‘२९.९.२०२२ या दिवशी रात्री ८ वाजता मूळचे दुर्ग, छत्तीसगड येथील आणि सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे १८ वे समष्टी संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांनी देहत्याग केला. १.१०.२०२२ या दिवशी त्यांच्या पार्थिवावर फोंडा (गोवा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पू. इंगळेआजोबा यांचे धाकटे सुपुत्र श्री. नरेंद्र इंगळे यांनी अंत्यसंस्कार केले. या वेळी त्यांचे मधले सुपुत्र श्री. राजेंद्र इंगळे, श्री. राजेंद्र यांच्या पत्नी सौ. शैला, श्री. नरेंद्र यांच्या पत्नी सौ. शालिनी, नातू श्री. अक्षय इंगळे आणि सनातनचे साधक उपस्थित होते. देवाच्या कृपेने मी या अंत्यसंस्काराचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव शीत शवपेटीतून बाहेर काढल्यावर जाणवलेली सूत्रे
पू. इंगळेआजोबांचे नातेवाईक येईपर्यंत त्यांचे पार्थिव संरक्षित करण्यासाठी आधुनिक विद्युत् शीत शवपेटीत ठेवले होते. त्यांचे नातेवाईक आल्यावर ‘पू. आजोबांचे पार्थिव शीत शवपेटीतून बाहेर काढून दुसर्या खोलीत चटईवर डोके उत्तर दिशेकडे अन् पाय दक्षिण दिशेकडे येतील’, असे ठेवण्यात आले.
अ. शीत शवपेटीतून पू. आजोबांचे पार्थिव बाहेर काढल्यावर वायूमंडलात कार्यरत चैतन्य, आनंद आणि शांती यांचे प्रमाण ३ – ४ पटींनी वाढले, तसेच वायूमंडलातील प्रकाशातही वाढ झाली.
आ. पू. आजोबांचे पार्थिव बाहेर खोलीत आणून ठेवल्यावर बाजूच्या सदनिकेमध्ये कोणीतरी घंटा वाजवली. ‘असा नाद ऐकू येणे शुभ आहे’, असे माझ्या लक्षात आले.
इ. पू. आजोबांच्या डोक्यातून आनंद आणि शांती यांची स्पंदने, तर चरणांतून चैतन्याची स्पंदने प्रक्षेपित होत होती.पू. आजोबांकडून उच्च स्तराची शक्ती आणि ऊर्जा यांचे प्रक्षेपण होत असल्यामुळे वायूमंडलात दाब जाणवत नव्हता.
ई. ‘पू. आजोबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सूक्ष्मातून अनेक पुण्यात्मे आणि साधक यांचे लिंगदेह आले आहेत’, असे मला जाणवले.
२. अंत्यविधी संस्कार चालू होण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे
२ अ. साधक दर्शन घेत असतांना पू. इंगळेआजोबा यांच्या पार्थिवातून भाव आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होणे : १.१०.२०२२ या दिवशी पू. इंगळेआजोबा यांचे मी अंत्यदर्शन घेतले. पू. आजोबांच्या पार्थिवाभोवती सूक्ष्मातून जनलोकाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यातून भाव अन् आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होत होती. त्यामुळे पू. आजोबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या काही साधकांचा भाव जागृत होत होता किंवा काहींना आनंद आणि शांती यांची अनुभूती येत होती.
२ आ. ‘पू. इंगळेआजोबा पश्यंती वाणीत नामजप करत आहेत’, असे जाणवणे : साधक पू. आजोबांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना मला सूक्ष्मातून ‘पू. आजोबा साधकांना चैतन्य मिळावे’, यासाठी पश्यंती वाणीत (टीप) नामजप करत आहेत’, असे जाणवले.
टीप : नामजपाच्या स्थूल ते सूक्ष्म अशा ४ वाणी आहेत.
१. वैखरी, २. मध्यमा, ३. पश्यंती आणि ४. परा.
२ आ १. पू. इंगळेआजोबा यांनी समष्टी कल्याणासाठी पश्यंती वाणीत नामजप करणे : ‘पश्यंती वाणी’ ही साक्षीभावाशी निगडित आहे. उपासक नामजपातून प्रथम भाव, चैतन्य आणि आनंद अनुभवतो. या अनुभूती व्यष्टी साधनेशी निगडित आहेत. उपासक व्यष्टी साधनेकडून समष्टी साधनेकडे वळतो. तेव्हा त्याचा उद्देश समष्टी कल्याणाचा असल्याने नामजपाच्या माध्यमातून त्याला भाव, चैतन्य आणि आनंद यांच्याशी संबंधित अनुभूती न येता समष्टी कल्याणाची प्रचीती येते. या टप्प्याला उपासकातील ‘स्व’ नष्ट झाल्याने तो साक्षीभाव अनुभवतो. यालाच पश्यंती वाणीतील नामजप म्हणतात. ‘पू. आजोबांचा लिंगदेहही व्यष्टी साधनेसाठी नाही, तर समष्टी कल्याणासाठी नामजप करत असल्याने त्यांचा नामजप पश्यंती वाणीत होत आहे’, असे मला जाणवले.
३. अंत्यसंस्काराचा संकल्प होतांना जाणवलेली सूत्रे
३ अ. पू. आजोबांच्या अंत्यसंस्काराचा संकल्प होतांना मला सूक्ष्मातून श्रीविष्णूच्या चतुर्भुज रूपाचे दर्शन होऊन सुदर्शनचक्र दिसले आणि सूक्ष्म दैवी नाद ऐकू आले.
३ आ. ‘ईश्वर सूक्ष्मातून पंचतत्त्वाच्या माध्यमांतून पू. आजोबांच्या पार्थिवावर आवश्यक शक्ती प्रक्षेपित करत आहे’, असे मला जाणवले.
४. पू. इंगळेआजोबांचे पार्थिव तिरडीवर ठेवल्यावर जाणवलेली सूत्रे
पू. आजोबांचे पार्थिव त्यांच्या निवासखोलीतून खाली तळघराकडे नेण्यात आले आणि तिथे तिरडीवर केळीचे मोठे पान ठेवून त्यावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.
४ अ. वायूमंडलात गुरुतत्त्वाचे अस्तित्व अनुभवता येणे : पू. आजोबांच्या पार्थिवाला तुळशीची माळ घातल्यावर वायूमंडलातील चैतन्यात पुष्कळ वाढ होऊन पार्थिवातून वैराग्याची स्पंदने प्रक्षेपित होऊ लागली. तेव्हा वायूमंडलात गुरुतत्त्व कार्यरत होऊन गुरुतत्त्वाचे अस्तित्व अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत अनुभवता येत होते.
४ आ. ‘ॐ’काराचा मारक सूक्ष्म नाद कार्यरत आहे’, असे जाणवणे : पू. आजोबांचे पार्थिव तिरडीवर बांधले जात असतांना सूक्ष्म नादात वाढ होऊन मला अधूनमधून मारक लयीत ‘ॐ’कार नाद ऐकू येत होता. तेव्हा ‘पू. आजोबांच्या पार्थिव देहाचे सूक्ष्मातील वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी मारक लयीत ‘ॐ’काराचा सूक्ष्म नाद कार्यरत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
४ इ. संतांच्या चरणांवर चकाकी दिसण्यामागील कारणे
४ इ १. पू. इंगळेआजोबांच्या चरणांवर आपतत्त्वामुळे चकाकी दिसणे : पू. आजोबांच्या चरणांतून मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. ‘स्थुलातून त्यांच्या चरणांकडे पाहिल्यावर चरणांवर आपतत्त्वामुळे चकाकी आली आहे’, असे माझ्या लक्षात आले. सनातनचे ३२ वे बहुविकलांग व्यष्टी संत पू. सौरभ जोशी (वय २६ वर्षे) यांच्या चरणांवर असलेल्या दैवी चकाकीप्रमाणे ही चकाकी होती.
४ इ २. समष्टी साधनेमुळे संतांमध्ये ब्रह्मांडातील चैतन्य आकृष्ट होऊन ते त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित होत असल्याने त्यांच्या चरणांवर चकाकी दिसणे : संतांचे कार्य स्थळ (देह) आणि काळ (परिस्थिती) यांच्या पलीकडे असते. त्यामुळे स्थुलातून आजार किंवा विकलांगता इत्यादी कारणांमुळे संत काही करतांना दिसले नाहीत, तरी त्यांची समष्टी साधना चालू असते.
व्यष्टी साधना म्हणजे ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ यानुसार केलेली उपासना. यात मूलाधारचक्रापासून शक्ती वर वर जाते. यामुळे अधिकतर व्यष्टी उपासकांचा तोंडवळा, नेत्र किंवा कपाळ इत्यादींमध्ये पालट दिसून येतात. संतांच्या समष्टी साधनेचे माध्यम त्यांचा देह असल्यामुळे ब्रह्मांडातील चैतन्य त्यांच्या चरणांच्या माध्यमातून प्रक्षेपित होते. पायांमध्ये सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीतत्त्व असते. ब्रह्मांडातील चैतन्यामुळे संतांच्या चरणांतील पृथ्वीतत्त्व अल्प होऊन आपतत्त्वात वाढ होते आणि वाढलेल्या आपतत्त्वामुळे त्यांच्या चरणांवर चकाकी येते. असेच पू. इंगळेआजोबा आणि सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांच्या संदर्भात झाले असल्याने त्यांच्या पायांवर चकाकी आढळून येते.
४ ई. ‘पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाचे सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी देवच त्यांच्याभोवती पाण्याचे सुरक्षाकवच निर्माण करत आहे’, असे जाणवणे : धर्मशास्त्रात पार्थिव स्मशानात नेण्यापूर्वी त्यावर पाणी शिंपडतात, म्हणजेच पार्थिवावर आपतत्त्वाने संस्कार करतात. पुरोहितांनी पार्थिवावर पाणी शिंपडले, त्याआधी पाऊस पडला, म्हणजे ‘देवानेच पू. आजोबांच्या पार्थिवावर आपतत्त्वाद्वारे संस्कार केले’, असे मला जाणवले. पावसाकडे पाहून ‘हा नेहमी पडणारा पाऊस नसून पार्थिवाचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठीच तो पडला’, असे मला जाणवले.
(प्रत्यक्षातही साधक स्मशानभूमीत पोचेपर्यंत, म्हणजे अंदाजे १० ते १५ मिनिटे पाऊस चालू होता. त्यानंतर पाऊस थांबला आणि काही वेळाने आकाशातील ढग जाऊन ऊन पडले. – संकलक)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |