सिंधुदुर्ग – तोरसोळे येथील अनधिकृत खाण व्यवसाय बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा उपोषणकर्ते सीताराम जाधव यांचा आरोप

देवगड-तोरसोळे येथील अनधिकृत खाणींच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतांना सीताराम जाधव आपल्या कुटुंबासह
(चित्र सौजन्य : Breaking Malvani)

सिंधुदुर्ग – देवगड तालुक्यातील तोरसोळे येथील अनधिकृत खाण व्यवसायामुळे मोठी हानी होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून हे व्यवसाय तात्काळ बंद करावेत, या मागणीसाठी तालुक्यातील धोपटेवाडी येथील सीताराम जाधव यांनी त्यांच्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.

चिरे खाणीसाठी एका ठिकाणची अनुमती घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी चिरेखाण व्यवसाय केला जात आहे. या क्षेत्राचे मोजमाप घेतले जात नाही. त्यामुळे शासनाच्या  महसुलासह बागायती, पिण्याच्या पाण्याचे स्रोत यांची हानी होत आहे. याविषयी तक्रार देऊनही संबंधित प्रशासन कारवाई करत नाही. (असंवेदनशील प्रशासनाला कधी तक्रारीची भाषाच समजत नाही. उपोषण, आंदोलन, रस्ता बंद यांचीच भाषा समजते किंबहुना या भाषेची सवयच झाली आहे. – संपादक) त्यामुळे या प्रकरणाची गंभीरपणे नोंद घेऊन सखोल चौकशी करावी आणि अवैध खाण व्यवसाय तात्काळ बंद करावेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार, अशी चेतावणी जाधव यांनी दिली आहे. (जाधव यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई केली, तरच असे अवैध प्रकार थांबतील ! – संपादक)