गायरान भूमीवरील अतिक्रमण काढण्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा !
कोल्हापूर, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – गायरान भूमीवर ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण नसून ती त्यांच्या अधिकाराची भूमी आहे. शहरी भागाला वेगळा आणि ग्रामीण भागाला वेगळा न्याय असे का ? आमच्या सरकारने वर्ष २०२२ मध्ये काढलेला शासकीय अध्यादेश अंतिम मानून गायरान भूमीची जागा गावठाण हद्दवाढ म्हणून संमत करावी. राज्य सरकारने या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घ्यावी. असे न करता घरे काढण्यासाठी आमच्यावर बळजोरी केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. काही चुकीचे झाल्यास त्याला सरकार उत्तरदायी असेल, अशी चेतावणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिली. गायरान भूमीवरील अतिक्रमण काढण्याच्या विरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.
… तर रक्तपात होईल ! – हसन मुश्रीफ, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
अतिक्रमण कारवाई थांबली नाही, तर कोल्हापूर जिल्हा बंद ठेवावा लागेल. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांनी शासनाला कळवले पाहिजे, आम्ही हतबल आहोत आणि वेळप्रसंगी सर्व जिल्हाधिकार्यांनी चाकरीचे त्यागपत्र द्यावे. अतिक्रमणाच्या संदर्भात राज्यशासन गप्प आहे, वास्तविक आतापर्यंत पुनर्विचार याचिका प्रविष्ट होणे अपेक्षित होते. अतिक्रमण झालेल्या ग्रामस्थांना वीज, पाणी सर्व देण्यात आले आहे. त्यामुळे या स्थितीत अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न झाल्यास रक्तपात होईल, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.