धाराशिव शहरातील खड्डे लवकर बुजवा अन्यथा तोंडाला काळे फासू !

मनसेची सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍याला चेतावणी

प्रतिकात्मक छायाचित्र

धाराशिव – शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रतिदिन अपघात होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिली आहे. शहरातील सांजा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका, बार्शी नाका ते हतलाई रस्ता, दर्गा रस्ता ते वैराग नाका यांसह अन्य ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

दादा कांबळे यांनी म्हटले आहे की, महामार्गावरील खड्डे बुजवणे आणि दुरुस्ती यांसाठी ‘ई टेंडर’ काढले असूनही ठेकेदार रस्त्याची डागडुजी, खड्डे बुजवणे, रस्ता दुरुस्त करणे ही कामे करत नाहीत. अशा ठेकेदारांना काळ्या सूचीत टाकण्यात यावे, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. ८ दिवसांच्या आत हे खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.