अमेरिकेचा एक कुटील डाव : रशियाच्या विरोधात पाकिस्तानचा वापर !

नुकतेच पाकिस्तानचे नाव ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (एफ्.ए.टी.एफ्.) ‘ग्रे लिस्ट’मधून हटवण्यात आले. याचाच अर्थ त्यामागे अमेरिकाच असणार; पण अमेरिकेने पाकिस्तानचे साहाय्य करण्यासारखे नेमके काय घडले ? खरेतर पाकिस्तान स्वतःच्या कुकृत्यांमुळे गेल्या ४ वर्षांपासून ‘ग्रे लिस्ट’मध्ये होता आणि आतंकवादाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्याच्यावर अनेक निर्बंधही लादण्यात आले होते. तरीही पाक सुधारला नाही, उलट आतंकवाद्यांना पाठिंबा देण्याचे उद्योग त्याने चालूच ठेवले.

१. अमेरिकेच्या इशार्‍यानेच पाकचे नाव ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या सूचीतून काढले जाणे

असे असूनही आतंकवाद्यांच्या अर्थपुरवठ्यावर लक्ष ठेवणार्‍या पॅरिसस्थित ‘एफ्.ए.टी.एफ्.’ने ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये (काळ्या सूचीत) नाव समाविष्ट करण्याइतपत आतंकवादी कारवायांना पाठिंबा देणार्‍या पाकिस्तानचे नाव ‘ग्रे लिस्ट’मधूनही हटवले; कारण त्याचे नाव त्या सूचीतून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने पडद्यामागून हालचाली केल्या. ‘एफ्.ए.टी.एफ्.’ अमेरिकेच्या चेतावणीवर चालणारी संस्था आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ‘अमेरिका ‘एफ्.ए.टी.एफ्.’ला आपल्या मनाप्रमाणे नियंत्रित करते’, हे तिने जर्मनीला या संस्थेतून बाहेर काढण्याची धमकी देण्यातूनच त्याचा दाखला मिळाला होता. इथेच पाकिस्तानला ‘एफ्.ए.टी.एफ्.’मधून बाहेर काढण्याचा खेळ अमेरिकेनेच केल्याचे स्पष्ट होते.

२. ‘एफ्.ए.टी.एफ्.’चे वेगवेगळे प्रकल्प अन् योजना यांमध्ये रशियाच्या सहभागावर स्थगिती आणणे

पाकला ‘ग्रे लिस्ट’मधून हटवतांनाच ‘एफ्.ए.टी.एफ्.’ने नुकताच रशियाविरोधातही एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे ‘एफ्.ए.टी.एफ्.’चे वर्तमान आणि भविष्यातील वेगवेगळे प्रकल्प अन् योजना यांमध्ये रशियाच्या सहभागावर स्थगिती आणली. ‘युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे हे पाऊल उचलण्यात आले’, असे ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या अध्यक्षांनी स्वतःच्या निर्णयाच्या समर्थनार्थ सांगितले. ‘एफ्.ए.टी.एफ्.’ने युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाचा निषेध करत निर्बंध लावणार असल्याचेही म्हटले. त्यामागेही अमेरिकेचाच हात आहे. सध्या रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध कोणत्या पातळीवर आहेत, हे तसे सुपरिचित. रशियाला घेरण्यासाठी युक्रेनचा ‘नाटो’ देशांच्या गटात समावेश करण्यासाठी पुढाकार घेणारी आणि युक्रेनला युद्धाच्या आगीत ढकलून मागे हटणारी अमेरिकाच होती.

३. रशियाच्या विरोधात पाकच्या आतंकवादाचा कारखाना वापरण्याचा अमेरिकेचा डाव असणे

नंतर युद्धकाळातही अमेरिकेने ‘पोलीसगिरी’ करण्याचा प्रयत्न केला; पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या समोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काहीही करू शकले नाहीत. अमेरिकेबरोबरचे सर्व देश एकजूट होऊनही रशियाला रोखण्यात अपयशी ठरले. रशियावर आपण दिलेल्या धमक्या आणि चेतावणी यांचा काहीही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट होताच त्याविरोधात ‘एफ्.ए.टी.एफ्.’ आणि पाकिस्तानचा आतंकवादी कारखाना यांचा वापर करता येईल’, असा विचार अमेरिकेने केला; कारण सद्यःस्थितीत अमेरिका रशियाविरोधातच सर्वाधिक संतापलेली आहे; म्हणूनच पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मधून हटवले.

४. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील वाढती जवळीक संपूर्ण जगासाठी घातक ठरू शकणे

‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर काढण्यासह अमेरिकेने गेल्या काही काळापासून पाकला इतरही अनेक प्रकारे साहाय्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे. नुकतेच अमेरिकेने पाकिस्तानला ‘एफ् १६’ या लढाऊ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ४५ कोटी डॉलर्सचे (३ सहस्र ६५० कोटी रुपयांचे) साहाय्य दिले. पाकिस्तान अमेरिकेने दिलेल्या पैशांचा वापर कशासाठी करील ? हे कुणीही सांगू शकेल. यासह ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून नाव हटवले गेल्याने पाकला मोठ्या देशांकडे भीक मागणेही सोपे होईल. त्या पैशांचा वापर विधायक कामासाठी न्यून आणि आतंकवादाला पोसण्यासाठीच होणार, हेही नक्की आणि अमेरिका त्या आतंकवाद्यांचा वापर रशियाविरोधात करू शकते. यातून हे लक्षात घेतले पाहिजे की, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील वाढती जवळीक संपूर्ण जगासाठी घातक ठरू शकते.

५. पाकविरोधी वक्तव्य करून ‘अमेरिकेच्या पोटात एक आणि ओठावर दुसरे’, हेच धोरण असल्याचे सिद्ध होणे

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी यावरच स्वतःचे मत व्यक्त केले होते; पण अमेरिकेने तसा विचार केला नाही आणि आता अमेरिकेने रशियाविरोधात वापरण्यासाठी पाकला थेट ‘ग्रे लिस्ट’मधूनच बाहेर काढले. एकीकडे पाकला असा दिलासा देतांना दुसरीकडे जो बायडेन यांनी ‘पाकिस्तान हा जगातील सर्वांत धोकादायक देश आहे’, असेही विधान केले. त्यामुळे ‘अमेरिकेच्या पोटात एक आणि ओठावर दुसरे’, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले; पण ‘ग्रे लिस्ट’मधून पाकला हटवल्यामुळे आतंकवादाचा भस्मासुर मोठा होईल आणि एक दिवस लादेनसारखा तो स्वतःवरही उलटू शकतो’, याचे विस्मरण झालेल्या अमेरिकेला महागातच पडेल !’

– महेश पुराणिक (साभार :दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ )