यजमानांच्या अपघाती निधनाच्या कठीण प्रसंगात अनुभवलेली गुरुकृपा !

‘एप्रिल २०१६ मध्ये माझ्या यजमानांचे निधन झाले. त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच मला बळ दिले. यजमानांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर मी पुष्कळ अस्थिर झाले. या घटनेनंतर एक दिवस आणि एक रात्र माझे मन सुन्न झाले होते. काही कालावधीनंतर मी स्थिर आणि शांत होऊ लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे लहानपणापासून माझ्या मनावर झालेल्या साधनेच्या संस्कारांमुळेच मी जीवनातील या सर्वांत कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकले. खरेतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

श्रीमती वर्षा कुलकर्णी

आपला लेख वाचला. लेख खूप आवडला. तो वाचून ‘आपली साधनेत किती प्रगती झाली आहे’, हे लक्षात आले. ‘अशीच प्रगती पुढे होत राहील’, याबद्दल मला खात्री आहे. पूर्वी एकदा आपली भेट झाली होती. असे असले, तरी तुमची खरी भेट झाल्याचे आजच्या तुमच्या लेखावरून अनुभवले.  

– आपला डॉ. आठवले (२५.८.२०२२)

साधकांचे रक्षण होण्यासाठी आणि सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य जगभर होण्यासाठी प्रार्थना करणे

विवाहानंतर मी घरी असल्याने मला सेवा करण्याची संधी मिळत नसे. त्यामुळे मला पुष्कळ वाईट वाटायचे. मी मंदिरात दर्शनाला गेले किंवा घरी देवघरातील देवतेला नमस्कार करतांना स्वतःसाठी काहीही न मागता ‘सनातनच्या प्रत्येक साधकाचे रक्षण होऊ दे आणि सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य जगभर होऊ दे’, अशा प्रार्थना करत असे. त्या वेळी ‘मी सेवा करू शकत नाही. जे साधक सेवा करत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, तरी माझी साधना होईल’, असे मला वाटत असे. या प्रार्थना करतांना ‘सर्व साधक माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवत असे.

– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर (७.४.२०२२)

श्रीमती वर्षा कुलकर्णी

१. शालेय जीवनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे झालेले साधनेचे संस्कार आणि त्यांनी करवून घेतलेली सेवा !

१ अ. आई-वडील घरी नसतांना रात्री पुष्कळ भीती वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र घट्ट पकडून त्यांच्याशी बोलत झोपणे : माझी आई सौ. सुनिता कुलकर्णी (वय ५६ वर्षे) आणि बाबा श्री. विजय कुलकर्णी (वय ६४ वर्षे) हे साधना करत असल्याने लहापणापासून माझ्यासह माझा मोठा भाऊ श्री. हेमंत कुलकर्णी (वय ३४ वर्षे) यांच्यावर साधनेचे संस्कार झाले. मी शाळेत असतांना काही वेळा आई आणि बाबा सेवेच्या निमित्ताने परगावी जात असत. त्या वेळी घरी मी आणि भाऊ दोघेच रहात होतो. तेव्हा मला रात्री पुष्कळ भीती वाटत असे. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र घट्ट पकडून त्यांच्याशी बोलत झोपत असे. त्यामुळे आपोआपच मला त्यांच्याशी अनुसंधान साधणे जमू लागले. तेव्हापासून मला प्रत्येक गोष्ट त्यांना सांगण्याची सवय लागली.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती न्यून असल्याचे समजल्यावर त्यांच्यासाठी प्रार्थना करणे : लहानपणी परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण आल्यावर मी एकांतात बसून पुष्कळ रडत असे.  त्या वेळी मी श्रीकृष्णाला प्रार्थना करत होते, ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांसाठी अन्य काहीच करू शकत नाही. माझे आयुष्य त्यांना लाभू दे आणि त्यांचे रक्षण होऊ दे.’ मला आता समजते की, ‘परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच मी जिवंत आहे. मी त्यांना आयुष्य काय देणार ?’

१ इ. ‘प्रारब्धातील काही भाग संपला की, पूर्णवेळ साधनाच करायची आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे आणि नंतर त्याची प्रचीती येणे : वर्ष २००४ मध्ये मला दहावीच्या सुटीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेला जाण्याची संधी लाभली. त्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना विचारले, ‘‘मी पूर्णवेळ साधना करू का ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘प्रारब्धातील काही भाग संपला की, पूर्णवेळ साधनाच करायची आहे.’’

२. वैवाहिक जीवन जगत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांशी साधलेले अनुसंधान

वर्ष २००९ मध्ये माझा विवाह झाला.

२ अ. दैवी बालक जन्माला येणे : वर्ष २०१२ मध्ये मला मुलगा झाला. ‘माझ्यावर लहानपणापासून झालेले साधनेचे संस्कार आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा यांमुळेच मला मुलाचे (कु. अर्णव कुलकर्णी यांचे, वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के) पालन-पोषण साधना म्हणून करायचे आहे’, याची जाणीव झाली. त्यांनी माझ्याकडून तसे प्रयत्नही करवून घेतले.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात राहून घरातील कामे करणे : मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात राहून घरातील कामे केल्याने मला त्यांचे अस्तित्व सतत जाणवत असे. काही वेळा मनाविरुद्ध प्रसंग घडल्यास मी तो प्रसंग परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून सांगत असे. त्या वेळी ‘ते प्रत्येक प्रसंग ऐकत आहेत आणि वेळोवेळी मला साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवायचे.

३. यजमानांच्या आकस्मिक निधनानंतर अनुभवलेली गुरुकृपा !

३ अ. यजमानांचे अपघाती निधन झाल्याचे समजल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे स्थिर रहाता येणे : ९.४.२०१६ मध्ये मी परगावी असतांना यजमानांचे अपघाती निधन झाल्याचे समजल्यावर मला मोठा धक्का बसला; मात्र ‘आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडते’, ही परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली शिकवण माझ्या कायम स्मरणात होती. मला बाह्य परिस्थिती स्वीकारायला कालावधी लागला, तरीही परात्पर गुरु डॉक्टरांनी मला हे प्रारब्ध स्वीकारण्यास शिकवून आतून स्थिरही ठेवले होते.

३ आ. यजमानांच्या निधनानंतर दहाव्या दिवशी डेंग्यू झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागणे, परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आजारातून वाचणे : यजमानांच्या निधनानंतर दहाव्या दिवशी मला डेंग्यू झाल्याने सोलापूर येथील रुग्णालयात भरती करावे लागले. रुग्णालयात ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत. ते प्रत्येक क्षणी माझ्याजवळ बसले आहेत आणि माझ्याकडून नामजप करवून घेत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मी डेंग्यूसारख्या मोठ्या आजारातून वाचले.

३ इ. यजमानांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी येणार्‍या अनेक व्यक्तींनी देवाला दोष देणे; परंतु ‘प्रारब्धानुसार सर्व घडत असल्याने देवाला दोष देणे योग्य नाही’, असे साधिकेने त्यांना सांगणे : यजमानांच्या निधनानंतर नातेवाईक आणि ओळखीच्या अनेक व्यक्ती मला भेटायला येत होत्या. काही जण म्हणत होते, ‘‘वर्षा, वयाच्या २७ व्या वर्षी तुझ्या संदर्भात घडलेला हा प्रसंग पाहून आमचा देवावरील विश्वासच उडाला आहे.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही. देवाला दोष कशाला द्यायचा ?’’ त्या वेळी ‘हे सांगण्यासाठी मला बळ कुठून मिळाले ?’, हे कळले नाही. ‘मी लहानपणापासून अनेक सत्संग ऐकल्यामुळे साधनेचे संस्कार माझ्या मनावर बिंबले होते. त्यामुळेच मला स्थिर राहून हे उत्तर देता आले’, असे माझ्या लक्षात आले.

३ ई. यजमानांच्या निधनानंतर मला अनेक व्यावहारिक अडचणींना सामोरे जावे लागले; पण गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) प्रत्येक क्षणी सूक्ष्मातून माझ्या समवेत होते आणि त्यांनी विविध माध्यमांतून मला साहाय्य केले. मी अनेक वेळा ही अनुभूती घेतली आहे.

४. पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ

४ अ. साधनेचे महत्त्व मनावर बिंबल्याने साधनाच करण्याचा निश्चय होणे : नातेवाईक आणि जवळच्या व्यक्ती यांनी मला यजमानांच्या ठिकाणी नोकरी करण्याचा आग्रह केला; मात्र ‘मला यापुढे केवळ साधनाच करायची आहे, असा माझा ठाम निर्धार झाला होता. त्यामुळे यजमानांच्या निधनानंतर केवळ ४ मासांतच मी ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून धर्मप्रसार करणे, विज्ञापनांची संरचना करणे, सत्संग घेणार्‍या साधकांच्या समवेत जाऊन त्यांना साहाय्य करणे, अशा प्रकारे सेवेला प्रारंभ केला. वर्ष २०१७ मध्ये मी पूर्णवेळ साधना करू लागले.

‘माझा विवाह होऊन जीवनात घडलेला कठीण प्रसंग आणि नंतर मी पूर्णवेळ साधना करणे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आधी सांगितले होते, त्याप्रमाणेच घडले’, हे माझ्या लक्षात आले. यानंतर काही काळ मी मिरज आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा केली.

४ आ. आश्रमात सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत असल्याचे जाणवणे आणि मुलावरही चांगले संस्कार होणे : मी कितीही पैसे कमावले असते, तरीही मी आश्रमाबाहेर सुरक्षित आणि आनंदी जीवन जगू शकले नसते. मी कितीही मोठ्या पदावर नोकरी करून घरी राहून मुलाला वाढवले असते, तरीही आता आश्रमात राहून त्याच्यावर होत आहेत, असे संस्कार मी मुलावर करू शकले नसते. मी केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच सनातनच्या आश्रमात सुरक्षित आणि आनंदी जीवन जगू शकत आहे.

४ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’साठी वार्ताहर सेवा करतांना जीवनाकडे पहाण्याच्या दृष्टीकोनात पालट होणे आणि अनेक गुण अंगी बाणवले जाणे : मला दैनिक ‘सनातन प्रभात’साठी वार्ताहर सेवा करण्याची संधी लाभली. गुरुदेवांनी या सेवेतून मला जीवनाकडे पहाण्याचे विविध पैलू शिकवले. या सेवेच्या माध्यमातून मी हळूहळू माझे दुःख विसरू लागले. वार्ताहर सेवा करतांना माझा समाजातील विविध घटकांशी संपर्क आल्याने ‘त्यांच्याकडून शिकणे, घटनेच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा अभ्यास करणे, प्रत्येक घटना किंवा प्रसंग यांकडे बातमीच्या दृष्टीने कसे पहायचे ? त्यामध्ये अधिक योग्य होण्यासाठी काय करू शकतो ?’, असे माझ्याकडून चिंतन होऊ लागले.

५. कृतज्ञता

मला गुरुमाऊलीप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) इतकी कृतज्ञता वाटते की, त्यांनी मला या सर्व कठीण परिस्थितीतून किती अलगदपणे बाहेर काढले आणि आश्रमात एका मोठ्या संरक्षककवचात ठेवले आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही मला तुमच्या चरणांशी घेतले, त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. ‘आपणच माझ्याकडून प्रत्येक क्षणी कृतज्ञताभावाने सेवा करवून घ्यावी आणि हनुमंताने जे मागणे मागितले, ‘प्रभो, मज एकच वर द्यावा । या चरणांच्या ठायी माझा निश्चल भाव रहावा ।। कधी न चळावे चंचल हे मन श्रीरामा, या चरणांपासून… ।।’ , तेच मागणे मी तुमच्याकडे मागते.’

– आपलीच चरणसेवक,

श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर (७.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक