२८.१०.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ता साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी सनातनचे १८ वे समष्टी संत पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण पाहिले. या भागात प्रत्यक्ष अंत्यसंस्कार करतांना त्यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/623366.html
५. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव मुक्तीभवनात (स्मशानात) आणल्यावर जाणवलेली सूत्रे
५ अ. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव मुक्तीभवन येथे आणले जाताच तेथील दाब आणि वातावरणातील उष्णता अल्प होऊन चैतन्य जाणवणे : पू. इंगळेआजोबांचे पार्थिव मुक्तीभवनात आणण्यापूर्वी मुक्तीभवनात सूक्ष्मातून काही प्रमाणात दाब आणि त्यामुळे वातावरणात उष्णता जाणवत होती. पू. आजोबांचे पार्थिव मुक्तीभवनात आणल्यावर लगेच वायूमंडलातील दाब अल्प होऊन चैतन्य जाणवू लागले आणि वातावरणातील उष्णताही अल्प झाली. यातून संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
५ आ. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव मुक्तीभवनात आणल्यावर वाईट शक्तींचे प्रमाण अल्प होऊन चैतन्यात वाढ होणे
६. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव चितेवर ठेवल्यावर जाणवलेली सूत्रे
६ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवून त्यांनी पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाच्या आज्ञाचक्रावर हात ठेवल्यावर पू. इंगळेआजोबांच्या लिंगदेहाचे आज्ञाचक्र पिवळसर रंगाने भारित होणे
६ आ. शिष्याने देहत्याग केल्यावर शिष्याच्या साधनेच्या तळमळीनुसार गुरु त्याला सूक्ष्मातून पुढच्या टप्प्याचे साधनेचे ज्ञान प्रदान करत असणे : वरील दृश्यासंदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘गुरु कोणत्याही शिष्याला अपूर्ण ठेवत नाहीत. ते त्या त्या वेळी शिष्याच्या साधनेसाठी आवश्यक असे मार्गदर्शन करतात. शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत गेल्यावर गुरु त्याला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची आध्यात्मिक अनुभूती देतात. शिष्याने देहत्याग केल्यावर शिष्याच्या साधनेच्या तळमळीनुसार गुरु त्याला सूक्ष्मातून पुढच्या टप्प्याचे साधनेचे ज्ञान प्रदान करतात. ही प्रक्रिया गुरूंच्या संकल्पाने घडते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून पू. आजोबांच्या आज्ञाचक्रावर हात ठेवणे’, हे याच प्रक्रियेचे दृश्यरूप आहे.’
६ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. इंगळेआजोबांना सूक्ष्म (उच्च) लोकांमध्ये साधना करण्यासाठी ज्ञान प्रदान करणे : देहत्यागानंतरही पू. आजोबांची खडतर साधना चालू असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना उच्च लोकात करायच्या साधनेचे ज्ञान दिले. त्यामुळे त्यांना उच्च लोकांमध्ये राहून समष्टी साधना करून आध्यात्मिक उन्नती करणे शक्य होणार आहे.
६ ई. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव चितेवर ठेवल्यावर सूक्ष्म ईश्वरी प्रकाश कार्यरत होऊन त्याचे पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाभोवती संरक्षककवच सिद्ध होणे : पू. आजोबांचे पार्थिव चितेवर ठेवल्यावर वायूमंडलातील सूक्ष्म श्वेत (पांढर्या) प्रकाशात वाढ झाली. या वेळी सर्वाधिक प्रकाश पू. आजोबांच्या पार्थिवाच्या आज्ञाचक्रावर पडत होता आणि त्या प्रकाशामुळे पूर्ण पार्थिवाभोवती संरक्षककवच निर्माण झाले होते. ‘उच्च आध्यात्मिक पातळीचे संत जिवंतपणे विदेही (‘देह आणि आत्मा वेगळे आहे’, याचे भान असणारे किंवा देहभान नसलेले) अवस्था अनुभवत असतात. या विदेही अवस्थेमुळे ईश्वरच त्यांच्या स्थूलदेहाची काळजी घेतो. आताही ‘वाईट शक्तींनी पू. आजोबांना त्रास देऊ नये’, यासाठी ईश्वरानेच पू. आजोबांच्या पार्थिवाभोवती संरक्षककवच निर्माण केले’, असे माझ्या लक्षात आले.
६ उ. पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवावर अंतिम विधी होतांना वैराग्याची स्पंदने आणि शिवतत्त्व जाणवणे : सर्वसामान्य व्यक्तीच्या पार्थिवावर अंतिम विधी होतांना पार्थिवात असलेले रज आणि तम बाहेर पडत असल्याने तेथील वातावरण त्रासदायक होते. याउलट पू. आजोबांच्या पार्थिवावर अंतिम विधी होतांना वैराग्याची स्पंदने जाणवून ‘पार्थिवाभोवती शिवतत्त्व कार्यरत आहे’, असे मला जाणवले.
६ ऊ. पू. इंगळेआजोबा अंतरंग शिष्य असल्यामुळे गुरुतत्त्व करत असलेले वैराग्याचे संस्कार स्वीकारत असणे : या अनुभूतीच्या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘शिष्याच्या जीवनातील सर्व घटनांवर गुरूंचे नियंत्रण असते. गुरु शिष्यामध्ये विविध घटनांच्या माध्यमातून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य निर्माण करतात. गुरु करत असलेले ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे संस्कार अंतरंग शिष्यच ग्रहण करू शकतो. मृत्यूच्या प्रसंगातून गुरुतत्त्व पू. आजोबांवर वैराग्याचे संस्कार करत आहे. पू. आजोबा अंतरंग शिष्य असल्यामुळे ते गुरुतत्त्व करत असलेले वैराग्याचे संस्कार स्वीकारत आहेत.’ त्यामुळे वायूमंडलात वैराग्याची स्पंदने निर्माण झाली. शिव ही वैराग्याची देवता असल्याने मला त्याचेही अस्तित्व जाणवले. यातून मला पू. आजोबांची भावस्थिती आणि त्यांचे अंतरंग शिष्यत्व यांची प्रचीती आली.
६ ए. पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवावर अंतिम विधी होत असतांना पार्थिवातील शिवतत्त्व पुष्कळ वाढल्यामुळे साधकाचे ध्यान लागणे : पू. आजोबांच्या पार्थिवावर अंतिम विधी होत असतांना त्यांच्या पार्थिवातील शिवतत्त्वात वाढ होत होती. विधीच्या शेवटी पूर्ण पार्थिव शिवमय झाले. त्यातील शिवतत्त्वाचे प्रमाणे ६५ टक्क्यांहून अधिक झाले. त्यामुळे सूक्ष्म परीक्षण न होता माझे सारखे ध्यान लागत होते.
७. पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवावरील अग्नीसंस्काराच्या वेळी जाणवलेली सूत्रे
७ अ. वातावरणात स्थुलातून जाणवलेले पालट
१. काही वेळापूर्वी पावसामुळे ढगाळ झालेले वातावरण निवळून सूर्यप्रकाश आला.
२. पू. आजोबांची चिता धगधगत असतांनाही चितेच्या अवतीभोवती ३ – ४ फुलपाखरे फिरत होती.
७ आ. वातावरणात सूक्ष्मातून जाणवलेले पालट
१. स्मशानात जनलोकाचे वायूमंडल निर्माण झाले.
२. वायूमंडलात भाव अन् आनंद यांची स्पंदने ४० – ४० टक्के कार्यरत झाली.
७ इ. पू. इंगळेआजोबांच्या चितेकडे पाहून चैतन्य मिळणे : संतांचा देह म्हणजे चैतन्याचे माहेरघर ! त्यामुळे संतांचा देह अग्नीत समर्पित होतांना त्यातील चैतन्याचा लाभ होत असल्याची अनुभूती येते. तसे पू. आजोबांच्या चितेकडे पहातांना सर्वांना चैतन्य मिळत होते.
७ ई. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव अग्नीसमर्पित होतांना स्थुलातून अग्नीचा रंग सोनेरी दिसणे, तर सूक्ष्मातून अग्नीत कमळाकृती दिसणे : पू. आजोबांच्या चितेकडे पहातांना मला स्थुलातून अग्नीचा रंग सोनेरी, तर सूक्ष्मातून अग्नीत कमळाकृती दिसत होती. डोळे मिटून पाहिल्यावर सूक्ष्मातून पू. आजोबांचे पार्थिव सोनेरी रंगाच्या अग्नीकमळावर दिसले. ‘कमळ हे जागृत कुंडलिनी आणि शुभ गोष्टींचे प्रतीक आहे. पू. आजोबा संत असून त्यांची कुंडलिनी जागृत आहे, तसेच पू. आजोबांची व्यष्टी साधना पूर्ण झाल्याने त्यांची समष्टी संतपदाकडे, म्हणजे शुभतेकडे वाटचाल होत असल्याचे हे प्रतीक आहे’, असे मला जाणवले.
७ उ. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव अग्नीसमर्पित झाल्यावर त्यांचा देहाशी निगडित असलेला अहंभावही नष्ट झाल्याने वायूमंडलात भाव आणि आनंद जाणवणे : संत जीवित असतांना त्यांच्यात १ – २ टक्के देहाचा अहं कार्यरत रहातो. त्यांचा मृत्यू होऊन पार्थिव अग्नीसमर्पित झाल्यावर देह नष्ट झाल्यामुळे देहाशी निगडित अहंभावही नष्ट होतो. पू. आजोबा संत असल्याने त्यांच्यात प्रथमपासून अहं अल्प होता. पार्थिव अग्नीसमर्पित झाल्यावर पू. आजोबांचा देहाशी निगडित असलेला अहंभाव नष्ट होऊन त्यांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा झाला. पू. आजोबांचा लिंगदेह अनुभवत असलेली आनंदावस्था आणि त्यांची गुरूंप्रतीची कृतज्ञता यांमुळे वायूमंडलात भाव अन् आनंद यांची स्पंदने कार्यरत झाली.
७ ऊ. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव अग्नीसमर्पित झाल्यावर सूक्ष्मातून ‘ॐ’कार नाद ऐकू येऊन शीतलता जाणवणे आणि हे पूर्णत्वाचे प्रतीक असणे : पू. आजोबांचे पार्थिव अग्नीसमर्पित होत असतांना शीतलता जाणवून शेवटी सूक्ष्मातून ‘ॐ’कार नाद ऐकू आला. तेव्हा मला ‘पू. आजोबांचे क्रियाकर्माचे कार्य स्थूल आणि सूक्ष्म दोन्हीदृष्ट्या पूर्ण झाले आहे’, असे जाणवले.
८. देहत्याग आणि अंत्यसंस्कार यांच्या माध्यमातून संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप त्याच्या निर्गुण रूपाशी एकरूप पावून आनंद अनुभवत असणे
‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! देहत्याग आणि अंत्यसंस्कार यांच्या माध्यमातून ईश्वराचे सगुण रूप (संत) निर्गुण रूपाशी एकरूप होते. याच प्रक्रियेला ‘अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।’ म्हणजे ‘ईश्वर आणि भक्त असे निराळे उरलेच नाही, सर्वत्र श्रीकृष्णच असल्याची प्रचीती आली.’ आत्मा आणि परमात्मा एक झाले. देवाच्या रंगात त्याचा भक्त एकरूप झाला. या प्रक्रियेत दुःख, वेदना इत्यादी भावनिक गोष्टींना स्थान नसते. संतांचा लिंगदेह हा आनंद अनुभवत असतो आणि त्यांच्याकडे आध्यात्मिकदृष्टीने पहाणारे त्यांचे भक्त अन् शिष्य यांनाही त्या आनंदाची अनुभूती येते.
मला या आध्यात्मिक जाणिवा आणि अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. इंगळेआजोबा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
(समाप्त)
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)(सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|