भारतात ‘डिजिटल करन्सी’चा आरंभ !

  • रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नसणार !

  • ‘सीबीडीसी होलसेल’ या प्राथमिक प्रकल्पासाठी ९ बँकांची निवड !

मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ नोव्हेंबर या दिवशी देशाच्या पहिल्या ‘डिजिटल करन्सी’चा, म्हणजेच पहिल्या आभासी चलनाचा आरंभ केला. या प्रकरणी पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून रिझर्व बँकेने ‘सीबीडीसी’, म्हणजेच ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी होलसेल’ जारी केली आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एच्.डी.एफ्.सी., आय.सी.आय.सी.आय., कोटक महिंद्रा, येस बँक, आय.डी.एफ्.सी. फर्स्ट आणि एच्.एस्.बी.सी. या ९ बँकांची निवड करण्यात आली आहे.

१. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी २०२२ या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर करतांना ‘डिजिटल करन्सी’ची घोषणा केली होती.

२. डिजिटल चलन २ प्रकारचे असेल – सीबीडीसी होलसेल आणि सीबीडीसी रिटेल. १ नोव्हेंबरपासून ‘सीबीडीसी होलसेल’ला आरंभ करण्यात आला आहे. याचा वापर बँका, मोठी ‘नॉन बँकिंग फायनॅन्स’ आस्थापने आणि अन्य मोठे आर्थिक व्यवहार करणार्‍या मोठ्या वित्तीय संस्था यांना करता येईल. त्यानंतर ‘सीबीडीसी रिटेल’ जारी होईल. त्याचा वापर सर्वसामान्य जनतेला दैनंदिन व्यवहारासाठी करता येईल.

काय आहे डिजिटल चलन ?

‘e’ म्हणजे डिजिटल चलनाचे मूल्य विद्यमान चलनासारखेच असेल. त्यालाही ‘फिजिकल करन्सी’, म्हणजे प्रत्यक्ष पैशांप्रमाणे मान्यता असेल. ‘e’मुळे खिशात रोकड ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. ते ‘मोबाईल वॉलेट’प्रमाणे काम करील. ते जमा करण्यासाठी बँक खाते असण्याचीही आवश्यकता नसेल; पण तरीही ‘कॅशलेस पेमेंट’ करता येणार आहे. अज्ञात व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी वैयक्तिक बँकेचे खाते आदी माहिती ‘शेअर’ करण्याचीही आवश्यकता उरणार नाही. या माध्यमातून साहजिकच गोपनीयता पाळली जाईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोख रकमेवरील अलंबित्व अल्प होईल. नोटा छापण्याचा खर्चही न्यून होईल.

डिजिटल चलनाचे लाभ !

  •  रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेले डिजिटल स्वरूपातील चलन एक ‘लीगल टेंडर’ असेल.
  •  ते सामान्य चलनासारखेच असेल; पण ते नोटेप्रमाणे खिशात बाळगता येणार नाही. हे चलनासारखेच काम करील.
  •  ते नोटेसमवेत पालटताही येईल. ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तुमच्या खात्यात दिसून येईल.
  •  याद्वारे तुम्हाला कुठेही सुलभ आणि सुरक्षितपणे व्यवहार करता येईल.