मोहाली (पंजाब) येथे अज्ञातांकडून महंतांची हत्या

महंत शीतल दास (डावीकडे)

मोहाली (पंजाब) – येथे महंत शीतल दास (वय ७० वर्षे) यांची अज्ञातांनी धारदार शस्त्राद्वारे हत्या केली. ते येथे एका झोपडीत रहात होते. त्यांच्या हत्येमागील कारण आणि हत्या करणारे यांविषयी अद्याप कुठलीही माहिती समजू शकलेली नाही. पोलीस या हत्येचे अन्वेषण करत आहेत. स्थानिकांच्या मते, म्हशी चोरणार्‍या टोळीने त्यांची हत्या केली असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी येथे म्हशी चोरणारे चोर घुसले होते. ते एका शेतकर्‍याची म्हैस चोरी करत असल्याचे पाहून नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर ते पळून गेले होते.

१. शीतल दास हे गेल्या ४२ वर्षांपासून मोहालीजवळील बुढनपूर गावातील सरकारी शाळेच्या मागे असलेल्या झोपडीत रहात होते. ते मूळचे पंजाबच्या फतेहगड साहिब जिल्ह्यातील एका गावातील होते. त्यांची येथे काही प्रमाणात भूमीही होती.

२. या हत्येवरून बहुजन समाज पक्षाने राज्यातील आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. ‘आपचे सरकार आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. पंजाबमध्ये लोकांच्या हत्या होत असतांना मुख्यमंत्री भगवंत मान गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यात मग्न आहेत’, अशी टीका बसपचे सचिव जगजीत सिंह यांनी केली आहे.

पंजाबमध्ये काही दिवसांत ३ हत्या

पंजाबमध्ये गेल्या आठवड्याभरात ३ जणांच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांच्यानंतर डेरा सच्चा सौदाचे भक्त प्रदीपसिंह यांची हत्या करण्यात आली. आता महंत शीतल दास यांच्या हत्या झाली. तसेच यापूर्वीही अनेकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • देहलीच्या सीमेवर वर्षभर शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी काही खलिस्तानवाद्यांनी पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. हे पहाता केंद्र सरकारने खलिस्तानवाद्यांविषयी अधिक कठोर होणे आवश्यक झाले आहे !
  • पंजाबमध्ये गायक, हिंदुत्वनिष्ठ आणि आता महंत यांच्या एका पाठोपाठ एक झालेल्या हत्या, तसेच खलिस्तानवाद्यांचा वाढता उपद्रव पहाता केंद्र सरकारने पंजाबमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !