त्रिपुरासुराचा पराभव !

आज ७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्या निमित्ताने …

‘कार्तिक पौर्णिमा हा दिवस ‘त्रिपुरारि पौर्णिमा’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसाचे माहात्म्य पुराणग्रंथांतून सापडते. पूर्वी ‘त्रिपुरासुर’ नावाचा एक दैत्य अधिक उन्मत्त झाला होता. आपल्या राजधानीच्या भोवती ३ मोठे तट निर्माण करून तो अजिंक्य झाला होता. इंद्रादिक देवांचेही त्याच्यापुढे काही चालत नव्हते. तेव्हा नारदांच्या सांगण्यावरून सर्व देव भगवान शिवाला शरण गेले आणि त्यांनी त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी शिवाला विनंती केली. शिवाने ती मान्य करून स्वत:च्या प्रचंड सामर्थ्याने त्रिपुरासुराचा नाश केला. तो दिवस कार्तिक पौर्णिमा हा होता.

या विजयाची स्मृती भारतियांनी आजपर्यंत कायम ठेवली आहे. या दिवशी सर्व शिवालयांतून दीपोत्सव करण्यात येत असतो. काही प्रांतात हा दिवस शिवाचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय याचा जन्मदिवस म्हणून पाळतात आणि त्या प्रीत्यर्थ त्यांच्या मूर्तीची पूजा करण्यात येते. तारकासुराचा नाश करणारा हाच वीर असून तो अतिशय सुंदर होता.

दक्षिण हिंदुस्थानात शिवासाठी ‘कृत्तिका’ नावाचा महोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. सर्वत्र उत्कृष्ट साज-शृंगार करून मिरवणूक, महापूजा इत्यादी उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात. सुमारे २५ हात उंचीचा खांब देवळासमोर उभा करून त्यावर कापूर आणि इतर ज्वालाग्राही पदार्थ घालून तो पेटवून देतात. तिरुवण्णामल्ली, त्रिचनापल्ली, सिरुलन्नी, अशा ठिकाणी दीपोत्सव करण्यात येत असतो.’

(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’,लेखक : प्रल्हाद नरहर जोशी)