हिंदुद्वेष्टा कलाकार वीर दास याचा बेंगळुरूतील कार्यक्रम रहित करा !

हिंदु जनजागृती समितीची पोलिसात तक्रार प्रविष्ट करून मागणी

बेंगळुरू – हिंदुद्वेष्टा अभिनेता आणि विनोदी कलाकार वीर दास याचा येथे १० नोव्हेंबर या दिवशी होणारा कार्यक्रम रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढून करण्यात आली आहे. येथील व्यालिकावल पोलीस ठाण्यात वीर दास याच्या विरोधात तक्रारही प्रविष्ट करण्यात आली आहे.

समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,

१. वीर दास हा त्याच्या विनोदी कार्यक्रमांतून (‘विनोदी शो’मधून) हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असतो.
२. शहरातील मल्लेश्‍वरम् येथील एका सभागृहात त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
३. याआधी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्याने भारतीय महिला, पंतप्रधान मोदी आणि भारत यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. याविरोधात आम्ही मुंबई आणि देहली पोलीस यांच्याकडे तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या.
४. बेंगळुरूसारख्या सामुदायिकदृष्ट्या संवेदनशील शहरामध्ये अशा कार्यक्रमाला अनुमती देणे योग्य नाही. अशा कार्यक्रमांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे वीर दास याचा कार्यक्रम रहित करण्यात यावा, अशी आम्ही मागणी करतो.

___________________________________ 


वीर दास याने वॉशिंग्टन येथील कार्यक्रमात केलेले भारतद्वेष्टे विधान !

वीर दास याने वॉशिंग्टन येथील कार्यक्रमात म्हटले होते की,

मी त्या भारतातून येतो, जिथे दिवसा तर स्त्रियांची पूजा केली जाते, परंतु रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात येतो. या वक्तव्यावरून त्याला पुष्कळ विरोध करण्यात आला होता. मुंबईत त्याच्या विरोधात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. विरोध वाढल्यावर त्याने वरवर क्षमा मागितली होती. तो म्हणाला होता की, माझा उद्देश भारताचा अवमान करण्याचा नव्हता, तर मला हे सांगायचे होते की, भारतामध्ये अनेक समस्या असल्या, तरी भारत ‘महान’ आहे.