पुणे – भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन होत असते. भाषा हा कोणत्याही संस्कृतीचा कणा असतो. त्यामुळे स्वत:च्या मातृभाषेवर प्रेम करून तिचा व्यवहारात अधिकाधिक उपयोग केला पाहिजे. अन्यथा आपण आपल्या संस्कृतीचे गुन्हेगार ठरू. इंग्रजी भाषा ही रोजगारासाठी आवश्यक असली, तरी त्यासाठी आपल्या मातृभाषेचा बळी देणे कदापी मान्य नाही, अशी विधाने ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली. रसाळ यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
रसाळ पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या खच्चीकरणामुळे सांस्कृतिक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. राज्यात एकीकडे साक्षरता वाढत आहे; मात्र दुसरीकडे वाचकांची संख्या अल्प होत आहे. महाराष्ट्रातील वाङ्मयीन व्यवहार अल्प होत चालले आहेत, ही चिंतेची गोष्ट आहे. सध्या ‘एक राष्ट्र, एक भाषा’ हा विचार बळावत चालला असून, तो घातक आहे. (राष्ट्राची एक भाषा ही सर्व राज्यांना जोडणारी असते. त्यामुळे साहजिकच हिंदीचा विचार होतो; पण इंग्रजीचा नाही. त्यामुळे त्यात अयोग्य नाही. – संपादक)
संपादकीय भूमिकासंस्कृतीचे जतन करण्यासाठी मातृभाषेवर प्रेम करून तिचा व्यवहारात अधिक वापर करावा ! |