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२ आ. श्रीरामरक्षास्तोत्र म्हणतांना ‘प्रत्यक्ष श्रीराम सिंहासनावर विराजमान झाले आहेत आणि ते सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : ४.६.२०२२ या दिवशी आम्ही सर्व साधिका नेहमीप्रमाणे मंत्रपठण करत होतो. तेव्हा श्रीरामरक्षास्तोत्र म्हणायला आरंभ केल्यावर मला ‘आमच्यासमोर प्रत्यक्ष श्रीराम सिंहासनावर विराजमान झालेले आहेत आणि ते सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
२ इ. त्या वेळी वातावरणात पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवत होता अन् माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवत होत्या. श्रीराम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला हे चैतन्य अनुभवता आले, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
३. सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१, वय ५० वर्षे)
अ. ‘४.६.२०२२ या दिवशी आम्ही रामरक्षा म्हणायला आरंभ केल्यावर मला श्री रामरायांच्या बाजूच्या सिंहासनावर परात्पर गुरु डॉक्टर आठवले विराजमान असल्याचे आणि ते सर्व साधकांकडे कृपादृष्टीने पहात असल्याचे जाणवले.
आ. त्यानंतर ‘प्रत्यक्ष मारुतिराया श्रीरामरायांच्या चरणी बसले आहेत आणि ते रामरक्षा ऐकत आहेत’, असेही मला जाणवले.
श्रीराम, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि नवग्रह यांच्या कृपेने मला हे अनुभवता आले, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
४. श्रीमती जयश्री मुळे (वय ७६ वर्षे)
४ अ. ‘मंत्रपठणाच्या वेळी सूक्ष्मातून गरुड पक्षी आश्रमाच्या दिशेने येत असलेला पाहून भावजागृती होणे : ‘३.६.२०२२ या दिवशी सकाळी १० ते १०.३० या वेळेत आम्ही मंत्रपठण करत होतो. १०.३० ला मंत्रपठण समाप्तीच्या वेळी ‘ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ।’ ही ओळ म्हणत असतांना ‘गरुडध्वजम्’ हा शब्द उच्चारताच मला सूक्ष्मातून गरुड पक्षी आश्रमाच्या दिशेने येत असलेला दिसला. त्या वेळी माझी भावजागृती झाली.’
४ आ. मंत्रपठण करत असतांना आकाशात ढगांची आकृती सिद्ध होऊन तिच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसणे अन् दुसर्या दिवशी (६.६.२०२२ या दिवशी) ‘शिवराज्याभिषेकदिन’ असल्याचे समजणे : ‘५.६.२०२२ या दिवशी आम्ही नवग्रहमंत्रांचे पठण करत होतो. मला समोरचे आकाश दिसत होते. सकाळी १०.१५ वाजता माझे आकाशाकडे लक्ष गेले. तेव्हा मला ढगांची एक आकृती सिद्ध होत असल्याचे दिसले. दोनच क्षणांत मला ढगांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसला. तो मला २ – ३ क्षण दिसत होता. तेव्हा माझ्या मनात आले, ‘आज काय आहे ?’ नंतर मला कळले, ‘उद्या (६.६.२०२२ या दिवशी) शिवराज्याभिषेकदिन आहे.’
हे गुरुदेवा आपल्या कृपेमुळेच मला ही अनुभूती आली, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |