व्लादिमीर पुतिन ‘जी-२०’ शिखर परिषदेत सहभागी होणार नाहीत !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

मॉस्को (रशिया) – इंडोनेशियातील बाली येथे १५ आणि १६ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या ‘जी-२०’ शिखर परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन उपस्थित रहाणार नाहीत. त्यांच्याऐवजी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह हे ऑनलाईन उपस्थित रहाणार आहेत.

युक्रेनसमवेतच्या युद्धावरून पाश्‍चात्त्य देशांकडून होणारा निषेध टाळण्यासाठी रशियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. या परिषदेमध्ये भारत, अमेरिकेसह अनेक पाश्‍चिमात्य देशांचे नेते सहभागी होणार आहेत. या देशांकडून आधीपासून युद्धाला विरोध केला जात आहे.

रशियाने युक्रेनच्या खेरासनमधून सैन्य मागे घेतले !

रशियाने ९ नोव्हेंबर या दिवशी युक्रेनमधील खेरासन येथून त्याचे सैन्य मागे घेतले. हे शहर रशियासाठी फार महत्त्वाचे होते. रशियाला काळ्या समुद्रातील बंदरे जिंकायची होती. खेरासनची बंदरे सामरिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत, तसेच भूमध्य समुद्राला जोडणारा व्यापारी मार्गही येथून जातो. येथे मोठ्या नौकांची निर्मितीही होते. यासह येथे व्यापारी नौका, टँकर, कंटेनर नौका आदी येथे बनवल्या जातात. हा भाग रशियात समाविष्ट करून रशिया त्याची सागरी शक्ती वाढवू इच्छित असतांना त्याने येथून माघार घेतल्याने त्याचा पराभव असल्याचे म्हटले जात आहे.

‘जी-२०’ काय आहे ?

‘जी-२०’मध्ये २० देश आहेत. या देशांमध्ये कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझिल, रशिया, फ्रान्स, यूके, जर्मनी, इटली, तुर्कीये, दक्षिण आफ्रिका,  सौदी अरेबिया, भारत, चीन, दक्षिण कोरिया, जपान,  इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, तसेच युरोपीयन युनियन यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य देश मिळून जगाच्या सकल उत्पन्नाच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्न असणारे देश आहेत.