मंगळुरू येथील मलाली मशिदीच्या वादावर सर्वेक्षणाच्या मागणीवर न्यायालय सुनावणी करणार

मलाली मशीद ही पूर्वीचे हिंदु मंदिर असल्याचा विहिंपचा दावा !

मंगळुरू – मंगळुरू येथील मलाली मशीद वादावर सुनावणी करण्याचा निर्णय कर्नाटक न्यायालयाने घेतला आहे. विश्‍व हिंदु परिषदेने न्यायालयात याचिका प्रविष्ट करून  ही मशीद मंदिराच्या जागेवर बांधण्यात आल्याचा दावा केला होता. उत्तरप्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या धर्तीवर याही मशिदीचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या वेळी त्याची रचना हिंदु मंदिराप्रमाणे असल्याचे समोर आले होते.

(म्हणे) ‘न्यायालयाला या प्रकरणात लक्ष घालण्याचा अधिकार नाही !’ – मशिदीचे व्यवस्थापन आणि मुसलमान संघटना

मशिदीचे व्यवस्थापन आणि मुसलमान संघटना यांनी न्यायालयाला या प्रकरणात लक्ष घालण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. ही जमीन वक्फ बोर्डाची असून येथे कुठलेही मंदिर नव्हते, असा युक्तिवाद त्यांनी केला. तथापि न्यायालयाने मलाली मशीद वादावर सुनावणी चालू ठेवणार असल्याचे सांगत निर्णय होईपर्यंत मशिदीच्या आवारात यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या विश्‍व हिंदु परिषदेने मलाली मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.